‘टी-20’ मालिकेतून दाखवून दिलंय…‘बूम’-‘बूम’ …बुमराह!
आशिया चषक सुरू झालाय अन् विश्वचषक स्पर्धा दारात उभी ठाकलीय…अशा मोक्याच्या वेळी भारताला आपला मारा भेदक बनविण्याच्या दृष्टीनं आवश्यक असलेल्या जसप्रीत बुमराहचा पुन्हा ताफ्यात समावेश करणं शक्य झालंय…वेगळ्या शैलीच्या अन् प्रमुख शस्त्र बनलेल्या या गोलंदाजानं पाठीच्या गंभीर दुखापतीतून आपण पूर्णपणे ठीक झालो असल्याचं आयर्लंडमधील
साल 2006…गुजरातमध्ये शालेय व जिल्हा पातळीवर क्रिकेट खेळणाऱ्या एका मुलाची हळूहळू विलक्षण चर्चा व्हायला लागली ती त्याच्या ‘एक्सप्रेस’ वेगामुळं अन् गोलंदाजीच्या विचित्र शैलीमुळं…मग त्याला तत्काळ ‘गुजरात क्रिकेट संघटने’च्या विविध वयोगटांतील संघांसाठी चाललेल्या सरावाच्या ठिकाणी हजर राहण्यास सांगण्यात आलं. तिथंही हा मुलगा सर्वांना प्रभावित करून गेला तो त्याच्या वेगामुळंच. त्यासरशी त्याला राज्याच्या 19 वर्षांखालील संघाची दारं खुली होण्यास वेळ लागला नाही…2011 मध्ये तो सर्वप्रथम 19 वर्षांखालील कूचबिहार चषक स्पर्धेत गुजरातकडून खेळला. त्यानंतर दोन वर्षांनी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक नि ‘मुंबई इंडियन्स’चे तत्कालीन प्रशिक्षक जॉन राईट यांनी त्याला हेरलं ते ‘सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या साखळी फेरीदरम्यान मोटेरा मैदानावर (अहमदाबादेतील आताचा नरेंद्र मोदी स्टेडियम)…आज तोच मुलगा भारतीय क्रिकेट संघाच्या माऱ्याचं मुख्य शस्त्र बनलाय…जसप्रीत बुमराह !
बुमराह हा सध्याचा क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक यात शंकाच नाही. कारण त्यानं आतापर्यंत सामना केलेल्या जवळपास प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवलंय. शिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्याचं कौशल्य त्याला सर्वांत यशस्वी गोलंदाजांपैकी एक बनवून गेलंय…गुजरातच्या संघातून 2013 साली विदर्भाविऊद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून त्याच्या कारकिर्दीचा आलेख केवळ वरच्या दिशेनं झेपावत राहिलाय. त्यामुळं परिस्थिती अशी आली की, जेव्हा जेव्हा तो चेंडू हातात घेऊ लागला तेव्हा तेव्हा त्याच्याकडून काही तरी कमाल घडण्याची अपेक्षा भारतीय क्रिकेट रसिक धरू लागले…
जसप्रीत बुमराहच्या शैलीप्रमाणं त्याचा उदयाचा मार्ग देखील इतरांपेक्षा काहीसा वेगळा राहिलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये…हा वेगवान गोलंदाज 19 वर्षांखालील वयोगटातील असूनही त्या विभागातील विश्वचषकात खेळण्याची संधी त्याला कधी मिळाली नाही. इतर अनेक युवा क्रिकेटपटू चमकले, लोकप्रिय झाले ते त्या स्पर्धेतील कामगिरीमुळंच. त्याऐवजी बुमराहनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर घाम गाळला अन् मिळालेल्या प्रत्येक संधीच्या वेळी आपलं कौशल्य दाखविलं…
जसप्रीत बुमराहचा राष्ट्रीय स्तरावरील पहिला ‘टी20’ सामना 2012 मध्ये सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत महाराष्ट्राविऊद्ध राहिलेला असला, तरी त्याच्या नावावर पहिली संस्मरणीय कामगिरी नोंदली गेली ती अंतिम सामन्यात. त्यात त्यानं अवघ्या 14 धावांत टिपलेल्या 3 गड्यांमुळं गुजरातला पंजाब संघास नमविता आलं. त्याच्या क्षमतेची चुणूक त्यातून पाहायला मिळाली असली, तरी गुजरातचा हा गोलंदाज पुढं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतकं वर्चस्व गाजवेल याची मात्र क्वचितच कुणी कल्पना केलेली असेल…
