‘ओल्ड हॉर्स’…रोहन बोपण्णा!
टेनिसच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी भारतीय खेळाडूंपैकी एक असलेल्या रोहन बोपण्णानं यंदा वयाच्या 43 व्या वर्षी कमालीची जबरदस्त कामगिरी करून दाखविलीय…या आठवड्याच्या अखेरीस भारतातर्फे आपली 50 वी नि शेवटची ‘डेव्हिस चषक’ लढत लढण्यास तो सिद्ध झालाय…
रामनाथन कृष्णन, विजय अमृतराज, रमेश कृष्णन असे खेळाडू असले, तरी भारत हा टेनिसससाठी कधी विख्यात नव्हताच…ही प्रतिमा बदलण्याचं काम केलं ते लिएंडर पेस, महेश भूपती अन् सानिया मिर्झा यांनी. त्यांच्या जोडीला आणखी एक नाव बऱ्याच काळापासून या क्षेत्राचं आधारस्तंभ बनून राहिलंय…भूपती-पेस यांच्याप्रमाणं त्याचाही हातखंडा तो दुहेरीतच. त्यांच्याइतकं ग्लॅमर, प्रसिद्धी, लोकप्रियता नि यश त्याच्या वाट्याला भलेही आलेलं नसलं, तरी तो देखील काही कमी नाहीये. त्याच्या तिजोरीत भरलाय एक ‘ग्रँडस्लॅम’ किताब, 24 ‘एटीपी’ दुहेरी विजेतेपदं अन् ‘आशियाई खेळां’तील झळाळतं सुवर्णपदक…डेव्हिस चषक स्पर्धेतील भारतीय संघाचा तो मागील दोन दशकांपासून अविभाज्य भाग राहिलाय अन् सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याच्या वयाच्या इतर अनेक खेळाडूंनी रॅकेट खाली ठेवून ‘कोर्ट’ला कधीच रामराम ठोकलेला असला, तरी तो मात्र बहरत चाललाय…रोहन बोपण्णा !
6 फूट 4 इंच उंचीच्या बोपण्णानं वयाची चाळिशी कधीच ओलांडलीय, पण त्याच्या खेळावर त्याचा परिणाम झाल्याचं, त्याचा वेग मंदावल्याचं दिसून येत नाही. उलट त्यानं व्यावसायिक टेनिसमध्ये मिळविलेल्या यशांपैकी अनेकांची नोंद झालीय ती पस्तीशी ओलांडल्यानंतर…बेंगळुरात 4 मार्च, 1980 रोजी जन्मलेल्या रोहन बोपण्णाचं बालपण गेलं ते कूर्गमध्ये. तिथं त्याच्या कुटुंबाकडे कॉफीच्या मळ्याची मालकी होती…बोपण्णाचे पालक 1975 साली ‘विम्बल्डन’ला गेले असता हा खेळ त्यांची मनं जिंकल्याशिवाय राहिला नाही. त्यातून त्यांनी कूर्गमध्ये आठ ते दहा सदस्यांचा क्लब स्थापन करून दोन ‘क्ले कोर्टं’ उभारली (जी आजही उभी आहेत). त्यावेळी रोहन ‘बॉल बॉय’ म्हणून कोर्टवर वावरायचा. परंतु लवकरच वडिलांनी त्याला रॅकेट उचलण्यास उद्युक्त केलं…हॉकी नि फुटबॉलमध्ये हात आजमावून पाहिल्यानंतर उशिरा म्हणजे वयाच्या 11 व्या वर्षी त्यानं टेनिस खेळण्यास सुरुवात केली अन् 19 व्या वर्षी निर्णय घेतला तो त्यात झोकून देण्याचा, या खेळातच आपली कारकीर्द घडविण्याचा…
कनिष्ठ गटात यशाचा आनंद घेतल्यानंतर रोहन बोपण्णानं 1999 मध्ये वरिष्ठ स्तरावर पदार्पण केलं अन् 2003 साली तो व्यावसायिक खेळाडू बनला. खरं तर त्याच्या वरिष्ठ कारकिर्दीची सुऊवात फारशी चांगली नव्हती. एकेरीतील मोहिमा एक तर पात्रता फेरीत संपायच्या अन् दुहेरीतील धाव फार तर उपांत्यपूर्व फेरीपर्यंत जाऊन संपायची…मात्र योग्य वेळी त्यानं अंगातील प्रतिभा दाखवायला सुऊवात केली अन् सुऊवातीच्या काळात जरी तो एकेरीमध्ये खेळलेला असला, तरी त्यानं नाव कमावलं ते दुहेरीत. कारकिर्दीतील सर्व प्रमुख विजेतेपदं बोपण्णानं पटकावली ती त्याच गटात. त्यामुळं त्याला ‘डबल्स स्पेशालिस्ट’ मानलं जातंय… 2002 पर्यंत रोहन बोपण्णाच्या टेनिस कारकिर्दीला अधिक ठोस वळण मिळालं. त्या वर्षी ‘आयटीएफ फ्युचर्स’ स्तरावर यश मिळविण्याबरोबर ‘डेव्हिस चषक’ आणि ‘आशियाई खेळां’मध्ये पदार्पण झालं. 2002 च्या ‘टाटा ओपन’मधील पुऊषांच्या दुहेरी गटात स्पॅनिश जोडीदार कार्लोस कुआड्राडोसह त्याला ‘वाईल्ड कार्ड एंट्री’ देण्यात आली होती. जरी या दोघांना पहिल्याच सामन्यात स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं असलं, तरी एखाद्या ‘एटीपी’ स्पर्धेच्या मुख्य ‘ड्रॉ’मध्ये झळकण्याची बोपण्णाची ही पहिलीच खेप होती…
