व्हेट्टोरीचा वारसदार…सँटनर !
यंदाचा विश्वचषक म्हणजे गोलंदाजांसाठी अक्षरश: कत्तलखाना ठरलाय…अशा परिस्थितीत फारच कमी ‘बॉलर्स’ उठून दिसू शकलेत. त्यात समावेश होतो तो न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरचाही. कुणाच्या ध्यानीमनी नसताना त्याची डावखुरी फिरकी अव्वल कामगिरी बजावत न्यूझीलंडच्या माऱ्याची मोलाचा आधार बनलीय…
विश्वचषक स्पर्धेच्या आधी कुठल्या अव्वल गोलंदाजांच्या नावांची चर्चा रंगायची ?…जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शाहीन आफ्रिदी, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मार्क वुड, कागिसो रबाडा यासारखे वेगवान गोलंदाज अन् कुलदीप यादव, रशिद खान, शाकिब उल हसन, रवींद्र जडेजा आदी फिरकीपटूंची…परंतु या साऱ्यांना मागं टाकून आतापर्यंत वर्चस्व गाजविलंय ते एका वेगळ्याच, कुणाच्या फारशा कल्पनेतही नसलेल्या नावानं…न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी बहाद्दर मिचेल सँटनर…
विश्वचषकाचा प्रवास अर्ध्यावर पोहोचलेला असताना कालपरवापर्यंत गोलंदाजांच्या यादीत आघाडीवर होता तो सँटनरच. पण नेदरलँड्सविरुद्धच्या ग्लेन मॅक्सवेलच्या कत्तलीनं गाजलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या अॅडम झॅप्पानं 8 धावांत मिळविलेल्या 4 बळींनी त्याला अग्रभागी पोहोचविलंय…या दोघांमध्ये सध्या फरक आहे तो केवळ एका बळीचा. झॅम्पानं 5 सामन्यांतून 13, तर सँटनरनं तितक्याच लढतींतून टिपलेत 12 गडी. असं असलं, तरी किवी खेळाडूचा ‘इकोनॉमी रेट’ (4.25) हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजापेक्षा (5.92) जास्त चांगला. त्यावरून सँटनरनं कसं फलंदाजांना जखडून ठेवलंय, त्याची पकड कशी मजबूत राहिलीय ते लक्षात येतं…
इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या सामन्यात सँटनरनं एकही चौकार लगावू दिला नाही, तर बांगलादेशला हाणता आले ते केवळ दोनच चौकार. नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी अधिक वेळा त्याचे चेंडू सीमेपार पिटाळलेले असले, तरी त्यांच्याविरुद्ध त्यानं अनुक्रमे पाच आणि तीन बळी टिपले. खुद्द फिरकीचा सामना करण्यात दिग्गज असलेल्या भारतीय फलंदाजांना देखील त्याच्याविरुद्ध 10 षटकांत काढता आल्या त्या अवघ्या 37 धावा. शिवाय त्यानं महत्त्वाचा बळी मिळविला तो के. एल. राहुलचा…