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बुमराह गाजवत असलेले प्रताप पाहून त्याला ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये प्रतिभा दाखवण्याची संधी ‘मुंबई इंडियन्स’नी दिली आणि त्यानंही 2013 साली ‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर’विऊद्ध पदार्पण करताना लगेचच लक्ष वेधून घेतलं. याचं प्रमुख कारण सुपरस्टार विराट कोहलीनं तीन चौकार हाणल्यानंतर त्याला बाद करण्यात मिळविलेलं यश. त्या सामन्यात बुमराहनं तीन बळी टिपले. 2013 च्या हंगामात त्याला फक्त दोनच लढती खेळता आल्या असल्या, तरी ‘मुंबई इंडियन्स’च्या व्यवस्थापनाचा विश्वास कमावण्यास त्या पुरेशा ठरल्या. त्यामुळं त्याला 1.20 कोटी ऊपयांना परत करारबद्ध करण्यात आलं…
त्यानंतर ‘मुंबई इंडियन्स’कडून खेळताना प्रत्येक हंगामात जसप्रीत बुमराहची कामगिरी बहरत गेली. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघात आलेलं बोलावणं ही त्याचीच परिणती. त्याला ‘टी-20’ संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली ती सुद्धा त्याचवेळी…बुमराहनं भारतीय संघातून खेळण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्याच वर्षात एकदिवसीय सामन्यांत 3.64 च्या ‘इकॉनॉमी रेट’नं 17 बळी, तर ‘टी-20’मध्ये 6.63 च्या ‘इकॉनॉमी रेट’नं विक्रमी 28 बळी घेतले. पदार्पणाचं वर्ष त्याच्यासाठी किती अभूतपूर्व राहिलं अन् त्याचा सामना करताना फलंदाजांची किती तारांबळ उडाली त्याची ही साक्ष…
आंतरराष्ट्रीय स्तरावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं, परिस्थितीची पर्वा न करता कसोटी सामन्यात 20 बळी घेण्याची क्षमता बाळगणारी वेगवान गोलंदाजांची जी जबरदस्त फळी विकसित केली त्याचा एक प्रमुख मोहरा राहिला तो जसप्रीत बुमराह…एकदिवसीय नि ‘टी-20’ संघांच्या माऱ्याचा तो आधीपासूनच नेता बनला होता. परंतु त्याला तोवर कसोटी क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध करता आली नव्हती. भारतीय संघव्यवस्थापन त्याला दुखापतींपासून दूर ठेवण्यासाठी कसोटीत खेळविण्याचा पर्याय चोखाळणं टाळत असावं अशी कित्येक विश्लेषकांची धारणा बनली होती…
या पार्श्वभूमीवर खेळाच्या छोट्या स्वरूपांतील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असूनही बुमराहला कसोटीत संधी मिळाली ती बरीच उशिरा, 2018 साली. दक्षिण आफ्रिकेतील त्या पहिल्या कसोटी मालिकेत त्यानं 3.15 च्या ‘इकॉनॉमी रेट’नं 14 बळी घेतले अन् पहिल्या वर्षाचा शेवट झाला त्यावेळी ही संख्या पोहोचली होती 48 बळींवर…त्यानंतर सर्व प्रकारांत नियमित खेळताना दिसू लागलेल्या बुमराहचं भारतीय संघातील तसेच जागतिक क्रिकेटमधील वजन अधिकाधिक वाढत गेलं. आरामात बळी घेणाऱ्या या वेगवान गोलंदाजाची प्रतिस्पर्ध्यांना धास्ती वाटू लागली अन् त्याला विचारात घेऊन वेगवेगळे डावपेच आखण्याची वेळ आली…संघाचं अधिपत्य करताना विराट कोहली असो वा रोहित शर्मा, त्यांना जेव्हा जेव्हा बळी मिळविण्याची गरज भासलीय तेव्हा तेव्हा ते जसप्रीत बुमराहकडे वळताना दिसलेत अन् बहुतेक वेळा त्यानं निकाल दिलाय तो कर्णधाराला अपेक्षित असाच…खरं सांगायचं झाल्यास तो ज्या ज्या संघासाठी खेळलाय त्या सर्वांसाठी तो सर्वांत मोठा ‘मॅच विनर’ राहिलाय. त्याच्याकडे भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली ती या सातत्यपूर्ण कामगिरीमुळंच…बुमराहपुढं एकमेव मोठा अडसर राहिलाय तो दुखापतींचा. त्यातून मागील जवळपास वर्षभर संघाबाहेर राहावं लागल्यानंतर आता तो गरजेच्या वेळी म्हणजे नेमक्या आशिया चषकापूर्वी नि अत्यंत महत्त्वाच्या विश्वचषकापूर्वी पुनरागमन करू शकलाय. आता त्याच्याकडून अपेक्षा असेल ती तीच…‘मॅच विनिंग स्पेल’ची !
