अव्वल मराठमोळा ‘जवान’…अविनाश साबळे !
सध्या चीनमधील हांगझाऊ इथं संपत आलेल्या आशियाई खेळांत भारतानं आजवरची सर्वांत जास्त सुवर्णपदकं मिळविलीत तसंच एकूण पदकांच्या बाबतीत देखील नवा उच्चांक रचून दाखविलाय…यात अग्रभागी राहिलंय ते अॅथलेटिक्स अन् त्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या नावांपैकी एक म्हणजे महाराष्ट्राचा अव्वल धावपटू अविनाश साबळे…त्यानं 3 हजार मीटर्स ‘स्टीपलचेस’मध्ये सुवर्ण, तर बुधवारी 5 हजार मीटर्स शर्यतीत रौप्यपदक आपल्या खात्यात जमा केलं…
1 ऑक्टोबर…‘त्याच्या’ आशियाई खेळांतील 3 हजार मीटर्स ‘स्टीपलचेस’ शर्यतीतील एकतर्फी विजय पाहताना आठवण झाली ती सध्याचा ‘फॉर्म्युला वन’ शर्यतीतील जगज्जेता मॅक्स वर्स्तापेनची…जेव्हा शेवटची फेरी सुरू झाल्याची घंटा वाजली तेव्हा त्यानं आघाडी मिळविली होती तब्बल 20 मीटर्सची…त्यानंतर ‘त्याला’ आव्हान देणं कुणालाही शक्य झालं नाही आणि 8 मिनिटं 19.50 सेकंदांच्या वेळेसह ‘त्यानं’ आशियाई खेळांचा विक्रम जमीनदोस्त केला…जेतेपदानंतर ‘तो’ म्हणाला, ‘स्टेडियमवरील मोठ्या पडद्यावर मी माझ्या आघाडीचं दर्शन घेतलं अन् तेव्हाच मला परिस्थितीची कल्पना आली. मग मी माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी मोडण्याचा प्रयत्न केला नाही’…
4 ऑक्टोबर…‘त्या’ 29 वर्षीय अॅथलीटनं पुन्हा एकदा ‘ट्रॅक’वर पाऊल ठेवलं आणि पुरुषांच्या 5 हजार मीटर्स शर्यतीत रौप्यपदक कमावलं…दोन्ही स्पर्धा जिंकण्याचं त्याचं स्वप्न मात्र थोडक्यात हुकलं…मराठमोठा अविनाश साबळे…लष्कराचा जिगरबाज जवान !
‘स्टीपलचेसर’ अविनाश साबळेनं भारताचा लांब पल्ल्याचा प्रमुख धावपटू म्हणून स्वत:ची ओळख झपाट्यानं प्रस्थापित केलीय…त्यानं धावपटू म्हणून कारकीर्द घडविण्याच्या दृष्टीनं गंभीरपणे लक्ष दिलं ते अवघ्या आठ वर्षांपूर्वी, 2015 मध्ये. त्यानंतरचा त्याचा उदय विलक्षण लक्षणीय…पण 13 सप्टेंबर, 1994 रोजी महाराष्ट्रातील बीड जिह्यातील मांडवा गावच्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाश साबळेमध्ये कौशल्याची बिजं रोवली ती त्याच्या बालपणातील खडतर परिस्थितीनं. त्यावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्यानं त्याला शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी दररोज चक्क सहा किलोमीटर धावून जावं लागायचं…
‘स्टीपलचेस’कडे वळल्यानंतर अविनाश साबळे लगेच प्रकाशझोतात आला तो 2017 च्या ‘फेडरेशन कप’पासून. तिथं तो पाचव्या स्थानावर राहिला अन् नंतर वर्षाच्या उत्तरार्धात चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम त्याला अवघ्या नऊ सेकंदांनी हुकला…2018 च्या सुऊवातीला प्रशिक्षणादरम्यान पायाचा घोटा मोडल्यानंतर त्यातून पूर्ण सावरण्याच्या आधीच धावण्याचा केलेला प्रयत्न साबळेला महागात पडला. परिणामी तो त्या वर्षी जकार्ता (इंडोनेशिया) इथं झालेल्या आशियाई खेळांसाठी पात्र ठरू शकला नाही…
