पुनरागमनानंतरचा भरवशाचा राहुल !
सध्या आंतरराष्ट्रीय लढतींत सर्वाधिक षटकार नि विश्वचषकातील शतकांचा विक्रम यामुळं रोहित शर्माचा गाजावाजा चालू असला, तरी आशिया चषकापासून सातत्यानं भारतीय संघाला तरता हात देत आलाय तो के. एल. राहुलच…यष्टिरक्षणाबरोबर भरवंशाचा फलंदाजही बनलेल्या राहुलनं दुखापतीमुळं पाच महिने मैदानाबाहेर राहावं लागल्यानंतर टीकाकारांची तोंडं बंद करताना केलेलं हे पुनरागमन जबरदस्त…
वर्ष 2018…स्थळ…आयर्लंड…‘एका’ भारतीय फलंदाजाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होत होती…दर्जेदार नसलेल्या त्या सरावाच्या ‘पीच’वर सुद्धा ‘तो’ दर्शन घडवत होता ते शैलीदार ड्राईव्हस्चं. ‘त्याची’ नेटमधील फलंदाजी पाहण्यास हजर होता तो तत्कालीन भारतीय कर्णधार खुद्द विराट कोहली सुद्धा. ‘त्या’ उजव्या हातानं फलंदाजी करणाऱ्या बॅट्समनचं कौशल्य पाहून विराटनं ‘त्याचं’ अगदी तोंड भरून कौतुक केलं…ते किती सार्थ होते ते आता पुरेपूर कळून चुकतंय…के. एल. राहुल…कर्नाटकचा अन् भारताचा ‘स्टायलिश’, भरवशाचा फलंदाज…तथापि, राहुलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली राहिलीय. परंतु भारतीय संघाच्या व्यवस्थापनानं मात्र परिस्थिती कशीही असली, तरी नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवणं पसंत केलंय, त्याला संधी दिलीय अन् दुखापतींतून तो सावरण्याची वाट पाहिलीय…
विराटनं त्याच्यावर गेल्या पाच वर्षांत आणि आता राहुल द्रविड-रोहित शर्मा जोडीनं ठेवलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दुखापतीतून परतलेल्या राहुलनं पुरेपूर काळजी घेतलीय…विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या लढतीत यजमान संघाची स्थिती 3 बाद 2 धावा अशी नाजूक असताना, गोलंदाजांना मोठ्या प्रमाणात साहाय्य करणाऱ्या ‘पीच’वर तो फलंदाजी करण्यासाठी ‘चिपॉक’वर उतरला. त्यावेळी कांगारुंची वेगवान गोलंदाजांची त्रिमूर्ती व फिरकी गोलंदाज देखील हल्लाबोल करण्याच्या मनस्थितीत होते. पण राहुल-विराट जोडीनं 165 धावांची भागीदारी नोंदवून ऑस्ट्रेलियाला अक्षरश: पाणी पाजलं…राहुलच्या नाबाद 97 धावांत सर्व वैशिष्ट्यां लपली होती अन् त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की, तो मधल्या फळीतील दर्जेदार फलंदाज म्हणून का गणला जातोय. त्यानं घाई न करता प्रथम तंबू उभारला, भात्यातील ‘शॉट्स’ना लगाम घातला, योग्य वेळेची वाट पाहिली आणि त्यानंतरच कांगारुंच्या गोलंदाजांवर चढाई केली…
सध्या विश्लेषकांची जुगलबंदी चाललीय ती के. एल. राहुलचा त्या डावातील सर्वांत चांगला फटका शोधण्यासाठी. परंतु तसं पाहिल्यास त्यानं एक नव्हे, तर दोन अप्रतिम ‘शॉट्स’चं दर्शन सर्वांना घडविलंय…डावाच्या 18 व्या षटकात लेगस्पिनर अॅडम झॅम्पाला मारलेल्या त्या दोन ‘लेट कट्स’नी साऱ्या क्रिकेट रसिकांना, विशेषत: जुन्या जमान्यातील प्रेक्षकांना-समालोचकांना आठवण करून दिली ती त्या ‘स्ट्रोक’चा बादशहा म्हणून मिरविलेल्या ‘जीनियस’ गुंडप्पा विश्वनाथची. विशेष म्हणजे विश्वनाथनी सुद्धा चिपॉकवर वेस्ट इंडिजवर नाबाद 97 धावाच 1975 च्या कसोटी सामन्यात नोंदविल्या होत्या अन् भारतानं तो सामना जिंकण्यात यश मिळविलं होतं…
विश्वनाथकडे अफलातून क्षमता होती ती भिंगरीप्रमाणं चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर देखील ‘लेट कट’ हाणण्याची. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ‘विशी’ तो फटका चेंडूला नव्हे, गोलंदाजाला पाहून खेळायचा…के. एल. राहुलला दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर फलंदाजी करण्याचा नवा मंत्र सापडलाय असं किमान सध्या तरी दिसतंय. कारण कुठल्याही परिस्थितीत न डगमगता तो फलंदाजी करतोय…सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे कौतुकानं म्हणाले, ‘राहुलच्या क्षमतेमुळं मधल्या फळीला दर्जा प्राप्त झालाय. तो फिरकीपटू व वेगवान गोलंदाज यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सामोरा जातोय आणि त्यामुळं संघाला स्थिरता मिळतेय’.