2006 साली रोहन बोपण्णानं ‘ग्रँडस्लॅम’मध्ये पदार्पण केलं ते ‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या माध्यमातून. तिथं तो एकेरी गटात सहभागी झाला होता. त्यानं त्याच वर्षाच्या शेवटी सानिया मिर्झासह ‘आशियाई हॉपमन चषका’चा (2007 च्या ‘हॉपमन चषका’साठीची पात्रता स्पर्धा) मिश्र दुहेरीतील किताब पटकावण्यात यश मिळविलं. बोपण्णानं 2007 मध्ये देखील हाच फॉर्म चालू ठेवताना पाच ‘चॅलेंजर विजेतेपदं’ खात्यात जमा केली. त्यापैकी चार दुहेरी गटांत, तर एक एकेरीत…
‘लोअर-टायर चॅलेंजर सर्किट’मध्ये काही विजेतेपदांची कमाई केल्यानंतर रोहन बोपण्णानं अखेरीस ‘एटीपी’ स्तरावरील पहिलं जेतेपद प्राप्त केलं ते 2008 मध्ये. त्यावेळी अमेरिकी साथीदार एरिक बुटोराकसह त्यानं ‘लॉस एंजेलिस ओपन’ जिंकली…2012 हे बोपण्णाच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचं वर्ष. सिनसिनाटीतील ‘मास्टर्स 1000’ (आता प्रायोजकत्वाच्या कारणांमुळं ‘वेस्टर्न अँड सदर्न ओपन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) स्पर्धेत त्यानं महेश भूपतीसोबत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. तिथं किताब मिळविता आला नसला, तरी या जोडीनं त्या वर्षाच्या शेवटी ‘पॅरिस मास्टर्स’चं विजेतेपद मात्र जिंकून दाखविलं (रोहनचं दुसरं). या घोडदौडीच्या जोरावर 2013 साली त्यानं ‘एटीपी’च्या पुऊष दुहेरीतील क्रमवारीत चक्क तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली. हे त्याला मिळालेलं आजवरचं सर्वोच्च स्थान… चार वर्षांनंतर रोहन बोपण्णानं 2017 सालच्या ‘फ्रेंच ओपन’च्या मिश्र दुहेरी गटात कॅनेडियन टेनिसपटू गाब्रिएला डाब्रोवस्कीसह प्रवेश केला त्यावेळी ते किताब पटकावून जातील असं कुठल्याही तज्ञाला स्वप्नात देखील वाटलेलं नसेल. परंतु या ‘इंडो-कॅनेडियन’ जोडीनं अॅना-लेना ग्रोनेफेल्ड नि रॉबर्ट फराह यांच्याविरुद्धचा अंतिम सामना जिंकून सर्वांनाच धक्का दिला…बोपण्णाचं ते पहिलं ‘ग्रँडस्लॅम’ जेतेपद. त्यासरशी तो ‘ग्रँडस्लॅम’ जिंकणाऱ्या लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांच्या ‘एलिट’ यादीत समाविष्ट होणारा चौथा भारतीय बनला…
‘कोविड-19’मुळं सारं जग ठप्प झाल्यानंतर रोहन बोपण्णानं धमाकेदार पुनरागमन केलं ते गेल्या वर्षी ‘फ्रेंच ओपन’मध्ये. डच टेनिसपटू मॅटवे मिडलकूपसमवेत त्यानं प्रथमच पुऊष दुहेरीतून त्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. 2015 च्या ‘विम्बल्डन’नंतर पुऊष दुहेरीत एखाद्या ‘ग्रँडस्लॅम’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पाऊल ठेवण्याची त्याची ती पहिलीच खेप होती…त्यानंतर यंदा बोपण्णाची कामगिरी त्याहीपुढं गेलीय, अधिक झळाळती राहिलीय!