एकदिवसीय सामन्यांत मधल्या षटकांना अधिक मसालेदार बनविण्याच्या हेतूनं 40 व्या षटकापर्यंत किमान पाच क्षेत्ररक्षकांना ‘रिंग’मध्ये ठेवणं अनिवार्य करणारा नियम लागू झाल्यानंतर फलंदाज अधिक आक्रमक बनण्यास, तर बोटांनी चेंडू वळविणारे फिरकीपटू मागं पडण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या ‘पॉवरप्ले’च्या वेळी ते बळी मिळविण्याच्या बाबतीत कमी प्रभावी मानले जाऊ लागले. त्यामुळं धावांचा ओघ रोखण्याची क्षमता लक्षात घेऊन कर्णधार प्राधान्य देऊ लागले ते मनगटाच्या साहाय्यानं चेंडू वळविणाऱ्या फिरकीपटूंना…पण या विश्वचषकात पारंपरिक फिरकी गोलंदाजांनी काही प्रमाणात पुन्हा बाजी मारल्याचं दिसून येत असून त्यांचा झेंडा विसावलाय तो मिचेल सँटनरच्या खांद्यावर…
‘फिंगर स्पिनर’ हवा की, ‘रिस्ट स्पिनर’ या मुद्यावर बोलताना सँटनर म्हणतो, ‘एकदिवसीय लढतीच्या मधल्या षटकांत आता बळी घेण्याचा प्रयत्न करावा लागतो. या स्पर्धेतही आम्ही पाहिलंय की, जर बळी घेऊ शकला नाहीत, तर मग फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीनं भक्कम पाया घालण्या यशस्वी होतात. मी माझ्या पद्धतीनं आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. जर खेळपट्टी मदत करत असेल, तर अधिक आक्रमक होणं थोडे सोपे जातं. मात्र ती पाटा असेल, तर मग बचावात्मक भूमिका घेऊन, दबाव टाकून बळी मिळविण्यावर भर द्यायचा’…
सँटनरची ताकद लपलीय ती सतत अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्यात आणि वेगात हुशारीनं बदल करण्यात. त्याच्या गोलंदाजीवर चौकार हाणणं कठीण होतं ते त्यामुळंच. शिवाय त्याचा चेंडू टाकताना मध्येच घेतला जाणारा एक ‘पॉझ’ही फलंदाजांना गोंधळवून टाकणारा…फिरकीस पोषक नसलेल्या, वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या मायदेशातील खेळपट्यांवर परिणामकारक ठरण्याच्या दृष्टीनं आपण पत्करलेला हा मार्ग, असं मिचेलचं म्हणणं…‘जर खेळपट्टी फिरकीस मदत करणारी नसेल, तर मी वेग-टप्पा बदलून, दबाव वाढवून आणि फलंदाजाला फसवून त्याला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमीच फलंदाजांचं बारकाईनं निरीक्षण करून तो नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा अंदाज घेतो. फलंदाजांना गोंधळवून टाकायला मला आवडतं. काही वेळा ‘साईड स्पिन’सहं वेगानं चेंडू टाकणं हा सर्वोत्तम उपाय. परंतु पाटा खेळपट्यांवर वेगात बदल नि इतर हातखंडे आजमावून दबाव टाकण्याचा आधार घ्यावा लागतो’, सँटरनर म्हणतो…न्यूझीलंडचा हा ‘स्टार’ फिरकीपटू आता सिद्ध झालाय तो आपला 100 वा एकदिवसीय सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यास. त्यात कांगारुंना तो वेसण घालू शकला, तर हा मोलाचा टप्पा त्याच्यासाठी जास्तच संस्मरणीय ठरेल. पण त्याहून कमालीचा आनंद मिळेल तो त्याची फिरकी न्यूझीलंडला पहिल्यांदाच विश्वचषक मिळवून देण्याच्या कामी आल्यास !