त्या 31 वर्षीय फलंदाजानं नव्या जमान्यातील महान फलंदाज विराट कोहलीच्या बरोबर खेळताना आत्मविश्वासाचं जबरदस्त दर्शन घडविलं आणि ते सुद्धा चेन्नईच्या उकाड्यात जवळपास चार तास यष्टिरक्षण केल्यानंतर…आता यापुढील कारकिर्दीत कशा पद्धतीनं चमकायचं ते सर्व अवलंबून असणार दस्तुरखुद्द के. एल. राहुलवरच !
एकदिवसीय सामन्यांतील कामगिरी…
कालावधी सामने डाव नाबाद धावा सर्वाधिक सरासरी शतकं अर्धशतकं स्ट्राईक रेट
2017 ते 2021 38 37 6 1509 112 48.67 5 9 89.28
2022 10 9 – 251 73 27.88 – 2 80.19
2023 14 13 5 628 नाबाद 111 78.5 1 5 86.5
एकूण 62 59 11 2388 112 45.13 6 16 87.5
मागील सात डाव 8 7 3 402 नाबाद 111 100.5 1 3 92.41
विश्वचषक 10 10 2 458 111 57.25 1 3 78.82
कसोटी, ‘टी20’ नि ‘आयपीएल’मधील कारकीर्द…
प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वाधिक सरासरी शतकं अर्धशतकं
कसोटी 47 81 2 2642 199 33.44 7 0
टी20 72 68 8 2265 110 37.75 2 22
आयपीएल 118 109 20 4163 132 46.78 4 33
मेंगळूरमधून सुरुवात…
- 18 एप्रिल, 1992 रोजी जन्मलेल्या कन्ननूर लोकेश राहुलचं कुटुंब उच्च शिक्षित…तो वाढला प्रतिष्ठित ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, कर्नाटक’च्या परिसरात. वडील तेथील माजी संचालक. मात्र अभ्यासात हुशार राहुलवर मोहिनी पडली ती क्रिकेटची अन पालकांनी देखील त्याच्यातील ‘स्पार्क’ ओळखून प्रोत्साहन दिलं…
- राहुलनं सॅम्युअल जयराज यांच्या हाताखाली मेंगळूर स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर धडे गिरविण्यास सुरुवात केली त्यावेळी तो साडेदहा वर्षांचा…त्या अकादमीत तो दाखल झाला होता यष्टिरक्षक-फलंदाज म्हणूनच अन् कर्नाटकच्या 13 नि 15 वर्षांखालील संघांतून खेळतानाही त्यानं या दोन्ही जबाबदाऱ्या पेलल्या. ते काम राहुलनं अजूनही चालू ठेवलंय…
कर्नाटक ते भारतीय संघ…
- के. एल. राहुलचं नाव सर्वप्रथम चर्चेत आलं ते 15 वर्षांखालील स्पर्धेत लागापोठ तीन शतकं झळकविल्यानं, तर 19 वर्षांखालील संघातून घेतलेली झेप प्रथम श्रेणी संघात पोहोचवून गेली. 2010 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी संघातही त्याची निवड झाली होती. त्या वर्षाच्या उत्तरार्धात दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या सांगण्यावरून कर्नाटकच्या रणजी संघाची दारं खुली झाली…
- 2010-11 मध्ये पदार्पणाचा हंगाम समाधानकारक गेला असला, तरी नंतरच्या मोसमात त्याला संघाबाहेर ठेवण्यात आलं. परंतु 2012-13 मध्ये परतल्यानंतर राहुलनं लावलेला धडाका त्याला मोसमातील सर्वाधिक धावा जमविणारा खेळाडू बनवून गेला…2013-14 मध्ये तर त्यानं कर्नाटकच्या रणजी जेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावताना अंतिम सामन्यातील ‘मॅच-विनिंग’ 131 धावांच्या खेळीसह तीन शतकं फटकावत 1033 धावा केल्या…
- 2013 मध्येच के. एल. राहुलनं ‘इंडियन प्रीमियर लीग’ मध्ये ‘रॉयल चॅलेंजर्स बंगलोर’मधून पाऊल ठेवताना ‘आयपीएल’मधील तोवरचं सर्वांत जलद अर्धशतक नोंदवून तिथंही छाप पाडली…
- या साऱ्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या कसोटी संघात वर्णी लागून ‘बॉक्सिंग डे’च्या दिवशी (26 डिसेंबर, 2014 रोजी) संधी मिळाली ती एमसीजीवरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात. परंतु दबावाखाली कोलमडलेला हा फलंदाज 6 नि 3 एवढ्याच धावा दोन डावांत जमवू शकला…