- प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी 5 बळी
- कसोटी 30 58 128 27 धावांत 6 बळी 86 धावांत 9 बळी 21.99 8
- वनडे 72 72 121 – 19 धावांत 6 बळी 24.31 2
- टी20 62 61 74 – 11 धावांत 3 बळी 19.66 –
- आयपीएल 120 120 145 – 10 धावांत 5 बळी 23.31 1
वेगळ्या शैलीला जोड वैविध्याची…
- ‘मुंबई इंडियन्स’कडून एकत्र खेळताना जसप्रीत बुमराहला श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाकडून खूप काही शिकायला मिळालं. मलिंगाप्रमाणं त्याची गोलंदाजीही ‘स्लिंग’ शैलीची अन् अव्वल दर्जाच्या फलंदाजांना त्रासात टाकणारे, दांडी उडविणारे भेदक यॉर्कर्स हे प्रमुख शस्त्रांपैकी एक…परंतु मलिंगापेक्षा त्याला जास्त घातक बनवते ती त्याच्या भात्यातील विविधता. तो फलंदाजांना सहज फसवू शकणारे ‘स्लोअर बॉल्स’, भंबेरी उडवू शकणारा ‘बाउन्सर’, ‘ऑफ-कटर’ व ‘लेग-कटर’, ‘सीम अप’ तसंच ‘क्रॉस सीम’ चेंडू अचूक टाकू शकतो. ‘इनस्विंगर’ टाकण्यात बुमराह माहीर होताच. खेरीज ‘चेस्ट ऑन’ शैली असूनही तो आता उशिरा आऊटस्विंग होणारा चेंडू टाकण्यास शिकलाय. विराट कोहलीस त्याला ‘जगातील सर्वांत परिपूर्ण गोलंदाज’ म्हणावंसं वाटलं होतं ते उगाच नव्हे…
- फलंदाजांची मनस्थिती ओळखून त्यानुसार कोन बदलून चेंडू टाकणं, क्रीजचा प्रभावी वापर करणं, वेगात बेमालूमपणे बदल करणं यामुळं तो अनेकदा फलंदाजांविरुद्धची मानसिक लढाई जिंकण्यात यशस्वी होतो. एकेकाळी मिळेल तिथं चेंडू टाकणाऱ्या बुमराहनं कमावलेली विलक्षण अचूकता हा त्याचा आणखी एक ‘प्लस पॉईंट’. बळी मिळाले नाहीत, तरी तो क्वचितच धावा देतो…
दुखापतींचं सावट…
- जसप्रीत बुमराह दुखापतीमुळं 327 दिवस इतका काळ कधीच संघाबाहेर राहिला नव्हता.. प्रत्येक वेळी त्याला खेळविण्याचा करण्यात आलेला प्रयत्न अपयशी ठरला. शेवटी ‘लोअर बॅक स्ट्रेस फ्रॅक्चर’वर शस्त्रक्रिया करून घेण्याबरोबर कारकिर्दीतील सर्वांत मोठा ‘ब्रेक’ घेण्याचा प्रसंग त्याच्यावर आला…25 सप्टेंबर, 2022 रोजी बुमराह शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्यानं पुनरागमन केलं ते यंदा 18 ऑगस्ट रोजी आयर्लंडविऊद्धच्या ‘टी-20’मध्ये…
- मात्र आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळं जसप्रीत बुमराहवर दुखापतींच्या धोक्याची तलवार सतत टांगत राहिली होती. वेस्ट इंडिजचा महान वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंगनी त्याबाबत तीन वर्षांपूर्वी इशारा दिला होता…बुमराह छोटा ‘रन-अप’च्या जोरावर वेगवान गोलंदाजी करत असल्यामुळं त्याचं शरीर जास्त काळ भार पेलू शकणार नाही, असं त्यांनी सांगितलं होतं…बुमराह खेळपट्टीवर जोरात चेंडू आपटतो अन् यामुळं आणखी समस्या निर्माण होतात. विशेषत: लहान ‘रन अप’मुळं चेंडू कोणत्या गतीनं येईल याचा अंदाज बांधणं फलंदाजांना कठीण होतं, याकडे होल्डिंगनी लक्ष वेधलं होतं…
- ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणतो की, बुमराहच्या शैलीमुळं शरीरावर खूप ताण येतो. त्यामुळं त्यानं मजबूत, तंदुऊस्त राहण्याची गरज आहे. जर त्यानं तसं केलं, तर तो आणखी काही वर्षं खेळू शकेल…तिन्हींपैकी कुठल्या प्रकारात विश्रांती घ्यावी हे जसप्रीतनं ठरवावं, असा सल्लाही मॅकग्रानं दिलाय!
खेळ जुनाच ओळख नवी ! : आर्म रॅसलिंग
‘आर्म रेसलिंग’ म्हणजे शेकडो वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चाललेला आणि जगभरात लोकप्रिय असलेला क्रीडाप्रकार. त्यात दोन व्यक्तींनी समोरासमोर बसून केवळ आपल्या एका हाताचा उपयोग करून ताकदीची चाचपणी करायची असते. एकमेकांचा हात पकडून प्रतिस्पर्ध्याचा हात टेबलावर टेकविण्यासाठी सारा जोर लावला जातो…
- प्रतिस्पर्ध्याचा हात वाकवून टेबलाच्या पृष्ठभागावर (किंवा ‘टच पॅड’वर) टेकवून त्याला पराभूत करणे हे या प्रकारात सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे ध्येय असते. ‘आर्म रेसलिंग’च्या स्पर्धेत शारीरिक सामर्थ्य, तंत्र याबरोबरच मानसिक सामर्थ्याचाही खूप कस लागत असते…
- जगभरात विविध ‘आर्म रेसलिंग’ संस्था आणि महासंघ आहेत, पण ‘जागतिक आर्म रेसलिंग महासंघ’ हा मुख्य असून तोच या क्रीडाप्रकारातील जागतिक स्पर्धेचे नियमन करतो. जगभरात पूर्णपणे एकसारखे नियम नसले, तरी वेगवेगळ्या संस्थांचे आणि महासंघांचे बहुतेक नियम समान असतात…जागतिक ‘आर्म रेसलिंग’ स्पर्धेत वैयक्तिक सामने जिंकण्याचा तसेच सांघिक स्पर्धेत देशाच्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न स्पर्धकांकडून केला जातो…
- शारीरिक सामर्थ्याची बाब गुंतलेली असल्यामुळे सामने व स्पर्धा योग्य पद्धतीने होण्यासाठी विविध वजनी गटांत सामने खेळविले जातात. खेळाडूंनी योग्य पोशाख म्हणजे लहान बाह्यांचा किंवा ‘स्लीव्हलेस शर्ट’ आणि कमी जाहिराती असलेली किंवा कोणतीही जाहिरात नसलेली ‘स्पोर्ट्स पँट’ परिधान करणे आवश्यक असते. त्यात जीन्स घालण्याची परवानगी नसते आणि कोणत्याही प्रकारे हात, कोपर किंवा मनगटासाठी आधार वापरता येत नाही…
- अधिकृत जागतिक ‘आर्म रेसलिंग’ स्पर्धेत टेबलावर पुढील गोष्टी असणे आवश्यक असते. ‘एल्बो पॅड्स’-प्रत्येक स्पर्धक त्यावर कोपर ठेवतो. गैरसोय नि दुखापत टाळण्यासाठी हा उपाय केला जातो. ‘टच पॅड्स’-काही प्रमाणात उंचावलेली पॅड्स टेबलच्या दोन्ही बाजूस असतात. स्पर्धक त्याच्या प्रतिस्पर्ध्याचा हात वाकवून त्यावर टेकविण्याचा प्रयत्न करतो. ‘हँड पेग्स’-स्पर्धक ‘आर्म रेसलिंग’ करताना एका हाताने ‘हँड पेग्स’ पकडतात. ही पकड त्यांना जोर लावण्याच्या कामी येते…
- टेबलचा प्रकार हा ‘आर्म रेसलिंग’ उभे राहून की, बसून करायचे आहे यावर अवलंबून असतो. बसून खेळण्याच्या स्पर्धेसाठी टेबलटॉप जमिनीपासून 28 इंचांवर, तर उभे राहून खेळताना ‘टेबलटॉप’ 40 इंच उंचीवर असावा लागतो. बाकी टेबलची लांबी (36 इंच) आणि रुंदी (26 इंच) समान असते…