गुणवान, पण संधी कमी…
- 5 फेब्रुवारी, 1992 रोजी जन्मलेल्या मिचेल सँटनरला न्यूझीलंडचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली ती दिग्गज डॅनियल व्हेट्टोरीनं निवृत्ती घेतल्यानं. त्यापूर्वी ‘अ’ श्रेणीचे फक्त 19 सामने खेळलेला असूनही तो व्हेट्टोरीची जागा भरून काढण्याच्या दृष्टीनं निवड समितीला सक्षम भासला…
- 2015 साली इंग्लिश दौऱ्यावरील न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा तो भाग होता, पण त्याला संधी मिळाली नाही. मात्र एकदिवसीय मालिकेत तो सर्व 5 सामने खेळला अन् त्यात त्यानं 7 बळी घेतले, तर 97 धावा केल्या…
- न्यूझीलंडतर्फे सँटनर पहिली कसोटी खेळला तो नोव्हेंबर, 2015 मध्ये अॅडलेड इथं ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पहिल्या दिवस-रात्र लढतीत…त्यात त्यानं 31 नि 45 धावा केल्या तसंच दोन बळी घेतले…पुढील चार वर्षांमध्ये त्याच्या कसोटींतील संधी मर्यादित राहिल्या, परंतु तो एकदिवसीय व ‘टी20’ संघांचा मुख्य आधार बनला…
- 2018 साली चमकदार पद्धतीनं सुरुवात केल्यानंतर ‘सीएसके’नंही त्याला ‘आयपीएल’साठी सर्वप्रथम निवडलं…पण गुडघ्याच्या दुखापतींमुळं त्या वर्षी बराच काळ मैदानात उतरू दिलं नाही…
- दुसरा डॅनियल व्हेट्टोरी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या अन् हॅमिल्टनमध्ये क्रिकेट खेळत वाढलेल्या मिचेलवर गुणवान असूनही बऱ्याच प्रमाणात पाळी आलीय ती राखीव खेळाडूंसाठीच्या बाकांवर बसून राहण्याची. कारण न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीस अनुकूल खेळपट्ट्यांवर नि वातावरणात फिरकीच्या वाट्याला येते ती दुय्यम भूमिका…दुसरीकडे, 2018 पासून ‘चेन्नई सुपर किंग्स’चा भाग असूनही रवींद्र जडेजाच्या उपस्थितीमुळं या 31 वर्षीय फिरकीपटूला संधी मिळू शकलीय ती केवळ 15 लढतींत…
- सँटनरनं सध्या चालू असलेल्या विश्वचषकात मान मिळविलाय तो एकदिवसीय लढतींत 100 बळी घेणारा न्यूझीलंडचा व्हेट्टोरीनंतरचा दुसरा फिरकी गोलंदाज ठरण्याचा. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला बाद करून त्यानं तो टप्पा गाठला…
- एक कुशल क्षेत्ररक्षक असलेल्या मिचेल सँटनरनं नोव्हेंबर 2020 मध्ये, आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रथमच न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा वाहिली ती वेस्ट इंडिजविऊद्धच्या तिसऱ्या ‘टी20’ सामन्यात…त्यानंतर आणखी काही ‘टी20’ लढतींत त्यानं ही जबाबदारी पेलली…
अष्टपैलूत्व सिद्ध करणारी कामगिरी….
- 2018 : डावखुरा फलंदाज असलेल्या सँटनरनं 27 चेंडूंत नाबाद 45 धावांची खेळी करून न्यूझीलंडला सेडन पार्क इथं इंग्लंडनं ठेवलेलं 8 बाद 284 धावांचं लक्ष्य पार करण्यास मदत केली. त्यातून त्याच्यात फलंदाज या नात्यानं लपलेली गुणवत्ता आणि तो किती हुशारीने विचार करतो हे जाणवलं…
- 2019 : राजस्थानविऊद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार हाणून मिचेलनं ‘चेन्नई सुपर किंग्स’ला सामना कसा जिंकून दिला होता ते ‘आयपीएल’च्या कित्येक चाहत्यांना अजूनही आठवत असेल…त्याच मोसमात ‘मुंबई इंडियन्स’विऊद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं चार षटकांत केवळ 13 धावा देऊन दोन गडी टिपले. त्यात महत्त्वाचा होता तो रोहित शर्माचा बळी…
