झिम्बाब्वेचा ‘सुपरस्टार’ हिथ स्ट्रीक !
हिथ स्ट्रीक म्हणजे जगातील दिग्गज अष्टपैलूंची यादी ज्याच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही असा झिम्बाब्वेचा खेळाडू…मैदानात त्यानं अनेकदा झुंजार वृत्तीचं दर्शन घडवत अर्धशतकी खेळी केलेल्या असल्या, तरी कर्करोगानं त्याला वयाची पन्नाशीही ओलांडू दिली नाही…क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास स्ट्रीकनं रामराम ठोकल्यानंतर ‘टी-20’चा उदय झाला, ‘आयपीएल’ सारख्या लीग जगभर बोकाळल्या…
हिथ स्ट्रीक…नव्वदच्या दशकातील झिम्बाब्वे संघातील प्रमुख मोहरा…16 मार्च, 1974 रोजी जन्मलेल्या या खेळाडूचे वडील डेनिस हेही क्रिकेटपटू. ते ऱ्होडेशियाकडून खेळायचे. हिथ खेळू लागेपर्यंत त्या देशाचं नाव झिम्बाब्वे बनलं…त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते 1993 साली भारतात खेळल्या गेलेल्या ‘हीरो कप’ या पाच संघांच्या स्पर्धेतून. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा बेंगळूर येथील तो सामना पूर्ण होऊ शकला नाही…स्ट्रीकला त्याच वर्षी कराचीमध्ये पाकिस्तानविऊद्ध कसोटी खेळण्याची संधी मिळाली आणि रावळपिंडीतील पुढच्याच सामन्यात आठ बळी घेत त्यानं आपल्या नावाची सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं. पाकिस्तान हा त्याचा पुढं एक आवडता प्रतिस्पर्धी राहिला. कसोटींत इतर कोणत्याही संघापेक्षा त्यानं सर्वाधिक 44 बळी घेतले ते त्यांच्याविरुद्धच…
हिथ स्ट्रीकनं त्याच्या नवव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविऊद्ध पहिलं अर्धशतक झळकावलं, तर त्याचं एकमेव कसोटी शतक 2003 मध्ये हरारे येथे नोंदलं गेलं ते वेस्ट इंडिजविऊद्ध…स्ट्रीकच्या कारकिर्दीत झिम्बाब्वेनं जिंकलेल्या आठही कसोटींत त्याची मोलाची भूमिका राहिली. खेरीज तो एकदिवसीय संघाचा मुख्य आधार बनला आणि 1996, 1999 तसंच 2003 अशा तीन विश्वचषकांमध्ये खेळला…
हिथ स्ट्रीककडे 2000 साली झिम्बाब्वेच्या कर्णधारपदाची धुरा चालून आली. परंतु पुढच्याच वर्षी त्यानं आपल्या कामगिरीवर नेतृत्वाच्या बोजाचा परिणाम होत असल्याचं सांगत पहिल्यांदा राजीनामा दिला. प्रत्यक्षात त्यावेळी पडद्यामागं शिजणारं देशातील राजकारण त्यास कारणीभूत होतं…राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्या कार्यकाळात नव्या सहस्रकाच्या सुरुवातीला राबविण्यात आलेल्या जमीन सुधारणांच्या अंतर्गत ज्या श्वेतवर्णियांना लक्ष्य बनविण्यात आलं त्यात त्याच्याही कुटुंबाचा समावेश होता. त्यामुळं 70 टक्क्यांपेक्षा जास्त शेतजमिनीवर त्याला पाणी सोडावं लागलं…
हिथ स्ट्रीकनं 2002 मध्ये पुन्हा कर्णधारपदाचा भार स्वीकारला आणि 2003 सालच्या विश्वचषकात नेतृत्वही केलं (त्यावेळी झिम्बाब्वे स्पर्धेचा सहयजमान होता). तथापि, अडचणी कधीच दूर झाल्या नाहीत आणि 2004 मध्ये क्रिकेट मंडळाशी वाजल्यानंतर स्ट्रीकनं दुसऱ्यांदा कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिली. यावेळी 13 इतर श्वेतवर्णीय खेळाडूंनी देखील बाहेरची वाट धरल्यानं झिम्बाब्वेला अननुभवी खेळाडूंना घेऊन राष्ट्रीय संघाची पुनर्बांधणी करावी लागली…परंतु हिथ स्ट्रीक हा त्यापैकी असा एकमेव खेळाडू होता जो राष्ट्रीय संघात परतला आणि पुढच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यानं पुनरागमन केलं. त्यानंतर 2005 साली वयाच्या 32 व्या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…