पाकच्या कुरेशीसमवेत जुळलेली जोडी…
- 2003 मध्ये रोहन बोपण्णाचे पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हक कुरेशीसोबत जुळलेले सूर पुढं बरेच गाजले, ही भागीदारी त्याच्यासाठी विशेष फलदायी ठरली. ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ या नावानं ओळखल्या गेलेल्या या जोडीकडे भारत-पाक मैत्रीचा संदेश कोर्टवर पसरविणारे खेळाडू या नजरेनंही पाहिलं गेलं…त्यांनी त्या वर्षी ‘डेन्व्हर चॅलेंजर’ स्पर्धा जिंकल्यानं बोपण्णाच्या हातात पहिलं ‘एटीपी चॅलेंजर सिरीज’ विजेतेपद पडलं. मात्र या आनंदावर बराच काळ त्रास दिलेल्या दुखापतींनी विरजण टाकलं…
- बोपण्णा-कुरेशीसाठी सर्वांत यशस्वी काळ राहिला तो 2010 ते 2014 दरम्यानचा. या कालावधीत त्यांनी पाच जेतेपदं जिंकली. त्यात 2011 मधील ‘पॅरिस मास्टर्स’चाही समावेश होतो. रोहनचं ते पहिलं ‘एटीपी मास्टर्स विजेतेपद’. त्यापूर्वी 2010 साली त्यानं ‘अमेरिकन ओपन’च्या माध्यमातून एखाद्या ‘ग्रँडस्लॅम’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच प्रवेश केला त्यावेळीही त्याच्या साथीला होता तो कुरेशीच…
वाढत्या वयाला दाद न देता यंदा कमाल…
- रोहन बोपण्णानं 24 ‘एटीपी’ दुहेरी विजेतेपदं जिंकलीत, त्यापैकी पाच मास्टर्स (एटीपी 1000) स्पर्धेतील…यंदा बोपण्णानं ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डनसोबत नवीन भागीदारी सुरू केली. या दोघांनी ‘कतार एक्झॉनमोबिल ओपन’मध्ये पहिल्या विजेतेपदाची कमाई केली. त्यामुळं तो सर्वांत वयस्कर ‘एटीपी मास्टर्स चॅम्पियन’ बनला…
- रोहन बोपण्णानं यंदा एब्डनसमवेत ‘इंडियन वेल्स मास्टर्स’चा किताबही आपल्या नावावर जमा केला. त्यामुळं कॅनडाच्या डॅनियल नेस्टरच्या विक्रमाला मागं टाकत ‘एटीपी 1000 मास्टर्स’ विजेतेपद जिंकणारा इतिहासातील सर्वांत वयस्कर टेनिसपटू बनण्याचा मान वयाच्या 43 व्या वर्षी त्याच्याकडे चालून आला. बोपण्णाचा एकेकाळी साथीदार राहिलेल्या नेस्टरनं 2015 साली ‘सिनसिनाटी मास्टर्स’ जिंकली होती त्यावेळी त्याचं वय होतं 42 वर्षं…
- बोपण्णानं 2018 साली ‘ऑस्ट्रेलियन ओपन’च्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत तिमिया बाबोससमवेत प्रवेश केला होता. त्यानंतर पाच वर्षांनी यंदा त्यानं त्या कामगिरीची पुनरावृत्ती करून दाखविली ती सानिया मिर्झासह…हे कमी म्हणून की काय, त्यानं नुकत्याच झालेल्या ‘अमेरिकन ओपन’मध्ये एब्डनसह पुऊष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक दिली आणि ‘ओपन’ युगातील एखादा ‘ग्रँडस्लॅम’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाऊल ठेवणारा सर्वांत वयस्कर पुऊष टेनिसपटू (वय 43 वर्षे आणि सहा महिने) बनत इतिहासाच्या पुस्तकात नोंद केली. बोपण्णाला वरील तिन्ही अंतिम फेऱ्यांत विजयश्री मात्र खेचून आणता आली नाही…