- पण त्याच राहुलला सिडनी कसोटीत सलामीला पाठविल्यानंतर नाट्यामय वळण घेत त्यानं संयमी शतकी खेळी करून दाखविली…पुढं त्यानं श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यांवरही शतकं झळकावली…
- 2016 च्या मध्यास झिम्बाब्वे नि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या संघांत निवड झालेल्या राहुलनं झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय नि ‘टी20’ पदार्पणातच प्रत्येकी एक शतक झळकावून आपलं अष्टपैलूत्व दाखवून दिलं…
राहुलची सहा उत्कृष्ट शतकं…
- 3 जुलै, 2018 : इंग्लंडविरुद्ध टी20 सामन्यात 101…
- 6 जुलै, 2019 : श्रीलंकेविरुद्धच्या विश्वचषकातील ‘वनडे’त 111…
- 11 फेब्रुवारी, 2020 : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय लढतीत 112…
- 3 ऑगस्ट, 2016 : वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत 158…
- 18 डिसेंबर, 2016 : इंग्लंडविरुद्ध कसोटीत 199…
- 10 सप्टेंबर, 2023 : पाकविरुद्ध आशिया चषकात नाबाद 111…
खेळ जुनाच ओळख नवी ! ‘वुशू’
‘वुशू’चा शाब्दिक अर्थ ‘मार्शल टेक्निक’…या खेळाची पाळंमुळं शोधायची झाल्यास इतिहासात हजारो वर्षं मागं चीनमधील किन राजघराण्यापर्यंत जावं लागेल…‘आंतरराष्ट्रीय वुशू महासंघा’ची स्थापना 1990 मध्ये ‘वुशू’च्या बॅनरखाली ‘मार्शल आर्ट’च्या विविध प्रकारांचं नियमन करण्यासाठी झाली…
- आधुनिक काळात ‘वुशू’च्या आहेत दोन मुख्य शाखा…‘कोरिओग्राफ्ड रूटिन्स’सह ‘ताओलू’ आणि ‘सांडा’ म्हणजे पूर्ण भिडून झुंज…‘ताओलू’ हा प्रकार वेगवेगळे पवित्रे, हालचाली, निर्धारित गोष्टी आणि अगदी शस्त्रांवर आधारित श्रेणींमध्ये विभागला गेलाय. यामध्ये उघड्या हातांनी लढला जातो तो ‘तायजिक्वान’ अन् चिनी पद्धतीची सरळ तलवार घेऊन लढला जाणारा ‘तैजिजियन’ म्हणजे ‘ताई ची’…
- ‘सांडा’ला पूर्वी ‘सान्शाऊ’ म्हटलं जायचं अन् ‘चिनी बॉक्सिंग’ अथवा ‘चिनी किकबॉक्सिंग’ म्हणून देखील ओळखलं जायचं. ‘वुशू’ व ‘कुंग फू’ तंत्रांचा वापर करून लढण्याची वैशिष्ट्यां त्यात विसावलीत…‘ज्युदो’ नि ‘तायक्वांदो’सारख्या इतर आशियाई मार्शल आर्ट्सप्रमाणंच हा प्रकार देखील विविध वजन श्रेणींमध्ये विभागला गेलाय…
- ‘सांडा’च्या प्रत्येक लढतीत दोन मिनिटांच्या तीन फेऱ्यांचा समावेश असतो आणि त्यामध्ये एक मिनिट विश्रांती असते. तीनपैकी दोन फेऱ्या जिंकणारा खेळाडू विजेता ठरतो…प्रतिस्पर्ध्याच्या निषिद्ध भागांवर प्रहार करणं, झुंज सुरू होण्यापूर्वी किंवा थांबल्यानंतर हल्ला करणं, निषिद्ध पद्धत वापरून प्रतिस्पर्ध्यावर प्रहार करणं, प्रतिस्पर्ध्याला हेतुपुरस्सर दुखापत करणं यांना ‘वैयक्तिक फाऊल’ गणलं जातं…
- ‘तांत्रिक फाऊल’मध्ये प्रतिकूल स्थितीत ‘टाइम-आउट’ची मागणी करणं, पकडून ठेवणं, जाणूनबुजून लढतीला उशीर करणं आणि पंचांच्या आदेशांचा अनादर करणं यांचा समावेश होतो….‘तांत्रिक चुकी’साठी एक सूचना जारी केली जाते, तर ‘वैयक्तिक फाऊल’साठी एक इशारा दिला जातो. तीन वैयक्तिक फाऊल केल्यास लढतीतून अपात्र ठरवलं जातं अन् प्रतिस्पर्ध्याला हेतुपुरस्सर दुखापत केल्यास संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकलं जातं…