मात्र त्यानं खचून न जाता अविनाशनं लगेच पुन्हा झेप घेतली ती भुवनेश्वरमधील 2018 च्या राष्ट्रीय स्पर्धेत. तिथं त्यानं 3 हजार मीटर्स ‘स्टीपलचेस’मध्ये 8 मिनिटं 29.88 सेकंद अशी वेळ नोंदवत गोपाल सैनीनं 1981 च्या टोकियोतील आशियाई स्पर्धेत नोंदविलेला 30 वर्षं जुना राष्ट्रीय विक्रम 0.12 सेकंदांच्या फरकानं मोडीत काढला. तिथून नवीन राष्ट्रीय उच्चांक रचण्याची त्याची जणू मालिकाच सुरू झाली…2019 मध्ये पतियाळातील ‘फेडरेशन चषक’ स्पर्धेत साबळेनं दुसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम मोडला तो 8 मिनिटं 28.94 सेकंद या वेळेनिशी. त्याच्या जोरावर त्याला दोहा येथील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेची दारं उघडली अन् 1991 मधील दीना रामनंतरचा त्या स्पर्धेत धावलेला पहिला भारतीय पुऊष ‘स्टीपलचेसर’ बनण्याचा मान त्याला प्राप्त झाला…
2019 च्या एप्रिलमध्ये अविनाश साबळेनं दोहा इथंच झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेलं हे त्याचं पहिलं पदक…परंतु ऑक्टोबरमध्ये झालेल्या तेथील जागतिक स्पर्धेतील त्याची कामगिरी ही जास्त लक्ष वेधून गेली. कारण त्यानं स्वत:चा राष्ट्रीय विक्रम दोनदा मोडला. पात्रता फेरीत तो त्याहून तीन सेकंद वेगानं धावला अन् अंतिम फेरीत जरी 13 वं स्थान मिळालेलं असलं, तरी 8 मिनिटं 21.37 सेकंदांच्या वेळेसह नवीन विक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळं 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट त्याच्या हाती पडलं…1952 मध्ये गुलझारा सिंग माननं असा पराक्रम केला होता. त्यानंतर 68 वर्षांनी ऑलिम्पिकमधील ‘स्टीपलचेस’ स्पर्धेसाठी पात्र ठरलेला साबळे हा पहिला भारतीय अॅथलीट…
टोकियोत अविनाश साबळेला अंतिम फेरी अगदी कमी फरकानं चुकली, परंतु पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम सुधारण्याची संधी त्यानं सोडली नाही…त्यानंतर त्याचं नाव दुमदुमलं ते गेल्या वर्षीच्या बर्मिंगहॅममधील ‘राष्ट्रकुल खेळां’त. तिथं रौप्यपदक मिळविताना पाच महिन्यांत तिसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम नव्यानं रचत त्यानं 8 मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ नोंदवली. ‘कॉमनवेल्थ’मध्ये भारतानं या प्रकारात कमावलेलं ते पहिलं पदक…सुवर्णपदक जिंकणाऱ्या केनियाच्या अब्राहम किबिवोटपेक्षा तो फक्त 0.05 सेकंदांनी कमी पडला. मात्र याभरात त्यानं ‘राष्ट्रकुल’ची या शर्यतीतील सर्व पदकं लुटण्याच्या केनियन धावपटूंच्या परंपरेला खंडित करून दाखविलं. त्यापूर्वी 1994 मध्ये अशी कामगिरी केली होती ती कॅनडाच्या ग्रॅमी व्हिन्सेंट फेलनं…
नवनवीन उच्चांक करण्याची अविनाश साबळेला लागलेली सवय पुढंही कायम राहिली…गतवर्षी अमेरिकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो इथं ‘साऊंड रनिंग ट्रॅक मीट’मध्ये 13 मिनिटं 25.65 सेकंदांत शर्यत पूर्ण करताना पुऊषांच्या 5 हजार मीटर्समधील 30 वर्षं जुना राष्ट्रीय विक्रम त्यानं मोडला. त्यात यंदा भर टाकताना लॉस एंजलिसमधील ‘साऊंड रनिंग ऑन ट्रॅक फेस्ट’मध्ये ही वेळ त्यानं 13 मिनिटं 19.30 सेकंद अशी सुधारली…अन् आता त्यावर सरताज अशी चीनमधील आशियाई खेळांतील ताजी दुहेरी कमाई. अविनाश साबळेंच्या डोळ्यांपुढं असेल ते येत्या वर्षीचं पॅरिस ऑलिम्पिक !