हिथ स्ट्रीक पुढं वॉरविकशायरसाठी खेळायला जाऊन 2007 मध्ये क्लब सोडण्यापूर्वी त्यानं अल्पकाळ त्याचं कर्णधारपद सुद्धा सांभाळलं. सुभाष चंद्रा यांच्या अल्पजीवी ठरलेल्या ‘इंडियन क्रिकेट लीग’मध्ये खेळण्यासाठी त्यानं ‘अहमदाबाद रॉकेट्स’सोबत करार केला होता. तेथून झिम्बाब्वेला परतल्यावर त्यानं प्रशिक्षणात लक्ष घातलं अन् 2009 मध्ये राष्ट्रीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली. 2011 साली झिम्बाब्वेनं सहा वर्षांच्या वनवासानंतर कसोटीत पुनरागमन केलं खरं, पण 2013 मध्ये स्ट्रीकच्या कराराचं नूतनीकरण झालं नाही. त्यानंतर त्यानं 2014 साली बुलावायो येथे स्वत:ची ‘हिथ स्ट्रीक अकादमी’ स्थापन केली…
पुढं हिथ स्ट्रीकनं जगभरात ‘बॉलिंग कोच’ म्हणून काम पाहिलं. त्यात समावेश राहिला तो बांगलादेश (2014 ते 16) तसंच ‘आयपीएल’मधील ‘गुजरात लायन्स’ संघाबरोबरच्या कारकिर्दीचा (2016 नि 2017)…ऑक्टोबर, 2016 मध्ये झिम्बाब्वेच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेण्यासाठी तो मायदेशी परतला. पण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघ पात्र ठरू न शकल्यानंतर 2018 साली स्ट्रीकची संपूर्ण कोचिंग स्टाफसह हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यानं स्कॉटलंड, सॉमरसेट आणि ‘कोलकाता नाईट रायडर्स’ या संघांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं, पण तेही फार काळ चाललं नाही…
2021 मध्ये ‘आयसीसी’च्या भ्रष्टाचारविरोधी संहितेच्या पाच कलमांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि त्याची कबुली दिल्यानं हिथ स्ट्रीकवर आठ वर्षांची बंदी लादण्यात आली. यात समावेश होता तो संशयित भ्रष्टाचारी व्यक्तीकडून ‘बिटकॉइन्स’मध्ये रक्कम स्वीकारण्याचाही. तथापि, नंतर त्यानं आपण सामने ‘फिक्स’ करण्याच्या कोणत्याही प्रयत्नात सामील नव्हतो, असा दावा केला. परंतु आंतरराष्ट्रीय लढतींशी संबंधित अंतर्गत माहिती उघड केल्याचं मात्र मान्य केलं !
भारताला अनेकदा तडाखे…
- 2005 : नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि नव्या सहस्रकाच्या सुऊवातीच्या काळात झिम्बाब्वेनं भारताला काही वेळा नमवून दाखविलं त्यामागं हिथ स्ट्रीक हीच प्रमुख ताकद होती. 2005 साली 73 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कसोटी आकडेवारी नोंदली गेली ती भारताविरुद्धच. मात्र आपण तो सामना शेवटी 10 गडी राखून जिंकला…
- 2001 : तथापि, त्याच्या चार वर्षं आधी झिम्बाब्वेनं नोंदविलेल्या त्यांच्या सर्वांत संस्मरणीय कसोटी विजयात मुख्य योगदान राहिलं ते स्ट्रीकचं. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत झालेल्या दणदणीत पराभवानंतर हरारे येथील सामन्यात झिम्बाब्वेनं चार गडी राखून विजय मिळवला. त्यावेळी स्ट्रीकनं पहिल्या डावात 69 धावांत सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण नि सौरव गांगुली या महत्त्वाच्या मोहऱ्यांना टिपलं अन् त्यानंतर दुसऱ्या डावात सचिनसह 4 बळी मिळविले…
- 1997 : हिथ स्ट्रीकनं 32 धावांत 5 बळी ही आपली सर्वोत्तम एकदिवसीय कामगिरी नोंदविण्याबरोबर भारताला पराभूत करून दाखविलं. बुलावायो येथील घरच्या मैदानावरील या लढतीत झिम्बाब्वेनं आठ गडी राखून विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसरा सामना पावसात वाहून गेल्यानं झिम्बाब्वेनं मालिकाही खिशात घातली. भारताविऊद्धचा त्यांचा हा एकमेव मालिका विजय…
गोलंदाजीतील अन्य मोलाचे टप्पे…
- 2001 : हिथ स्ट्रीकचा गोलंदाज या नात्यानं खास करून एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्कृष्ट हंगाम…त्यात त्यानं 43 सामन्यांमध्ये घेतलेल्या 74 बळींनी झिम्बाब्वेला काही अविश्वसनीय विजय मिळवून दिले. याची सुरुवात झाली ती यजमान ऑस्ट्रेलिया नि वेस्ट इंडिजचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेतून. त्यातील विंडीजविरुद्धच्या एका सामन्यात त्यानं केलेल्या 45 धावांमुळं झिंबाब्वेला 138 पर्यंत मजल मारता आली. त्यानंतर 8 षटकांत 4 बळी मिळवत त्यानं विंडीजला 91 धावांवर आडवं केलं…
