‘क्ले कोर्ट’ची उगवती ‘क्वीन’ !
टेनिस जगतात पोलंडचं अस्तित्व कधी जाणवतच नव्हतं. पण मागील तीन वर्षांत ते चित्र पूर्णपणे बदलून टाकलंय इगा स्वायटेकनं…खरं तर ‘फुटबॉल स्टार’ रॉबर्ट लेवांडोव्हस्की हा त्या देशाचा क्रीडाक्षेत्राचा चेहरा. आता टेनिसची मोठी परंपरा नसतानाही त्याच्या बरोबरीनं नाव घेतलं जाऊ लागलंय ते यंदा तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकलेल्या स्वायटेकचं…
नं’ सर्वप्रथम इतिहास रचला तो 2020 साली फ्रेंच ओपनमधील एकेरीचा किताब पटकावणारी पोलंडची पहिली टेनिसपटू बनून…त्यापूर्वी ते नाव फारसं कुणी ऐकलंही नव्हतं…‘ती’ 2019 मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपन खेळली तेव्हा उपउपांत्यपूर्व फेरीत सिमोना हॅलेपनं अवघ्या 45 मिनिटांत गाशा गुंडाळायला लावला होता…परंतु पुढच्या वर्षापासून वातावरण बदलू लागलं…आधी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चौथ्या फेरीत प्रवेश, अमेरिकन ओपनमध्ये तिसऱ्या फेरीपर्यंत मजल आणि त्यानंतर वयाच्या 19 व्या वर्षी ‘रोलाँ गॅरो’वरील (स्टेडियमचं फ्रंsंढच भाषेतील नाव) पहिल्या किताबाची कमाई…54 व्या क्रमांकावरून ‘ती’ आघाडीच्या 20 खेळाडूंत पोहोचली अन् ‘तिनं’ शिक्षण पूर्ण करून पदवी प्राप्त केली तीही त्याचवेळी…तेव्हापासून ‘तिनं’ मागं वळून पाहिलेलं नाहीये…इगा स्वायटेक (पोलंडच्या उच्चारानुसार नाव ‘इगा श्वियानतेक’)…आता 14 जेतेपदं अन् सुमारे 20 दशलक्ष डॉलर्स इतक्या बक्षिसांच्या रकमेसह ती अग्रस्थानावर विराजमान झालीय, आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा सफाया करत सुटलीय…
पण पहिल्या फ्रेंच ओपन जेतेपदानंतर जगातील सर्वोत्कृष्ट
खेळाडू म्हणून गणली जाण्यापर्यंत ती झेप घेईल असं किती जणांना वाटलं होतं ?…2021 साल संपलं त्यावेळी इगाच्या खात्यात दोन विजेतेपदं जमा झाली होती अन् ती जागतिक क्रमवारीत पोहोचली होती नवव्या स्थानावर. मग तिचे नवीन प्रशिक्षक टॉमाझ व्हिक्टोरोव्हस्की यांनी ध्येय जाहीर केलं ते पुढील एका वर्षात प्रथम क्रमांकावर पोहोचण्याचं अन् स्वायटेकनं ते उद्दिष्ट गाठून दाखवलं देखील…
त्यावेळी राज्य चाललं होतं ते 2019 पासून अव्वल स्थान न सोडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅश बार्टीचं. गेल्या वर्षीच्या आरंभी ‘अॅडलेड इंटरनॅशनल-1 च्या उपांत्य फेरीत स्वायटेकला तिच्यापुढं हात टेकावे लागले असले, तरी भविष्यात या दोघांमध्ये सातत्यानं झुंज रंगण्याची चिन्हं व्यवस्थित दिसली होती…इगानं पुढं दोहा नि इंडियन वेल्समधील ‘मास्टर्स स्पर्धा’ जिंकल्या अन् 21 मार्च रोजी ती बार्टीच्या पाठोपाठ जगातील दुसऱ्या सर्वोत्तम खेळाडूच्या स्थानावर विराजमान झाली. त्यानंतर दोनच दिवसांनी जे घडलं त्याची कुणीही कल्पना केली नव्हती…2022 च्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या बार्टीनं वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपण टेनिस रॅकेट खाली ठेवत असल्याची, निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला…