- सात वर्षांनंतर यंदा ‘एटीपी’च्या दुहेरीतील क्रमवारीतील पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळविण्यात रोहननं यश मिळविलंय (सध्याचा क्रमांक सातवा)…
ऑलिम्पिक, आशियाई खेळ व ‘डेव्हिस चषक’
- रोहन बोपण्णानं लंडनमधील 2012 च्या अन् रिओतील 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. 2012 साली पुऊष दुहेरीत महेश भूपतीसमवेत खेळताना त्याचं आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आलं, तर 2016 मध्ये लिएंडर पेस-बोपण्णा जोडी सुऊवातीच्या फेरीतच गारद झाली. तथापि, ‘रिओ ऑŸलिम्पिक’मध्ये मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या संगतीनं त्यानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तिथं अमेरिकेच्या राजीव राम व व्हीनस विल्यम्ससमोर त्यांना हात टेकावे लागले. कांस्यपदकासाठीच्या लढतीतही या भारतीय जोडीला लुसी राडेका-राडेक स्टेपानेक या झेक दुक्कलीनं हरवल्यानं त्यांना ऐतिहासिक पदक हुकलं…
- ‘अर्जुन पुरस्कार’विजेता बोपण्णा 2002 मध्ये पदार्पण केल्यापासून भारताच्या ‘डेव्हिस चषक’ संघाचा अविभाज्य सदस्य राहिलाय. या स्पर्धेत तो 22 सामने जिंकलाय, तर 27 गमवावे लागलेत…
- इंडोनेशियात 2018 साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये रोहन बोपण्णा नि दिविज शरण जोडीनं भारताला पुऊष दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई करून दिली…
‘मोटो जीपी’चा थरार आता भारतातही
हॉकी, बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस यासह अनेक खेळात दबदबा निर्माण केल्यानंतर फॉर्म्युला वन शर्यतीचे आयोजन करत जागतिक पातळीवर भारताने आपले लक्ष वेधून घेतले होते. यामुळेच विविध खेळांच्या स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा जगभरातील क्रीडा संघटनांचा प्रयत्न सुरु आहे. काही वर्षांपूर्वी नोएडातील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर फॉर्म्युला-1 ही वेगवान गाड्यांची स्पर्धा झाली होती. फेरारी, रेड बुल, मर्सिडीज, रेनॉल्ट या संघांनी वाऱ्याच्या वेगाने कार चालवताना कमालीचे कौशल्य दाखवले होते. आता याच ठिकाणी मोटारबाइक्सची सर्वांत मोठी स्पर्धा असलेल्या ‘मोटो जीपी’मधील एक रेस रंगणार आहे. भारतात प्रथमच मोटो जीपीमधील रेसचे आयोजन केले जाणार असून बाईकवेड्या युवकांसाठी ही रेस पाहण्याची नामी संधी असेल.
मोटो जीपी ग्रां प्रि आयोजित करणारा भारत 31 वा देश ठरणार असून या शर्यतीला ‘ग्रां प्रि ऑफ इंडिया’ (भारतीय ग्रां प्रि) असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, मोटो जीपीच्या एकूण 20 शर्यतींपैकी एक शर्यत यंदा उत्तर प्रदेशातील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर होणार आहे. ही शर्यत 22 ते 24 सप्टेंबर या कालावधीत होईल. 24 सप्टेंबरला मुख्य शर्यत पार पडेल.