- 1999 : झिम्बाब्वेची विश्वचषकातील सर्वांत लक्षणीय कामगिरी नोंदली गेली ती या वर्षी. त्यांनी ‘सुपर सिक्स’ टप्प्यासाठी पात्र ठरताना चक्क द. आफ्रिकेला धूळ चारून दाखविली. त्यावेळी हिथ स्ट्रीकनं 233 धावांचं आव्हानही प्रतिस्पर्ध्यांसाठी डोईजड बनवताना 35 धावांत 3 बळी घेतले…
- 1994-95 : 1992-93 मध्ये कसोटी दर्जा मिळालेल्या झिंबाब्वेनं हरारे येथे पहिला कसोटी विजय नोंदवला तो पाकिस्तानविऊद्ध… यजमानांनी पहिल्या डावात 544 धावांचा डेंगर उभारल्यानंतर हिथ स्ट्रीकनं पहिल्या डावात 90 धावांत 6 बळी मिळविल्यानं पाकवर फॉलोऑनची नामुष्की आली. त्यानंतर पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात 15 धावांमध्ये 3 बळी असा स्ट्रीकचा आणखी एक प्रभावी स्पेल झिम्बाब्वेला एक डाव व 64 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून देऊन गेला…
जबरदस्त अष्टपैलू खेळाडू…
- हिथ स्ट्रीक हा झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज…आजही तो मान कुणी हिरावून घेऊ शकलेला नाही. त्यानं 1993 ते 2005 या कालावधीत 65 कसोटी सामन्यांमध्ये 216 बळी टिपले. त्याचा अपवाद वगळता झिम्बाब्वेच्या इतर कोणत्याही खेळाडूला कसोटीत 100 बळी देखील घेता आलेले नाहीत…
- एकदिवसीय सामन्यांच्या बाबतीतही स्ट्रीकच्या वाट्याला असंच स्थान आलंय. तो कारकिर्दीत 200 हून अधिक बळी घेणारा त्या देशाचा एकमेव गोलंदाज…एकदिवसीय विश्वचषकात 22 सामन्यांत त्यानं 22 बळी घेतले…
- कसोटी क्रिकेटमध्ये 1000 हून जास्त धावा अन् 200 हून अधिक बळी, तर एकदिवसीय सामन्यांत 2500 हून जास्त धावा आणि 200 हून अधिक बळी आपल्या खात्यात जमा करणारा स्ट्रीक हा झिम्बाब्वेचा एकमेव अष्टपैलू खेळाडू…
प्रभावी गोलंदाजी…
- प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी 5 बळी
- कसोटी 65 102 216 73 धावांत 6 बळी 72 धावांत 9 बळी 28.14 7
- वनडे 169 185 239 – 32 धावांत 5 बळी 29.83 1
खेळ जुनाच ओळख नवी : ‘टेंट पेगिंग’
‘टेंट पेगिंग’ हा घोडेस्वारीचा एक प्रकार…यामध्ये घोडेस्वाराने लक्ष्याच्या दिशेने चाल करत भाल्याने लक्ष्य भेदणे, उचलणे वा वाहून नेणे हे उद्दिष्ट असते. हा खेळ जगभरातील अनेक देशांमध्ये खेळला जातो, परंतु राष्ट्रकुल देशांमध्ये तो सर्वाधिक लोकप्रिय आहे…
- ‘टेंट पेगिंग’साठी वापरल्या जाणाऱ्या लक्ष्यांमध्ये भिन्नता असते. उदाहरणार्थ काही वेळा एक रिंग वापरले जाते. घेडेस्वाराकडील साधन त्याच्या संपर्कात न येता यशस्वीरीत्या रिंगमधून जावे लागते…काही वेळा लिंबाचा वापर केला जातो, ज्यात घोडेस्वाराने त्यावर वार करायचा असतो किंवा टांगलेल्या लिंबाचे तुकडे करणे आवश्यक असते. याशिवाय एक पुतळाही ठेवला जातो, जिथे घोडेस्वाराने लक्ष्याच्या एका निश्चित भागावर हल्ला करायचा असतो…त्याचप्रमाणे भाल्याने मैदानावर ठेवलेले लाकडी ठोकळे उचलणेही समाविष्ट असते…
- या खेळाची स्पर्धा काही घटकांवर आधारित असते, जसे की, लक्ष्यांचा आकार, सलग लक्ष्यांची संख्या, हातातील साधनाचा प्रकार, लक्ष्यभेद पूर्ण करायचा कालावधी आणि लक्ष्यावर हल्ला करण्याची पद्धत…
- स्पर्धेमध्ये अंमलबजावणीच्या आधारे प्रत्येक लक्ष्यामागे घोडेस्वाराला गुण दिले जातात, तर उल्लंघनासाठी दंड ठोठावला जातो. स्पर्धेच्या शेवटी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या घोडेस्वाराला विजेता म्हणून घोषित केले जाते…