- 2019 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतावर विजय मिळवून अंतिम फेरीत इंग्लंडविऊद्ध स्थान निश्चित करण्यास न्यूझीलंडला मदत झाली ती त्याच्या पुरत्या बांधून ठेवणाऱ्या स्पेलचीही (10-2-34-2)…
- 2019 : इंग्लंडविरुद्ध बी. जे. वॉटलिंगसोबत केलेल्या महाकाय भागीदारीच्या दरम्यान मिचेल सँटनरनं नोंद केली ती आपल्या पहिले कसोटी शतकाची…या दोघांनी 261 धावा जोडल्या. ही न्यूझीलंडची सातव्या यष्टीसाठीची सर्वोच्च भागीदारी. त्यामुळं किवीजना 9 बाद 615 असा धावांचा डोंगर उभारता आला. इंग्लंडविऊद्धची ही त्यांची कसोटीतील सर्वाधिक धावसंख्या…इतक्यावरच मर्यादित न राहता इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सँटनरनं तीन बळी घेत त्याची कसोटीतील सर्वोत्तम आकडेवारी नोंदविली आणि न्यूझीलंडला डावानं दणदणीत विजय मिळवून दिला…
प्रभावी गोलंदाजी…
- प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी पाच बळी
- कसोटी 24 40 41 53 धावांत 3 बळी 173 धावांत 5 बळी 45.63 –
- वनडे 99 94 103 – 50 धावांत 5 बळी 36.06 2
- टी20 90 89 100 – 11 धावांत 4 बळी 22.06 –
- आयपीएल 15 15 13 – 13 धावांत 2 बळी 27.54 –
फलंदाज सुसाट…
‘टी20’ क्रिकेटनं नि खास करून ‘आयपीएल’सारख्या लीगनं या खेळामध्ये आणली ती धुवाँधार फलंदाजी आणि गोलंदाजीचा खात्मा…सध्या चालू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेवरही या ‘टी20’ शैलीचीच छाप दिसून येत असून एकामागून एक फलंदाज धावांच्या राशी ओतत चाललेत. याभरात मोजकीच नावं वगळता गोलंदाजांची विलक्षण दमछाक होऊ लागलीय…
भारतातील खेळपट्ट्यांचा विचार करता यंदाच्या विश्वचषकात एक तर फिरकी गोलंदाजी गाजणार किंवा पाटा खेळपट्ट्dयांवर फलंदाज गोलंदाजांची यथेच्छ पिटाई करणार असा अंदाज व्यक्त होऊ लागला होता. तो खरा ठरलेला असून बहुतेक साऱ्या सामन्यांमध्ये धुवाँधार फलंदाजी क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालीय. त्यात सरताज राहिलीय ती ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलची नेदरलँड्सविरुद्धची झंझावाती खेळी. मॅक्सवेलनं नेंद केली विश्वचषकातील सर्वांत वेगवान शतकाची अन् त्यासाठी त्याला अवघे 40 चेंडू लागले. एडन मार्करमचा 49 चेंडूंतील शतकाचा विक्रम इतक्या लवकर मागं पडेल अशी कुणीही कल्पना केलेली नसेल…
पण सध्या आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवून धावा जमविण्यात आणि गोलंदाजीला अक्षरश: धुण्यात आघाडीवर आहे तो दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक. त्यानं अवघ्या पाच सामन्यांमध्ये उल्लेखनीय 407 धावा केल्या आहेत. त्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिलीय ती 174 ची. त्याची नोंद करताना त्यानं बांगलादेशच्या माऱ्याचा खात्मा केला. सर्वांत विशेष म्हणजे डी कॉकचा 114 इतका जबरदस्त ‘स्ट्राइक रेट’ त्यानं तब्बल 15 षटकार खेचलेत. त्याहून लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या डावांत एकाही अर्धशतकाची आतापर्यंत नोंद झालेली नसून त्यानं सारा डोलारा उभारलाय तो तीन मोठ्या शतकांच्या जोरावर…