‘मोटो जीपीचा प्रसार अधिक देशांत व्हावा या हेतूने यंदा भारतात शर्यत घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, दोनच दिवसापूर्वी भारताने जी-20 परिषदेचे यशस्वी आयोजन करत आपले वर्चस्व दाखवले होते. या शर्यतीत जी-20 देशापैकी 12 देश या शर्यतीत सहभागी होणार आहेत. अर्थात, भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे नवे प्रेक्षक, नवा चाहतावर्ग निर्माण होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या शर्यतीचे आयोजन केल्याने उत्तर प्रदेशात सुमारे 1000 कोटींची आर्थिक उलाढाल होणार असून पाच हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत, हे सर्वात महत्वाचे असणार आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत 12 शर्यती झाल्या आहेत. सध्या या स्पर्धेचा युरोपातील टप्पा सुरु आहे. त्यानंतर आशियातील शर्यतींना सुरुवात होईल. भारतात होणारी शर्यत ही या हंगामातील 13 वी शर्यत असेल. भारतानंतर जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया आणि कतार या आशियातील अन्य केंद्रांवरही शर्यती होणार आहेत.
हे रायडर ठरणार प्रमुख आकर्षण
गतविजेता फ्रँचेस्को बाग्नाइआ (डुकाटी लेनोव्हो टीम), होर्गे मार्टिन (प्रिमा प्रमॅक रेसिंग), मार्को बेझ्झेची (मूनी व्हीआर 46 रेसिंग टीम) आणि योहान झार्को (प्रिमा प्रमॅक रेसिंग) या रायडर्समध्ये सध्या अव्वल स्थानांसाठी चढाओढ सुरु आहे. शनिवारी इटलीतील सॅन मारिनो जीपी शर्यतीत मार्टिनने अव्वलस्थान मिळवताना कमालीची वेळ नोंदवली होती. याशिवाय डुकाटीचा फ्रान्सिस्को बगानिया, रेड बुलचा डॅनी पेड्रोसा यांनीही दमदार कामगिरी केली आहे. यामुळे यांच्यातील स्पर्धा हेच चाहत्यांसाठी प्रमुख आकर्षण असणार आहे. भारतात 2011 ते 2013 या कालावधीत फॉर्म्युला-1 च्या तीन शर्यती झाल्या होत्या आणि या शर्यतींना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. यामुळे आता मोटो जीपीलाही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे.
युरोप, अमेरिकेत मोटारबाईक्सची धूम
‘मोटो जीपी’ अर्थात ग्रां प्रि मोटारसायकल रेसिंग. आतापर्यंत युरोप, अमेरिकेत या मोटारबाईक्सची मोठी धूम असून याठिकाणी याला मोठा चाहता वर्ग आहे. दहा लॅपच्या या शर्यतीत होंडा, यामाहा, रेड बुल आणि सुझुकी या कंपन्यांच्या बाईक्सनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. कमालीचा वेग गाठत अवघ्या काही सेकंदात शर्यत पूर्ण करणाऱ्या या नामांकित संघांनी युरोप, अमेरिकेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. आता, बुम, बुम, बुम असा आवाज करत वेगात जाणाऱ्या मोटारबाईक्सची शर्यत भारतात होणार आहे. यामुळे या शर्यतीकडे बाईकवेड्यासह देशातील अनेक चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यातच भारतासारख्या देशात अशी शर्यत प्रथम होत असल्याने याला महत्व प्राप्त झाले आहे.
असे असतील तिकिटांचे दर
दरम्यान, या महिन्यात 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी तगडी तयारी सुरु असून या शर्यतीसाठी तितकेच तगडे तिकीट असणार आहे. मोटो जीपीसाठी एकूण 11 प्रकारची तिकिटे आहेत. या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात झाली असून आयोजकांकडून पहिले तिकीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना देण्यात आले आहे. या शर्यतीसाठी 800 रुपयांपासून ते 40 हजार रुपयांपर्यंतची तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वांना परवडणारी तिकिटे 800 रुपयांपासून सुरु होत आहेत, तर मुख्य ग्रँडस्टँड तिकिटे 20 ते 30 हजारांपर्यंत आहेत आणि लक्झरी प्लॅटिनम कॉर्पोरेट बॉक्स सीट्सची किंमत 40 हजार इतकी आहे.