- वैयक्तिक सामन्यांमध्ये गुण पद्धत खूप सोपी असते. कारण एका फेरीत सरळ विजय-पराजयाचा सोक्षमोक्ष लागतो. तथापि, जागतिक ‘आर्म रेसलिंग’ स्पर्धेत एक सांघिक स्पर्धा असते, ज्यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या श्रेणीतील कामगिरीनुसार गुण दिले जातात…
- प्रत्येक सामन्यात दोन पंचांद्वारे पंचगिरी केली जाते. प्रत्येक बाजूने एक पंच असतो. सामन्यासाठी कोणतीही वेळमर्यादा नसते. परंतु एक किंवा दोन्ही प्रतिस्पर्धी सामना पुढे चालू ठेवण्यासाठी योग्य स्थितीत नाहीत असे वाटल्यास पंच सामना थांबवू शकतात. दोन इशारे मिळाले व एक ‘फाऊल’ केला अथवा दोनदा ‘फाऊल’ केला, तर संबंधित खेळाडू अपात्र होऊन प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केले जाते..
– राजू प्रभू
सिंधुदुर्गची ‘जलकन्या’!
खेळाडू हे दोन प्रकारचे असतात. यापैकी एक खेळाडू हा जन्मजात शारीरिक चपळतेतून घडत गेलेला असतो, तर दुसरा जन्मजात चपळतेचे फारसे गुण न दाखवता, पुढे अत्यंत मेहनतीच्या बळावर स्वत:ला घडवणारा. उभरती राष्ट्रीय जलतरणपटू सिंधुकन्या पूर्वा गावडे ही या दुसऱ्या कॅटेगरीतील अत्यंत गुणवान खेळाडू. आपल्या मेहनतीच्या बळावर राज्यस्तरावर छाप पाडल्यानंतर आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात छाप पाडण्याची मनीषा बाळगून असलेल्या या पूर्वाचं यश हे खऱ्या अर्थाने कलेक्टीव्ह मेहनतीचं यश म्हणावं लागेल. बऱ्याचदा मुलाच्या बालपणीच त्याच्यातील नैसर्गिक गुणवत्ता, त्याची दिसून येत असलेली कौशल्ये पाहून, त्या मुलाचा साधारणपणे कल दिसून येतो. मग आपण अशा मुलाला त्याची गुणवत्ता पाहून ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे कौतुकाने म्हणतो. पण मुलीचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणण्याएवढी चपळता, खेळाडूसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक चपळतेचे गुण वयाच्या चौथ्या वर्षीपर्यंततरी पूर्वामध्ये दिसत नव्हते. ती अगदी सर्वसामान्य मुलांसारखी, पण गुटगुटीत वाटायची. बरं तिच्या घरात ना बाबांकडून खेळाचा वारसा होता, ना आईकडून. पण पूर्वाची आई मात्र फार महत्वाकांक्षी. पूर्वाकडे जन्मजात नैसर्गिक गुणवत्ता दिसत नसली तरी किंवा घरात क्रीडा चळवळीचा वारसा नसला तरी आईने पूर्वाला एका असामान्य खेळाडूत परावर्तीत करण्यासाठी मनात निर्धार केला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी तिने पूर्वाचे बोट पकडून तिला थेट जलतरण तलावावर आणले आणि प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांच्या ताब्यात सोपविले. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीपासून सिंधुदुर्गची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावावर एका सामान्य मुलीचे असामान्य खेळाडूत रुपांतर होण्यास सुरुवात झाली.