- ‘ताओलू’मध्ये खास ‘कोरिओग्राफ’ केलेल्या किंवा अनिवार्य हालचाली असतात. स्पर्धेनुसार प्रत्येक सादरीकरणाचा कालावधी बदलू शकतो अन् तो 50 सेकंदांपासून 6 मिनिटांपर्यंत राहू शकतो…स्पर्धकाला पार्श्वभूमीवर संगीत हवं असल्यास स्पर्धा व्यवस्थापन रेकॉर्ड केलेलं संगीत वाजवतं. मात्र त्यात गीत, शब्द किंवा क्रियांचे कोणतेही शाब्दिक संकेत असत नाहीत…
- ‘वुशू’ची पहिली जागतिक स्पर्धा 1991 मध्ये बीजिंग इथं आयोजित करण्यात आली, तर त्याच्या एक वर्ष आधी हा क्रीडाप्रकार आशियाई खेळांमध्ये सर्वप्रथम झळकला….
- हांगझाऊ, चीन इथं नुकत्याच झालेल्या आशियाई खेळांतील ‘वुशू’ प्रकारात आठ सदस्यीय भारतीय तुकडी सहभागी झाली होती. त्यापैकी रोशिबिना देवी ही एकमेव पदकविजेती राहिली. तिनं महिलांच्या 60 किलो गटातील ‘सांडा’ स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. यंदा मिळालं ते आशियाई खेळातील ‘वुशू’मधील भारताचं दहावं पदक…
– राजू प्रभू
यूपीची उडनपरी आशियात भारी !
‘अब की बार सौ पार‘ हा नारा राजकीय प्रेरणेने भारलेला वाटू शकतो. पण भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी तो खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होता. यंदा चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये शंभर पदके मिळवण्याचे उद्दिष्ट भारताच्या क्रीडा क्षेत्राने ठेवले होते. बॅडमिंटन, टेबल टेनिससारख्या खेळांमध्ये चीनचा वर्षांनुवर्षांचा वरचष्मा. त्यांच्यासमोर उभे राहायचे आणि जिंकायचे, तर निव्वळ कौशल्यात्मक आणि शारीरिक तयारीने भागण्यासारखे नसते. तिरंदाजीमध्ये दक्षिण कोरिया ही महासत्ता म्हणून ओळखली जाते. त्यांचे तिरंदाज कोणत्याही स्पर्धेत जेत्यांच्या आत्मविश्वासानेच उतरतात. त्यांच्याविरुद्ध सातत्याने चांगली कामगिरी करून सुवर्णपदके जिंकणे ही साधारण बाब नव्हे. पण आपल्या खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत हे करून दाखवले. यामुळेच यंदाच्या आशियाई स्पर्धामध्ये भारताने 28 सुवर्णपदकांसह 107 पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी साकारली.
यंदाच्या आशियाई स्पर्धेत नेमबाजी, अॅथलेटिक्स, तिरंदाजीत सर्वाधिक पदके भारतीयांनी मिळवली. याच अॅथलेटिक्समध्ये एक अनोखा विक्रम रचला गेला. यंदाच्या आशियाई स्पर्धेत प्रथमच भारताने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. 28 वर्षाची पारुल चौधरी या स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. विशेष म्हणजे, पारुलने 3000 मीटर स्टीपलचेसमध्येही रौप्यपदक जिंकले आहे. अवघ्या दोन दिवसात रौप्य आणि सुवर्णपदक जिंकत तिने नवा इतिहास रचला आहे. पारुलने 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत 15:14:75 मिनिटांचा वेळ घेतला. सुरुवातीच्या 4000 मीटरपर्यंत पारुल पाचव्या स्थानावर होती. शेवटच्या हजार मीटर्समध्ये ती पहिल्या तीन आणि शेवटच्या 200 मीटरमध्ये पहिल्या दोन मध्ये पोहचली. जपानची रिरिका हिरोनाका तिच्या पुढे होती. शेवटच्या 30 मीटरमध्ये पारुलने अप्रतिम धाडस दाखवत जपानच्या रिरिकाला मागे टाकत सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम केला.