– विनायक भोसले
खेळ जुनाच ओळख नवी ! ‘स्टीपलचेस’
‘स्टीपलचेस’ ही ‘ट्रॅक अँड फिल्ड’ प्रकारातील एक शर्यत असून यामध्ये धावपटूंना धावताना विविध प्रकारचे अडथळे पार करावे लागतात. या खेळाच्या आधुनिक आवृत्तीचा उगम हा ‘क्रॉस-कंट्री स्टीपलचेस’पासून झाला, जी घोड्यांच्या शर्यतीतील ‘स्टीपलचेस’ पाहून साकार झाली होती. या खेळाचे मूळ लपले आहे ते ब्रिटनच्या भूमीत. एकेकाळी त्यात भिंती नि पाण्याच्या कमी प्रवाहावरून उड्या मारल्या जायच्या. 19 व्या शतकातील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शर्यतीत या ’नैसर्गिक’ अडथळ्यांची जागा निश्चित अडथळे आणि ख•s यांनी घेतली…
- ‘स्टीपलचेस’ शर्यत ही सहसा 3 हजार मीटर अंतराची असते. यात 28 अडथळे आणि पाण्याचे सात टप्पे असतात. 18 अडथळे आणि पाण्याचे पाच टप्पे असलेले 2 हजार मीटरचे अंतर देखील काही वेळा वापरले जाते…
- या शर्यती पुऊष आणि स्त्रिया या दोघांसाठी आयोजित केल्या जातात, परंतु स्त्रियांसाठी वापरले जाणारे अडथळे हे पुऊष धावपटूंकरिता वापरल्या जाणाऱ्या अडथळ्यांपेक्षा किंचित लहान असतात. पुऊषांच्या स्पर्धेतील स्थिर अडथळा 914 मिलीमीटर, तर महिला गटासाठी तो 762 मिलीमीटर उंच असतो…
- हर्डलसह ‘वॉटर जंप’ टप्प्याची लांबी 3.66 मीटर्स असते. हे ख•s अशा प्रकारे आखलेले असतात की त्यांचा वरचा भाग हा चढणीचा असतो आणि अडथळ्याजवळ पाणी अधिक खोल असते…
- जरी ‘स्टीपलचेस’ शर्यत इतर शर्यतींसारखी ‘ट्रॅक’वर आयोजित केली जात असली, तरी पाण्यातून उडी मारून धावण्याचा टप्पा हा ‘ट्रॅक’वर ठेवला जात नाही. हा अडथळा वळणाच्या बाहेर किंवा वळणाच्या आंत ठेवलेला असतो. धावपटूंना शर्यतीदरम्यान कोणतीही ‘लेन’ राखण्याची आवश्यकता नसते…
- ‘स्टीपलचेस’ हा ऑलिम्पिकमधील ‘ट्रॅक अँड फिल्ड’च्या 24 प्रकारांपैकी एक असून जरी तो प्रथम 1900 च्या ऑलिम्पिकमध्ये सादर करण्यात आला असला, तरी त्यावेळी धावपटूंनी 2400 मीटर आणि 4000 मीटरचे अंतर कापले होते. 1920 पासून ऑलिम्पिकमध्ये पुऊषांसाठी आधुनिक 3000 मीटर्सचे अंतर सुरू झाले. 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकपासून त्यात महिलांच्या ‘स्टीपलचेस’ शर्यतीची भर पडली…
- जागतिक स्पर्धेसह सर्व प्रमुख ‘ट्रॅक अँड फील्ड’ स्पर्धांचा हा प्रकार एक भाग असून इतर अनेक दीर्घ पल्ल्याच्या शर्यतींप्रमाणे यातही केनियाच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आलेले आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकचा अपवाद वगळता (त्यावेळी मोरोक्कोच्या धावपटूने बाजी मारली) 1984 पासून ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक जिंकले आहे ते त्यांनीच…
- प्रत्येक धावपटूला अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी अडथळे आणि पाण्याचे टप्पे पार करावे लागतात. यात सातपेक्षा किंचित जास्त फेऱ्या असतात आणि थोडे अंतर अडथळ्यांविना असते. सात फेऱ्यांपैकी प्रत्येकाचे प्रमाणित अंतर 400 मीटर्सचे असते. विशेष म्हणजे ‘हर्डल्स’च्या शर्यतीप्रमाणे ‘स्टीपलचेस’मधील अडथळ्यांची स्थिती नसते. ते स्थिर व पक्के असल्याने त्याच्यावर आदळल्यास ते त्यांच्या स्थानावरून हलत नाहीत…
- आगामी ‘आशियाई खेळां’च्या दृष्टीने भारताच्या साऱ्या आशा टिकल्याहेत त्या राष्ट्रीय विक्रमवीर नि राष्ट्रकुल खेळांत रौप्यपदक जिंकलेल्या अविनाश साबळेवर…
– राजू प्रभू