तसं पाहिलं, तर प्रत्येकाकडे काहीतरी नैसर्गिक गुणवत्ता असतेच असते. काहींची ती सहजपणे दिसते तर काहींची ती शोधून बाहेर काढावी लागते. छोट्या पूर्वामधील ती नैसर्गिक गुणवत्ता बाहेरून कुणाला दिसत नसली, तरी पूर्वाची आई रश्मी व वडील संदीप गावडे यांना ती दिसत होती. या दाम्पत्याने पूर्वावर अगदी बालपणापासून कठोर परिश्रम घेण्यास सुरुवात केली. अगदी पहाटेला छोट्या पूर्वाला घेऊन तिची आई मैदानावर उपस्थित असायची. तिच्याकडून सगळ्या शारीरिक कसरती करून घ्यायची. तिच्याकडून धावण्याचाही सराव करून घ्यायची. त्यानंतर थेट तिला जलतरण तलावावर आणून सोडायची. आईच्या अनुपस्थितीत वडील ही सर्व जबाबदारी सांभाळायचे. ओरोसच्या तलावावर प्रवीण सुलोकार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वाचा जलतरणाचा श्रीगणेशा सुरू झाला आणि हा हा म्हणता एका जबरदस्त अशा जलतरणपटूच्या घडणीला सुरुवात झाली. पूर्वातील अंगभूत नैसर्गिक गुणवत्ता बाहेर येऊ लागली. वयाच्या सहाव्या वर्षीपासून पूर्वाचा पदकांचा धुमधडाका जो सुरु झाला, तो आता राष्ट्रीयस्तरापर्यंत पोहोचला आहे.
जिल्हा व विभागस्तरापर्यंत प्रवीण सुलोकार, दीपक सावंत, नील लब्धे यांचे मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र स्विमिंग फेडरेशनचे सचिव राजू पालकर, रामदास सांगवेकर या महाराष्ट्रातील जलतरण चळवळीतील दिग्गजांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत गेल्यामुळे पूर्वाच्या यशाचा आलेख सतत उंचावत गेला. मात्र पूर्वाची जर अधिक प्रगती झाली पाहिजे, तर तिला चांगल्या सुविधा व चांगले प्रशिक्षक मिळवून देणे आवश्यक होते. पण ही खूप खर्चिक बाब होती. पण पूर्वाचे आई-बाबा हिंमत हारले नाहीत. त्यांनी शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून पूर्वाचे जलतरणातील करिअर घडविण्याचे ठरविले. यासाठी आवश्यक असलेली निवड चाचणी पार करण्यासाठी पूर्वामध्ये अधिक क्षमता वाढवण्याची गरज होती. या निवड चाचणीचा अभ्यास करून पूर्वाच्या आईने तज्ञ मार्गदर्शकांची मदत घेऊन पूर्वाचे ग्राऊंडवर्क वाढवले. तिच्या लाँग रनिंग, सायकलिंगकडे लक्ष देऊन तिचा स्टॅमिना वाढवला व त्यानंतर त्यांनी थेट कोल्हापूर गाठत पूर्वाला प्रसिद्ध प्रशिक्षक नीळकंठ आखाडे यांच्या स्वाधीन केले. आखाडेंनी अवघ्या महिनाभरात पूर्वाची जलतरणातील क्षमता कमालीची वाढवली आणि या जोरावरच पूर्वाने पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीची चाचणी अगदी सहजपणे पार केली. अशारितीने पूर्वा राष्ट्रीय दर्जाच्या उच्चश्रेणी प्रशिक्षण प्रवाहात दाखल झाली.