- अनेक ‘टेंट पेगिंग’ स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वोच्च स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे ‘टेंट पेगिंग वर्ल्ड कप’ आणि जागतिक स्पर्धा…
- ‘घोडेस्वारी’ म्हणजेच ‘इक्वेस्ट्रियन’ हा प्रकार 1982 मध्ये ‘आशियाई खेळां‘त सर्वप्रथम झळकला आणि 1990 चा अपवाद वगळता तो तेव्हापासून सातत्याने दर्शन देत आलेला आहे. मात्र ‘टेंट पेगिंग’चा ‘आशियाई खेळां’मध्ये समावेश एकदाच राहिला तो 1982 साली…
- ‘आंतरराष्ट्रीय टेंट पेगिंग महासंघ’ (जो पूर्वी ‘जागतिक टेंट पेगिंग महासंघ’ म्हणून ओळखला जायचा) म्हणजे ‘आयटीपीएफ’ ही या क्रीडाप्रकाराची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था. विश्वचषक आणि इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी त्याच्यावर असते…
- ‘आयटीपीएफ’चे मुख्यालय मस्कत, ओमान येथे आहे. त्याची स्थापना 21 मार्च, 2013 रोजी गुरुग्राम (हरयाणा) येथे झालेल्या ‘जागतिक टेंट पेगिंग स्पर्धे’च्या वेळी झाली…महासंघाच्या स्थापनेनंतर विश्वचषक स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येऊन पहिली अशी स्पर्धा 2014 मध्ये ओमान येथे झाली…
- नुकत्याच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ‘टेंट पेगिंग विश्वचषक स्पर्धे’त पाच सदस्यीय भारतीय पथकाने प्रथमच कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यापूर्वीच्या दोन विश्वचषकांमध्ये भारतीय संघ अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर राहिला होता….
– राजू प्रभू
एकाच कुटुंबातील तिघांची श्री शिवछत्रपती पुरस्कारावर मोहर!
चिपळूण तालुक्यातील दसपटकर शिंदे कुटुंबाचा विक्रम, : वडिलांसह आत्याच्या पावलावर याशिकाचे पाऊल
पुरस्कार म्हणजे आपल्या कर्तृत्वाचा सर्वोच्च सन्मान! महाराष्ट्र शासनातर्फे नुकताच क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या निमित्ताने क्रीडा क्षेत्रात एकाच कुटुंबातील तिघांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले जाण्याचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. चिपळूण तालुक्यातील कादवड गावचे मुंबईस्थित उद्योजक दत्ताराम नरसिंगराव शिंदे यांच्या कुटुंबाने हा मान पटकावला आहे. त्यांचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय नेमबाज विश्वजित शिंदे, कन्या आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मल्लखांब जिमनॅस्टिकपटू अंजली देसाई (पूर्वाश्रमीच्या नंदा शिंदे) आणि नात नेमबाज याशिका शिंदे या तिघांनी शिवछत्रपती पुरस्काराला गवसणी घालून दसपटी विभागासह चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दसपटीमधील कादवडचे दत्ताराम नरसिंगराव शिंदे हे साधारण 50 वर्षांपूर्वी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झाले. त्यांना तीन मुले अजित, विश्वजित आणि नंदा. तिघांनाही खेळाची खूप आवड. नंदा ही प्राथमिक शाळेत आल्यापासून मल्लखांब, जिमनॅस्टिककडे वळली. मोठा भाऊ अजितसोबत रोज माटुंगा ते दादर शिवाजी पार्क असा पायी प्रवास करत ही चिमुरडी समर्थ व्यायाम मंदिरमध्ये सरावाला यायची. संगीता जोशी आणि उदय देशपांडे या प्रशिक्षकांनी तिला घडविले. शाळा, महाविद्यालय विद्यापीठ स्तरावर नंदाने चमक दाखवत या पुरस्काराचा जणू पायाच रचला. 1990 साली विशेष क्रीडा नैपुण्याबद्दल तिला तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याहस्ते गौरवण्यात आले. तर 1991-92 या वर्षाचा राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार तिला मिळाला. राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याहस्ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत तिला गौरवण्यात आले. त्यावेळी नंदा शिंदे ही सर्वात कमी वयाची खेळाडू होती. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी ही जोडी सुद्धा वयाने तिच्यापेक्षा मोठी होती. अवघ्या सोळाव्या वर्षी तिने हा सर्वोच्च पुरस्कार मिळवला. आपल्या कारकिर्दीत नंदाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 18 सुवर्ण, तर 4 रौप्य पदके प्राप्त केली. पुढे 10 वर्ष तिने मल्लखांब, जिमनॅस्टिक या खेळाच्या प्रसारासाठी लंडन, अमेरिकासारख्या देशात जाऊन काम केले. 2001 साली मांजरे रत्नागिरी येथील कल्पेश देसाई यांच्यासोबत तिचा विवाह झाला. पतीच्या आणि सासरच्या मंडळींच्या पाठबळावर तिने पुढे काही वर्ष प्रशिक्षक म्हणूनही काम केले. तिने घडविलेल्या अनेक खेळाडूंपैकी दोन खेळाडूंनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे.
विश्वजित हा नंदाचा मोठा भाऊ. महाविद्यालयीन शिक्षण घेताना विश्वजित हा एनसीसीमध्ये होता. तिथे त्याचा रायफल शुटींगशी संपर्क आला. पुढे शिवाजी पार्क दादर येथील स्वा. सावरकर स्मारक रायफल क्लबमध्ये भीष्मराज बाम आणि संजय चक्रवर्ती यांच्यासारख्या दिग्गज प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित यांनी आपल्या खेळाचा श्री गणेशा केला. आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व केले. आतापर्यंत तब्बल 168 पदकांची कमाई त्यांनी केली आहे. त्यात 68 सुवर्णपदकांचा समावेश आहे. 17 राष्ट्रीय विक्रम त्यांच्या नावावर आहेत. रेल्वेच्या वर्ल्ड शुटींग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सलग सुवर्ण पदक जिंकले, तर त्यांच्या संघानेही सुवर्ण पदक जिंकले आहे. सलग 15 वर्ष या स्पर्धेत त्यांच्या संघाने देदिप्यमान कामगिरी केली आहे. स्वा.सावरकर स्मारक फायरींग क्लब आणि ऑलिंपिक रिसर्च सेंटरचे संचालक, क्रीडा प्रबोधिनी नाशिकमध्ये अनेक वर्षे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. अनेक न्यूज चॅनल्सवर अतिथी समालोचक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आतापर्यंत जवळपास चार हजारहून अधिक खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. त्यातील 17 खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करून देशाचा, राज्याचा लौकीक वाढवला आहे. या कामगिरीचा गौरव म्हणून विश्वजित यांना 1993-94 या वर्षाकरिता महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत त्यांना गौरवण्यात आले. विश्वजित हे सध्या पश्चिम रेल्वेमध्ये उच्च अधिकारी पदावर सेवेत आहेत.
बहीण-भावाच्या या देदिप्यमान कामगिरीनंतर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कु. याशिका विश्वजित शिंदे हिने देखील नेमबाजीमध्ये आपली घौडदौड सुरू केली आहे. घरातूनच नेमबाजीचे बाळकडू मिळालेल्या याशिकाने शालेय जीवनापासूनच रायफल हातात घेतली आणि अल्पावधीतच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा तिने गाजवल्या. अनेक रेकॉर्डसह आपल्या राज्याला, देशाला अनेक पदके जिंकून दिली. तिने तिच्या कारकिर्दीत 12 सुवर्ण, 7 रौप्य तर 3 कांस्य पदके मिळवली आहेत. या कामगिरीबद्दल याशिका हिला सन 2021-22 सालचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपाल डॉ. रमेश बैस यांच्या हस्ते याशिकाचा सन्मान करण्यात आला. एकाच कुटुंबातील तिघांनी राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्कार मिळवणे खरं तर सोपे नाही मात्र या दसपटकर शिंदे कुटुंबाने ही गऊडझेप घेतली आहे.
– राजेंद्र शिंदे