छोट्या गावातून मोठी कामगिरी
मेरठमधील एका छोट्या गावातून आलेल्या कृष्णपाल सिंह यांच्या पारुल चौधरीने सुवर्ण मिळवताच भारताचा नावलौकिक जगभरात झाला आहे. छोट्या गावातून आलेली आणि शेती करणाऱ्या बापाच्या मुलीने देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याने अनेकांना याचा अभिमान वाटत आहे. पारुलचे वडील कृष्णपाल सिंह शेती करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. मोठा मुलगा राहुल दिवाण टायर कारखान्यात काम करतो तर दुसरी मुलगी प्रीती क्रीडा कोट्यातून सीआयएसएफमध्ये उपनिरीक्षक आहे. पारुल तीन नंबरची आहे. ती रेल्वेत आहे. तर चौथा मुलगा रोहित यूपी पोलिसात कार्यरत आहे. पारुल आणि प्रीतीने भरालामधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर मेरठ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. पतियाळा येथील राष्ट्रीय अकादमीत गेल्यानंतर मात्र तिने मागे वळून पाहिले नाही.
बहिणीबरोबर स्पर्धा
उडनपरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारुलचा आजवरचा संघर्ष निश्चितच प्रेरणादायी असा आहे. गावातील कच्च्या रस्त्यावरुन धावण्याचा सराव करत असताना अनेकदा तिला दुखापती झाल्या. मोठ्या शहरात सरावासाठी पैसे नसल्याने गावातच रेल्वे रुळाच्या शेजारी ती धावण्याचा सराव करत असे. पण नंतरच्या काळात भाराळा गावातील बीपी इंटर कॉलेजमधून मोठी बहीण प्रीती चौधरीसोबत धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात पारुलची मोठ्या बहिणीशी स्पर्धा होती. दोघींनी 1600 आणि 3000 मीटर या दोन प्रकारात धावायला सुरुवात केली. निवडीदरम्यान बहिणीशी स्पर्धा केल्यानंतर कुटुंबीयांनी मोठ्या बहिणीला 5 हजार मीटर धावण्याचा सल्ला दिला. बहिणीसोबत सुरू झालेल्या या स्पर्धेनंतर पारुलने मागे वळून पाहिले नाही आणि हंगेरी येथे अलीकडेच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदकापासून वंचित राहिल्यानंतरही पारुल ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. पारुलने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीतही आश्चर्यकारक कामगिरी केली. या शर्यतीत ती 11 व्या स्थानावर राहिली, पण तिने राष्ट्रीय विक्रम मोडला. जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 9:15.31 वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. यावेळी पारुलने ललिता बाबरचा राष्ट्रीय विक्रम मोडला. ललिताने रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत 9:19.76 वेळेत पूर्ण केली होती.
आता लक्ष्य पॅरिस ऑलिम्पिक
आशियाई स्पर्धेतील यशानंतर पारुलचे मेरठ येथे जंगी स्वागत करण्यात आले. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी कमी कालावधी असून पतियाळा येथील राष्ट्रीय अकादमीत सरावावर भर देणार असल्याचे ती सांगते. यंदाच्या वर्षी तिने 3000 मी स्टेपलचेस प्रकारात तिने राष्ट्रीय विक्रम नेंदवला आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्याच्या निर्धारानेच उतरणार असल्याची प्रतिक्रिया पारुलने दिली.
एशियन गेम्समध्ये 13 वर्षानंतर यश
भारताने यापूर्वी कधीही आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलेले नाही. 1998 पासून हा खेळ आशियाई खेळांचा भाग आहे. सुनीता राणीने 1998 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक, 2002 च्या बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत सुनीता राणीने कांस्यपदक, 2006 च्या दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत ओपी जैशाने कांस्यपदक, कविता राऊतने 2010 च्या ग्वांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. 2014 इंचॉन आणि 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला या स्पर्धेत एकही पदक जिंकता आले नाही. 13 वर्षांनंतर भारताने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत पदक जिंकले आणि तेही सुवर्णपदक.
विनायक भोसले, कोल्हापूर