या घडामोडीमुळं इगा स्वायटेककडे अग्रक्रमांकाचा मुकुट चालून जाईल हे स्पष्ट झालं आणि तिनंही ‘मियामी ओपन’ जिंकून त्यावर शिक्कामोर्तब केलं. त्यासरशी ती ‘सनशाइन डबल’ (एकाच वर्षी ‘इंडियन वेल्स मास्टर्स’ आणि ‘मियामी ओपन’चे किताब) पूर्ण करणारी सर्वांत तऊण महिला टेनिसपटूही बनली…पुढील वर्षभरात पोलंडच्या या खेळाडूनं आपली विजयी घोडदौड 37 सामन्यांपर्यंत (गेल्या 23 वर्षांत कोणत्याही महिला टेनिसपटूला इतके सलग विजय मिळविता आलेले नाहीत) खेचण्याबरोबर फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपनची जेतेपदंही नावावर करून आपण त्या सिंहासनाच्या पात्र दावेदार आहोत हे सिद्ध केलं…
1975 साली संगणकीकृत क्रमवारी सुरू झाल्यापासून संपूर्ण वर्षभर अग्रस्थानावर अढळ राहिलेली इगा स्वायटेक ही इतिहासातील केवळ नववी महिला टेनिसपटू….या भरात तिनं आपल्या बहुतेक प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरश: फडशा पाडला. गेल्या वर्षी स्वायटेकनं चक्क 67 सामने जिंकले अन् गमावल्या त्या केवळ 8 लढती. त्यात 22 वेळा तिनं 6-0, तर 21 खेपेला 6-1 अशा फरकानं सेट्स जिंकत सामने खिशात घातले. यावरून तिची विलक्षण ‘दादागिरी’ लक्षात यावी…
मागील 13 पैकी आपले 12 अंतिम सामने सुद्धा इगा स्वायटेकनं सरळ सेट्समध्ये संपविलेत. यंदाच्या फ्रेंच ओपनचाच विचार केल्यास तिसऱ्या फेरीत वांग झिन्यूला नमवताना तिनं स्पर्धेत अशा प्रकारे जिंकलेल्या लढतींची संख्या चारवर नेली (‘रोलाँ गॅरो’वर इगानं आतापर्यंत 28 सामने जिंकलेत, तर केवळ दोन दवडलेत)…2020 व 2022 मधील फ्रेंच ओपन तसंच गेल्या वर्षी अमेरिकन ओपन किताबांची कमाई तिनं केली होती ती सरळ सेट्समध्ये प्रतिस्पर्ध्यांना आडवं करूनच. पण यंदा 2 तास 46 मिनिटं चाललेल्या जबरदस्त झुंजीत झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हानं तिला ती संधी नाकारली…
इगाचा हा झपाट्यानं झालेला उदय निव्वळ तिच्या शारीरिक खेळातील सुधारणांमुळं झालेला नाहीये. तिनं कोर्टवर आपल्या भावनांना कसं हाताळावं यावर देखील लक्ष केंद्रीत केलंय आणि बरेच खेळाडू जे करत नाहीत ते मानसिक प्रशिक्षणासाठी मानसोपचारतज्ञ डारिया अब्रामोविझ यांना साथीला घेऊन फिरण्याचं पाऊल तिनं उचललंय…असं असलं, तरी यंदाच्या मोसमानं इगा स्वायटेकसमोर काही कठीण प्रश्न निर्माण केलेत. वर्षभर कुणाकडून फारसं कठीण आव्हान मिळू न शकल्यानंतर अखेरीस तिला एलेना रायबाकिना, आर्यना साबालेन्का आणि बार्बोरा क्रेजसीकोव्हा यांच्या रूपानं तगडे प्रतिस्पर्धी मिळण्याची लक्षणं दिसताहेत. स्वायटेक अजिंक्य नाही हे त्यांनी दाखवून दिलंय…खेरीज तिनं अजून ‘ग्रास कोर्ट’वर वर्चस्व गाजवून दाखविलेलं नाहीये…
या पार्श्वभूमीवर फ्रेंच ओपनचं मिळालेलं विजेतेपद स्वायकेटकला निश्चितच सुखावून गेलं असेल…तिच्याकडे सध्या ‘क्ले कोर्ट’ची नवी ‘क्वीन’ या नजरेतून पाहिलं जाऊ लगलंय…इगा स्वायटेकचा आदर्श आहे तो मातीच्या कोर्टचा बादशहा राफेल नदाल. त्याच्यासारखी हुकूमत ती गाजवू शकेल का ?…
फ्रेंच ओपनमधील वर्चस्व…