त्याच्या मागोमाग आहे आपला क्रिकेट सुपरस्टार अन् ‘चेज मास्टर’ विराट कोहली. त्यानं पाच सामन्यांमधून जमविल्याहेत त्या 354 धावा. जरी त्याचा ‘स्ट्राइक रेट’ 90 वर असला, तरी त्याची सरासरी 118 वर पोहोचलीय. यास कारणीभूत आहेत त्या त्याच्या दोन नाबाद खेळी. कोहलीनं एक शतक आणि तीन अर्धशतकं झळकावलीत…
या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची वाटचाल डगमगती राहिलेली असली, तरी त्यांचा डेव्हिड वॉर्नर विलक्षण फॉर्मात राहिलाय. वॉर्नरच्या यंदाच्या स्पर्धेतील एकूण धावा 332 वर पोहोचून त्याला प्राप्त झालंय तिसरं स्थान. गेल्या आठवड्यातील पाकिस्तानविऊद्धच्या 163 धावांच्या खेळीनंतर त्यानं नेदरलँड्सविऊद्ध आणखी एक शतक फटकावलं. वॉर्नरनं आता विश्वचषकात ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रिकी पाँटिंगचा विक्रम मागं टाकलाय अन् तो सचिन तेंडुलकरच्या बरोबरीनं पोहोचलाय (6 शतकं)…शिवाय विश्वचषकातील एकूण धावा 1324 वर नेताना त्यानं वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा (1225) नि रोहित शर्मा (1289) यांना मागं टाकलंय. सध्या वॉर्नर स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या स्थानावर विराजमान झालाय…
चौथ्या स्थानावर आहे तो यंदाच्या स्पर्धेतील भारताच्या विजयी घोडदौडीत मोलाच भूमिका बजावलेला भारतीय कर्णधार रोहित शर्मा. त्याच्यात अन् वॉर्नरमध्ये फारसं अंतर नाही. रोहितनं 311 धावा केल्याहेत आणि त्याचा ‘स्ट्राइक रेट’ आहे तो 133 च्या घरात. त्याची सर्वांत उल्लेखनीय खेळी ही 131 धावांची. षटकार खेचण्याच्या बाबतीत मात्र तो अग्रभागी असून चक्क 17 षटकारांची बरसात केलीय…
पाकिस्तानची फलंदाजी हा कच्चा दुवा राहिलेला असला आणि त्यांचा हुकमाचा एक्का बाबर आझम जरी चालू शकलेला नसला, तरी पाचवं स्थान प्राप्त करण्यात यश मिळविलंय ते मोहम्मद रिझवाननं. त्यानं पाच सामन्यांमधून 302 धावा जमविल्याहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिलीय ती नाबाद 131 ची. 95 च्या ‘स्ट्राइक रेट’नं त्यानं फलंदाजी करताना चार षटकार खेचलेत. त्याची सरासरी आहे 75 च्या घरात…
या यादीत न्यूझीलंडचा रचिन रवींद्रसारखा फलंदाज सहाव्या स्थानावर, तर दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिक क्लासेन सातव्या स्थानावर विराजमान झालाय. रवींद्रनं एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 290 धावा खात्यावर जमा केलेल्या असून क्लासेनही मागं नाही. त्यानं 288 धावा काढलेल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम खेळी 109 धावांची. महत्त्वाचं म्हणजे त्यानं आपला सहकारी डी कॉकच्या इतकेच 15 षटकार खेचलेत…
न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल (आठवं स्थान, 268 धावा) आणि दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम (नववा क्रमांक, 265 धावा) यांचीही बॅट काही कमी चमकलेली नाही. मिशेलची सरासरी 89 इतकी, तर मार्करमनं नोंद केलीय एक शतक आणि दोन अर्धशतकांची…अव्वल दहामध्ये पाकिस्तानचा अब्दुल्ला शफीक (दहावं स्थान) याचं नाव देखील असून त्यानं 255 धावा फटकावल्या आहेत…ज्या गतीनं अन् प्रकारे धावा जमविल्या जात आहे ते पाहता विश्वचषक संपेपर्यंत फलंदाजीतील किती उच्चांक धारातिर्थी पडतील हे सांगणं कठीण !
– राजू प्रभू