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा खात्याच्या पुणे-बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळताच पूर्वाच्या खऱ्या अर्थाने स्पोर्टस् करिअरला सुरुवात झाली. याच प्रबोधिनीत पूर्वामध्ये राष्ट्रीय खेळाडूची बीजे पेरली गेली. सातवी इयत्तेपासून ती आई-बाबांपासून दूर या प्रबोधिनीतच राहू लागली. राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे खडतर प्रशिक्षण सुरू झाले. मात्र पुण्यामध्ये प्रशिक्षण सुरू होते न होते, तोच कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले आणि स्विमिंग पूल बंद ठेवावे लागल्याने तिला घरी परतावे लागले. त्यामुळे ऐन करिअरच्या सुरुवातीलाच मोठा धक्का बसल्याने पुढील करिअरबाबत चिंता निर्माण झाली. पण एवढे मोठे कोरोनाचे महासंकट कोसळले, तरी पूर्वा आणि तिच्या आई-वडिलांनी हार मानली नाही. कोरोनासारख्या संकटातही तिने स्विमिंग पूल बंद असले, तरी रनिंगची प्रॅक्टीस सुरुच ठेवली. त्यामुळे कोरोना काळ संपल्यानंतरही पूर्वाने आपली शारीरिक क्षमता कमी होऊ दिली नाही. त्यामुळे कोरोना संपताच पुन्हा बालेवाडी येथे जलतरण प्रशिक्षणास सुरुवात झाली. त्यानंतर पूर्वातील शारीरिक क्षमतेचा कल ओळखून तिच्यासाठी जलतरणातील फ्रीस्टाईल आणि बटरफ्लाय हे मध्यम पल्ल्याचे इव्हेंट निश्चित करण्यात आले. उत्तम सुविधा, उत्तम प्रशिक्षण, उत्तम डाएट या बळावर बालेवाडीमध्ये पूर्वाच्या जलतरण कौशल्यात कमालीची सुधारणा होत गेली आणि हळूहळू राज्यस्तरावर पूर्वाच्या नावाचा दबदबा वाढू लागला.
पूर्वाचे प्रशिक्षक मात्र एवढ्या छोट्या यशावर अजिबात खूष नाहीत. त्यांना पूर्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकताना पाहायचं आहे. एव्हाना पूर्वाने आपल्या गटातून महाराष्ट्राच्या संघात केव्हाच स्थान मिळवलंय. आता तिला भरारी मारायची आहे राष्ट्रीय स्तरावर. भारतीय संघात तिला स्थान मिळवायचं आहे आणि त्या दृष्टीने तिने सरावावर लक्ष केंद्रीत केले आहे. नुकतीच तिने दहावीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली आहे. अगदी लहान वयापासून ते आतापर्यंत पूर्वाच्या नावावर जलतरणात तब्बल 50 पदके जमा आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरावरील पाच, तर राज्यस्तरावरील तब्बल 24 पदकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विभाग स्तरावर दोन, तर जिल्हास्तरावर 19 पदके तिला मिळालेली आहेत. जलतरणाबरोबरच अॅथलेटिक्स व सायकलिंगमध्येही तिने तब्बल 21 पदके प्राप्त केली आहेत. या सिंधुकन्येला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचायचं आहे. या स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवायचा आहे. आपल्या जिल्ह्याचे नाव तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचे आहे. हे यश ती निश्चितपणे गाठेल यात शंका नाही. पूर्वाचे वडील हे ‘तरुण भारत संवाद’चे पत्रकार आहेत, तर आई सिंधुदुर्गातील जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत कार्यरत आहे. पूर्वाची छोटी बहीण स्वरा हिला देखील खेळाडू म्हणून घडवायचा निर्धार त्यांनी केला आहे.
– शेखर सामंत