- मोनिका सेलेसनंतर (1990, 1991 व 1992) फ्रेंच ओपनमध्ये लागोपाठ विजेतेपदं पटकावणारी इगा स्वायटेक ही सर्वांत तऊण महिला खेळाडू…
- बेल्जियमच्या जस्टिन हेनिननंतरची (2005, 2006 नि 2007) ती लागोपाठ फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणारी पहिली महिला…
- ?‘ओपन एरा’तील मोनिका सेलेस, स्टेफी ग्राफ आणि ख्रिस एव्हर्ट यांच्यानंतरची फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा अंतिम फेरीला धडक देणारी इगा ही चौथी सर्वांत तऊण महिला खेळाडू…
- तसंच ‘ओपन एरा’चा विचार करता इगा स्वायटेकनं तीन फ्रेंच ओपन विजेतेपदांसह मार्गारेट कोर्ट, मोनिका सेलेस, सेरेना विल्यम्स आणि अरांत्झा सांचेझ विकारिओशी बरोबरी केलीय. आता तिच्या पुढं आहेत त्या फक्त ख्रिस एव्हर्ट (7 किताब), स्टेफी ग्राफ (6 विजेतेपदं) नि जस्टिन हेनिन (4 किताब)…
- एकाच ग्रँडस्लॅममधील विजयाचं प्रमाण विचारात घेता केवळ मार्गारेट कोर्टचा (ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 95.5 टक्के आणि फ्रेंच ओपनमध्ये 95.2 टक्के) क्रमांक इगा स्वायटेकच्या (93.3 टक्के) पुढं लागतो…
जबरदस्त धडाका…
- 22 वर्षीय इगा स्वायटेक ही ‘ओपन एरा’तील तिसरी अशी महिला जिनं तिच्या पहिली चारही ग्रँडस्लॅम अंतिम लढती जिंकून दाखविल्याहेत. असा पराक्रम गाजविणाऱ्या अन्य दोन टेनिसपटू म्हणजे मोनिका सेलेस नि नाओमी ओसाका…
- सेरेना विल्यम्सनंतर (अमेरिकन ओपन 1999, फ्रेंच ओपन 2002, विम्बल्डन 2002 आणि अमेरिकन ओपन 2002) चार ग्रँडस्लॅम किताब पटकावण्याची कामगिरी करणारी स्वायटेक ही सर्वांत तऊण खेळाडू…
- मुख्य स्पर्धांत प्रवेश केल्यानंतर विजेतेपद मिळविण्याच्या बाबतीत इगाच्या यशाच्या टक्केवारीला (60 टक्के) दिग्गज मार्गारेट कोर्टनंतर (75 टक्के) दुसरं स्थान प्राप्त होतं…
- तिनं भाग घेतलेल्या मातीच्या कोर्टवरील 16 स्पर्धांमधील सात अंतिम फेऱ्या जिंकल्याहेत (यशाचं प्रमाण 43.8 टक्के). या पृष्ठभागावर केवळ ख्रिस एव्हर्ट (68.6 टक्के), मार्गारेट कोर्ट (52.5 टक्के) आणि स्टेफी ग्राफ (50 टक्के) यांच्या यशाचं प्रमाण तिच्याहून जास्त…
- स्वायटेकनं जागतिक यादीत अग्रक्रमांक मिळविल्यापासून ग्रँडस्लॅम सामन्यांमध्ये 26 विजय मिळविलेत अन् पराभव स्वीकारलेत ते केवळ दोन…
सामाजिक बांधिलकी जपणारी खेळाडू…
- पोलंडच्या वॉर्सामध्ये 31 मे, 2011 रोजी जन्मलेल्या, ‘हार्ड रॉक’ची चाहती असलेल्या इगा स्वायटेकचे वडील तोमास्झ हे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले रोव्हरपटू…समाजाची काळजी करणारी खेळाडू म्हणूनही तिला ओळखलं जातं…
- रशियानं आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या लोकांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वायटेक तिच्या बेसबॉल कॅपला पिवळ्या नि निळ्या रंगांचं रिबन (युक्रेनच्या राष्ट्रध्वजाचे रंग) लावून खेळतेय…शिवाय गेल्या वर्षी जुलैमध्ये तिनं शेजारच्या युक्रेनमधील मानवतावादी कारणांसाठी एक प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यातून उभा झाला 5 लाख डॉलर्सपेक्षा जास्त निधी…