सैन्यातून ‘अॅथलेटिक ट्रॅक’वर…
धावण्याचं कौशल्य पदरी असूनही अविनाश साबळेनं कधीच खेळामध्ये कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली नव्हती. उलट त्यानं आपल्या कुटुंबाला आधार करण्यासाठी लवकर सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. बारावी पूर्ण केल्यानंतर लगेच तो लष्कराच्या ‘5 महार रेजिमेंट’चा भाग बनला. पहिल्या दोन वर्षांतील नियुक्तीच्या अंतर्गत सियाचीन, राजस्थान, सिक्कीम अशा दोन टोकाच्या हवामानात सेवा बजावलेल्या साबळेनं एक खेळ या नजरेतून धावण्याकडे पाहण्यास सुरुवात केली ती 2015 साली सैन्याच्या अॅथलेटिक्स कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर…सुऊवातीला ‘क्रॉस कंट्री’ स्पर्धांसाठी त्याची निवड झाली आणि त्याच्या कौशल्याची झलक दिसण्यास फारसा वेळ लागला नाही…
‘क्रॉस कंट्री ते ‘स्टीपलचेस’…
अविनाश साबळेला लगेच सेनादलाच्या चमूत स्थान मिळून ‘राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धे’त जेतेपद मिळविलेल्या संघाचा तो भाग राहिला. त्या स्पर्धेतील वैयक्तिक शर्यतीत त्यानं मिळविलं पाचवं स्थान. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यापूर्वी त्यानं फक्त एक वर्ष प्रशिक्षण घेतलं होतं…2017 मधील एका शर्यतीदरम्यान लष्कराचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांच्या नजरेत त्याचं कौशल्य भरलं आणि त्याला ‘स्टीपलचेस’ प्रकारात उतरण्याचा सल्ला त्यांनी दिला…साबळे नि भारतीय अॅथलेटिक्ससाठीही हा निर्णय किती फायदेशीर ठरला ते वेगळं सांगण्याची गरज नाहीये…
लष्करातील हवालदार असलेल्या साबळेच्या यशात प्रशिक्षक अमरिश कुमार यांचीही मोलाची भूमिका रहिलीय…मध्यंतरी तो रशियन प्रशिक्षक निकोलाई स्नेसारेव्ह यांच्या हाताखली धडे गिरवू लागला होता. पण त्यांच्या कठोर पद्धती त्याला इतक्या पचनी पडल्या नाहीत की, काही काळ त्याच्या मनात धावणं सोडण्याचे विचार घोळू लागले होते…पण अविनाशनं धीर धरला आणि ‘ट्रॅक’ला रामराम ठोकण्याऐवजी स्नेसारेव्ह यांच्याशी काडीमोड घेऊन पुन्हा अमरिश कुमारचं साहाय्य घेतलं. या जोडीनं मग काम करायला सुरू केलं ते ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’वर अन् हळूहळू गती वाढविण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या हवामानात सराव करण्याचा मार्ग त्यांनी पत्करला. त्याची फळं लगेच दिसून आल्याशिवाय राहिली नाहीत…
खडतर मोसमानंतरचं घवघवीत यश…
अविनाश साबळेसाठी हे वर्ष काही कमी खडतर गेलं नव्हतं…मागील रविवारी आशियाई खेळांत पहिलं सुवर्णपदक पटकावण्यापूर्वी या मोसमात धावलेल्या पाच शर्यतींपैकी एकातही त्याच्या हाती पदक लागू शकलं नव्हतं. सर्वांत मोठी निराशा केली होती ती बुडापेस्टमधील जागतिक स्पर्धेनं. तिथं त्यानं ‘हिट्स’मध्ये 8 मिनिटं 22.24 सेकंद अशी वेळ नोंदवली होती आणि अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नव्हतं. जागतिक स्पर्धेतील हे त्याचं सलग दुसरं अपयश. गतवर्षी येवजेनी (अमेरिका) इथं साबळेच्या वाट्याला अंतिम फेरीत 11 वं स्थान आलं होतं अन् त्यानं नोंद केली होती ती 8 मिनिटं 31.75 सेकंद अशा धक्कादायक वेळेची…त्या दोन्ही शर्यतींमध्ये त्याचे डावपेच अंगलट आले. सुरुवातीला पुढं धावणाऱ्या अॅथलीटच्या मागं राहण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मागाहून वेग वाढविण्यात तो अपयशी ठरला होता…
स्वत:च्या वेगावर ठेवलेला विश्वास कामी…
चीनमध्ये परिस्थिती बदलली…कारण बर्मिंगहॅममध्ये स्वत:च्या पद्धतीनं शर्यतीत धावून यशाची चव चाखलेली असल्यानं अविनाश साबळेच्या शब्दांत सांगायचं झाल्यास तो आपल्या वेगावर विश्वास ठेवण्याचा निर्धार करूनच हांगझाऊमध्ये उतरला…‘माझ्यासाठी आतापर्यंत हे वर्ष चढउताराचं राहिलं होतं. त्यामुळं कोणत्याही परिस्थिती जिंकायचं असा निश्चय मी केला…मी सर्वोत्कृष्ट आहे असा विचार करूनच स्पर्धेत उतरलो. जागतिक स्पर्धेतून धडे मिळालेलेच होते. मी माझ्या परीनं सर्वोत्तम प्रयत्न करण्याचं ठरविलं…बर्मिंगहॅममध्ये मला जाणवलं की, माझ्याकडे चांगला नैसर्गिक वेग आहे. आता ऑलिम्पिकमध्येही मी हीच युक्ती वापरेन’, अमेरिकेच्या कॉलोराडो स्प्रिंग्सच्या उंचावरील भागात प्रशिक्षण घेणारा साबळे सांगतो…
खेळ जुनाच, ओळख नवी…‘कुराश’…
‘कुराश’ हे नाव ऐकल्यानंतर हा भला कसला खेळ असा प्रश्न अनेकांना पडल्यास त्यात नवल नाही. पण प्रत्यक्षात तो कुस्तीचा एक प्रकार, जो मध्य आशियात मोठ्या प्रमाणात खेळला जातो. ‘कुराश’ हा शब्द उझबेकिस्तानची मूळ भाषा उझबेकमधून आलाय…सध्या चीनमध्ये चालू असलेल्या आशियाई खेळांतही त्याचा समवेश करण्यात आलाय…
- या खेळात दोन स्पर्धकांमध्ये झुंज रंगते. त्यापैकी एकानं हिरवं जॅकेट आणि दुसऱ्यानं निळं जॅकेट परिधान केलेलं असतं. प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर फेकण्याचा प्रयत्न करणं हा खेळाडूंचा उद्देश असतो…
- प्रतिस्पर्ध्याला त्याच्या बाजूने फेकण्यासाठी गुण दिले जातात. जर एखाद्या स्पर्धकानं त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला त्याच्या पाठीवर फेकून दिलं, तर त्याचा परिणाम झटपट विजय नोंदविण्यात होतो…
- ‘कुराश’नं 2018 साली आशियाई खेळां’मध्ये पदार्पण केलं. पुऊषांच्या विभागात 66 किलो, 81 किलो, 90 किलो आणि 90 किलोंवर अशा चार वजनी गटांमध्ये, तर महिलांच्या विभागांत 52 किलो, 63 किलो व 78 किलो अशा तीन वजनी गटांमध्ये त्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली…
- हांगझाऊमध्येही सात सुवर्णपदकांसाठी झुंजी रंगल्या. त्यात पुऊषांचे वजनी गट मागील स्पर्धेसारखेच राहिले, तर महिलांचे 63 किलो आणि 78 किलो हे वजनी गट अनुक्रमे 70 किलो व 87 किलो असे बदलण्यात आले…
- सध्या चालू असलेल्या आशियाई खेळांत सहभागी झालेल्या भारताच्या ‘कुराश’ संघात सहा स्पर्धकांचा समावेश होता. त्यात तीन पुऊष आणि तीन महिलांचा अंतर्भाव राहिला…हे भारतीय खेळाडू पाच वजनी गटांत उतरले. त्यापैकी सुचिका तारियाल आणि पिंकी बलहारा यांचा सहभाग महिलांच्या 52 किलो वजनी गटात राहिला…जकार्ता इथं 2018 मध्ये झालेल्या आशियाई खेळांत पिंकीनं रौप्यपदक मिळवून दाखविलं होतं. यावेळी तिचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं…
– राजू प्रभू
सौंदर्यवान, वेगवान हरमिलनचा जलवा
800 आणि 1500 मीटरमध्ये रौप्य पदकाला गवसणी, माता-पित्याचा देदीप्यमान वारसा चालवतेय
विनायक भोसले /कोल्हापूर
चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना पदकांची लयलूट केली आहे. सर्वच क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना उल्लेखनीय योगदान दिले आहे. यातच अॅथलेटिक्समध्ये देखील भारतीय खेळाडू मागे नाहीत. यामध्ये विशेष नाव घ्यावे लागेल ते म्हणजे पंजाबची 25 वर्षीय युवा अॅथलिट हरमिलन कौर बेन्स. सौंदर्यापेक्षाही प्रबळ इच्छाशक्ती आणि हरणाचे चापल्य दाखवत हरमिलनने यंदाच्या आशियाई स्पर्धेत 800 मी व 1500 मी शर्यतीत रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. स्वत:च्या आईकडून बाळकडू मिळालेल्या हरमिलनचे हे आशियाई स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.
पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील महिलपूरची रहिवासी असणाऱ्या हरमिलनला बालपणापासूनच अॅथलेटिक्सचा वारसा मिळाला आहे. हरमिलनची आई माधुरी व वडील अमनदीप सिंग हे दोघेही आंतरराष्ट्रीय अॅथलिट आहेत. या दोघांचाही वारसा हरमिलनला मिळाला असून पतियाला येथील राष्ट्रीय अकादमीत सराव करत असताना तिनेही बरीच मेहनत घेतली आहे. बालपणापासूनच आई व वडिलांच्या मेडलसोबत खेळत असणारी हरमिलन आपले आई व वडिलच आदर्श असल्याचे सांगते. 1997 साली माधुरी सक्सेना यांना पतियाला येथील पंजाब राज्य विद्युत मंडळात नोकरीसाठी चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. तेव्हा त्या गर्भवती होत्या. परंतु माधुरी यांनी 800 मीटर आणि 1500 मीटर शर्यतींमध्ये आपली ताकद दाखवून ही नोकरी मिळवली. सात महिन्यांनंतर त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. या जोडप्याने तिचे नाव हरमिलन ठेवले. चार वर्षांनंतर माधुरी यांनी 2002 बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकत विश्वास सार्थ ठरवला. विशेष म्हणजे, हरमिलनचे वडील अमनदीप सिंग हे 1996 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 1500 मीटर स्पर्धेतील पदक विजेता आहेत.
बालपणापासूनच अॅथलेटिक्सची आवड
माधुरी व अमनदीप हे दोघेही आंतरराष्ट्रीय अॅथलिट असल्याने सातत्याने बाहेर असायचे. आपल्या मुलगीने देखील 800 आणि 1500 मीटर या दोन्ही स्पर्धेत नावलौकिक करावा अशी त्यांची इच्छा होती. अर्थात, या दोघांनीही तिला चांगलेच पाठबळ दिले. अशाच एका प्रसंगाची हकीकत अमनदीप यांनी सांगितली आहे. हरमिलन जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही दोघेही स्पर्धेच्या निमित्ताने बाहेर असायचो. 2002 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत माधुरी यांनी रौप्यपदक जिंकले. मायदेशी परतल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले. जेव्हा त्या घरी आल्या की हरमिलन त्यांची पदक सोडत नसे आणि तासनतास त्याच्याशी खेळत असे. यानंतर तब्बल 21 वर्षांनंतर, हरमिलनने हांगझाऊ आशियाई स्पर्धेत आई व वडिलांचा वारसा चालवत 800 व 1500 मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
मांडीवर टॅटू आणि कुरळे केस
आपल्या बिनधास्त स्वभावाने ओळखली जाणारी हरमिलन अवघ्या 23 वर्षाची आहे. ती सध्या आरबीआय चंदीगडमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, हरमिलन चपळाईबरोबरच सौंदर्याचा अप्रतिम संगम आहे. तिच्या उजव्या मांडीवर सिंहाचा टॅटू आहे, जो तिची शक्ती आणि निर्भय प्रतिमा देखील दर्शवितो. कुरळे केस असणारी हरमिलन सोशल मीडियावर देखील बरीच अॅक्टिव्ह असून तिचे फॉलोअर्स देखील लाखाच्या घरात आहेत.
सरावात सातत्य अन् पदकाला गवसणी
हरमिलन ही पतियाला येथील राष्ट्रीय अकादमीत सराव करते. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी तिने चार महिने यूकेत जाऊन सराव केला. तिथून परत आल्यावर ती भारताच्या शिबिरात दाखल झाली. यानंतर एशियन गेम्समध्ये सहभागी होताना तिने 800 मी मध्ये 02:03:20 सेकंद तर 1500 मी शर्यतीत 04:12:74 सेकंदासह रौप्यपदकाची कमाई केली. अवघ्या 25 व्या वर्षी तिने मिळवलेल्या या यशाचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. आता, पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत दोन्ही प्रकारात सुवर्ण जिंकण्याचे ध्येय असल्याचे ती सांगते.
हरमिलनची अॅथलेटिक्समधील कामगिरी –
- चीनमधील आशियाई स्पर्धेत 800 व 1500 मी शर्यतीत रौप्य (2023)
- भुवनेश्वर येथील आंतरराज्य अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 800 व 1500 मी शर्यतीत रौप्य (2023)
- वारंगळ, आंध्र प्रदेश येथील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये 1500 मी शर्यतीत 04:05:39 सेकंद वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम (2021).