- इगानं गेल्या वर्षी ओस्ट्रावामध्ये उपविजेतेपद मिळविल्यानंतर बक्षिसाची रक्कम ‘पोलिश मेन्टल हेल्थ चॅरिटी’ला दान केली…
– राजू प्रभू
खेळ जुनाच, ओळख नवी ! बास्केटबॉल
बास्केटबॉलचा इतिहास पार 1891 पर्यंत जातो आणि तेव्हापासून हळूहळू प्रसार होत तो जगभरात खेळला जाणारा खेळ म्हणून विकसित झाला आहे…रशिया, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, स्पेन आणि आशियातील काही राष्ट्रांसह अनेक देशांनी हा खेळ स्वीकारला आहे. परंतु या खेळाची जागतिक राजधानी म्हणून अमेरिकेचे नाव घ्यावे लागेल. जगातील सर्वांत मोठी आणि सर्वांत श्रीमंत लीग (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन-एनबीए) तेथेच रंगते…
- बास्केटबॉलमध्ये गुण मिळविण्यासाठी चेंडू प्रतिस्पर्ध्याच्या बास्केटमध्ये टाकावा लागतो. प्रत्येक संघ 12 खेळाडूंचा बनलेला असतो, पण फक्त 5 खेळाडूंना कोर्टवर परवानगी असते. ‘पॉइंट गार्ड’, ‘डिफेन्सिव्ह गार्ड’, ‘सेंटर’, ‘ऑफेन्सिव्ह फॉरवर्ड’ आणि ‘डिफेन्सिव्ह फॉरवर्ड’ अशा कोर्टवरील स्थानांवर खेळाडू राहत असले, तरी त्यांना त्यांच्या इच्छेनुसार फिरण्याची परवानगी असते…
- कोर्ट हा आयताकृती आकाराचा असतो अन् त्याची लांबी 91 फूट, तर रुंदी 50 फूट असते. कोर्टच्या मध्यभागी एक रेषा असते ज्यामध्ये मध्यभागी एक लहान वर्तुळ आढळते. येथून खेळाची सुऊवात ‘टीप ऑफ’ने होते (म्हणजे पंच चेंडू हवेत फेकतो आणि प्रत्येक संघातील एक खेळाडू त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो)…
- कोर्टाच्या प्रत्येक टोकाला 10 फूट उंचीवर दोन बास्केट्स असतात. शिवाय ‘थ्री पॉइंट आर्क’ अशी अर्धवर्तुळाकार रेषा असते, तर त्याच्या मध्यभागी ‘फ्री थ्रो लाइन’…खेळ बारा मिनिटांच्या चार सत्रांमध्ये विभागला जातो. दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या दरम्यान 15 मिनिटांचे मध्यांतर असते…
- बास्केटबॉलसाठी गुण मिळविण्याच्या तीन पद्धती आहेत. ‘थ्री पॉइंट आर्क’च्या बाहेरून बास्केटमध्ये चेंडू टाकल्यास तीन गुण, तर ‘थ्री पॉइंट आर्क’मधून बास्केटमध्ये चेंडू टाकल्यास दोन गुण मिळतात. यशस्वी ‘फ्री थ्रो’वर एक गुण मिळतो. फाऊल कुठे होते त्यावर ‘फ्री थ्रो’ची संख्या अवलंबून असते…
- बास्केटबॉलचा सामना जिंकण्यासाठी निर्धारित वेळेत प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात. जर गुणसंख्या बरोबरीत राहिली, तर विजेता सापडेपर्यंत अतिरिक्त सत्र खेळविले जाते..
- बास्केटबॉलमध्ये चेंडू एक तर ‘ड्रिब्लिंग’ करून (जमिनीवर आदळवून) नेता येतो किंवा ‘पास’ करता येतो. एकदा खेळाडूने चेंडू दोन्ही हातांनी धरला (फेकलेला चेंडू पकडणे यात समाविष्ट नाही) की, ते नंतर ‘ड्रिबल’ करू शकत नाहीत किंवा चेंडूसह हलू शकत नाहीत आणि चेंडू पास करणे किंवा तो फेकणे आवश्यक असते…
- प्रत्येक वेळा चेंडू यशस्वीरीत्या बास्केटमध्ये टाकल्यानंतर चेंडू प्रतिस्पर्धी संघाकडे दिला जातो…
- संपूर्ण लढतीमध्ये केलेले फाऊल्स जमा केले जातात आणि ते ठरावीक संख्येवर पोहोचल्यानंतर शेवटी ‘फ्री थ्रो’ दिले जातात…
आयसीसी ट्रॉफी जिंकणे दूरच..हाती फक्त…तारीख पे तारीख!
इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला. टीम इंडिया डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन इंग्लंडला पोहोचली होती. यंदा आयसीसी ट्रॉफी मिळवायचीच हेच ध्येय ठेवून ते गेले होते. पण, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवत मानाची गदा पटकावली. अर्थात, या पराभवानंतर टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा पुन्हा लांबणीवर गेली आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्रात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. यानंतर दुसऱ्या सत्रात भारताने शानदार खेळ साकारत अंतिम फेरी गाठली होती. कागदावर तरी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी असे दिग्गज खेळाडू असल्याने भारतीय संघ वरचढ वाटत होता. पण अंतिम लढतीत कागदावर शेर दिसणाऱ्या भारतीय खेळाडूंनी सपशेल निराशा केली. गोलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यानंतर अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी 280 धावांची गरज होती. सात फलंदाज खेळायचे बाकी होते. पण, विराट, रहाणे बाद झाले अन् तिथेच भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला. या पराभवानंतर भारतीय खेळाडू खूपच निराश झालेले दिसले. कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला आयसीसी ट्रॉफी म्हणून गदा दिली जाते. पुरस्कार सोहळ्यादरम्यान विराट कोहली स्टेजवरून गेला तेव्हा त्याने तिथे ठेवलेल्या गदेकडे ढुंकूनही पाहिले नाही. यावेळी कोहलीसह भारतीय संघातील सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती.
टीम इंडियाचा एखाद्या मोठ्या स्पर्धेत किंवा महत्वाच्या मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर लगेच कारणांचा शोध घ्यायला सुरुवात होते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा टीम इंडिया हरली. आधी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. फायनलच्या काही महिने आधी मायदेशात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत नमवले होतं. त्याआधी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवले होते. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचं पारड जड मानलं जातं होतं. प्रत्यक्षात सामना सुरु झाल्यानंतर मात्र चित्र वेगळेच दिसले. टीम इंडियाला एकही दिवस कसोटीवर वर्चस्व निर्माण करता आलं नाही. या पराभवाचे विश्लेषण करताना वेगवेगळी कारणं शोधली जात आहेत. माजी खेळाडू सुनील गावसकर, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांनी कारणमीमांसा करताना फलंदाजावर खापर फोडले आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियन खेळाडूविरुद्ध दिग्गज फिरकीपटू आर.अश्विनला का स्थान दिले नाही, यावरुनही आता वाद सुरु झाला आहे.याशिवाय, दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर पुजारा वगळता सर्वच खेळाडू फायनलसाठी इंग्लंडला पोहोचले. आयपीएलमध्ये सामने खेळल्यानंतर भारतीय खेळाडूंना एकही सरावाचा सामना खेळता आला नाही. तितकाही वेळ यासाठी उपलब्ध नव्हता. याउलट डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन वगळता इतर ऑसी खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी झाले नव्हते. यामुळे त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला. अर्थात, भारतीय संघाच्या पराभवाला आयपीएल कारणीभूत आहे, असे म्हणणे उचित ठरणार नाही. कारण भारतीय संघातील दिग्गज खेळाडू पाहता आयपीएलआधी भारताने वनडे, टी-20 व कसोटी सामने खेळले आहेत. कारणे काही असतील पण संघाला गरज असताना कौंटीत खेळणाऱ्या पुजारासह भारतीय खेळाडू मोक्याच्या क्षणी ढेपाळल्याचे पहायला मिळाले.
बीसीसीआयकडून सर्जिकल स्ट्राईक?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत युवा खेळाडूंना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भारतात होणारा वर्ल्डकप पाहता बीसीसीआयकडून मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. कसोटीसह वनडे, टी-20 मध्ये जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असणार आहे. आगामी विंडीजविरुद्ध मालिकेपासून याची प्रचिती दिसण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाच्या पदरी पुन्हा प्रतीक्षाच
टेस्ट, वनडे आणि टी-20 प्रकारात दोन देशांमधील मालिकांमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय संघाला आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. आयसीसीतर्फे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप, टी-20 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी या चार स्पर्धांचे आयोजन केले जाते. भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. मात्र त्यानंतर 10 वर्षात भारताला एकदाही आयसीसी जेतेपद पटकावता आलेले नाही. 10 वर्षात आयसीसीच्या 9 स्पर्धांमध्ये भारतीय संघ जेतेपदाच्या प्रतीक्षेतच राहिला आहे. आता, यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात वनडे विश्वचषक होत आहे. यामुळे टीम इंडियाला मागील दहा वर्षातील कसर भरुन काढण्याची ही नामी संधी यंदा असेल.
– विनायक भोसले, कोल्हापूर









