‘जीनियस’ प्रज्ञानंद!
‘एलो रेंटिग’च्या बाबतीत डी. गुकेशनं विश्वनाथन आनंदला मागं टाकलेलं असलं, तरी सध्या बोलबाला चाललाय तो रमेशबाबू प्रज्ञानंदचा…मागील काही वर्षांत अनेक पराक्रम गाजविलेल्या तामिळनाडूच्या या बुद्धिबळपटूनं ‘फिडे विश्वचषका’च्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारून आपण ‘जीनियस’ असल्याचं पुरेपूर सिद्ध केलंय (हा लेख लिहिताना त्याच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धच्या ‘टायब्रेकर’ला नुकतीच सुरुवात झाली होती)… मागील काही दिवसांत दोन घडामोडी भारतीयांची उत्सुकता विलक्षण ताणून गेल्या…‘चांद्रयान-3’ची मोहीम अन् 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदची ‘फिडे विश्वचषक’ स्पर्धेतील जबरदस्त घोडदौड…याभरात जगात दुसऱ्या स्थानावर असलेला हिकारू नाकामुरा, तिसऱ्या क्रमांकावरील फाबियानो काऊआना यांचं आव्हान मोडीत काढत तो चक्क महान मॅग्नस कार्लसनसमोर थडकला…या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा अन् सर्वांत युवा भारतीय…त्याच्या जोडीला पुढील वर्षाच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील स्थानही प्रज्ञानंदनं निश्चित करून टाकलंय. त्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो तिसरा सर्वांत तऊण बुद्धिबळपटू… रमेशबाबू प्रज्ञानंद हा मागील दशकभरात यशाची एकेक पायरी सतत चढत गेलाय…त्याचे पहिले प्रशिक्षक त्यागराजन आठवणी जागवताना म्हणतात, ‘तो 10 वर्षांखालील गटात असतानाही 15 किंवा 16 वयोगटाच्या स्तरावरचा खेळ करायचा’…प्रज्ञानंद या खेळाकडे वळला तो त्याची बुद्धिबळपटू बहीण वैशालीमुळं. ‘लहानपणी टीव्ही पाहण्याची सवय कमी व्हावी म्हणून आम्ही वैशालीला बुद्धिबळाची ओळख करून दिली होती. पुढं तिच्याबरोबर प्रज्ञानंदलाही हा खेळ आवडला’, वडील रमेशबाबू सांगतात…
रमेशबाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्राग’नं (प्रज्ञानंदचं टोपण नाव) फक्त साडेतीन वर्षांचा असताना या खेळात रस दाखवायला सुऊवात केली. त्याची थोरली बहीण वैशाली आधीच या खेळाचे धडे घेत होती. घरची आर्थिक परिस्थिती फारशी मजबूत नसल्यानं तिच्या प्रशिक्षण वर्गाचं शुल्क फेडणं, तिला विविध ठिकाणी घेऊन जाणं हे कठीणच जात होतं. त्यात प्रज्ञानंदचीही आवड वाढीस लागल्यावर हा बोजा कसा काय पेलायचा असा पेच त्यांच्यासमोर निर्माण झाला… बँक कर्मचारी राहिलेले रमेशबाबू यांना लहान वयातच पोलिओची लागण झाली होती. त्यामुळं मुलांच्या उपक्रमांची सारी जबाबदारी येऊन पडली ती पत्नी नागलक्ष्मीवर. एकाच कमाईवर चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्यानं ही तारेवरची कसरत ठरत होती…‘पण प्रज्ञानंदची बुद्धिबळ खेळण्याची आवड रोखता येणारी नव्हती. त्यापुढं हात टेकून मला त्याला प्रशिक्षण वर्गात दाखल करावं लागलं. तेव्हापासून त्यानं मागं वळून पाहिलेलं नाही. अवघा सहा वर्षांचा असताना त्यानं 8 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत दुसरं स्थान पटकावलं. त्यावेळी मला जाणवलं की, आर्थिक परिस्थितीमुळं त्याला अडविणं बरोबर ठरणार नाही. त्यानंतर लगेच त्याला आर. बी. रमेश यांच्या वर्गात भरती केलं’, रमेशबाबू सांगतात… पुढचा इतिहास ताजा आहे…प्रज्ञानंद एकामागून एक मोठी भरारी घेत सुटलाय. त्याची थोरली बहीण आर. वैशाली ही देखील ‘इंटरनॅशनल मास्टर’ असून ती दोघं विविध स्पर्धांच्या निमित्तानं जगभर प्रवास करत असतात…गेल्या वर्षी या भावंडांनी ‘बुद्धिबळ ऑलिम्पियाड’मध्ये देशाला पदकांची कमाई करून दिली!.
कार्लसन-प्रज्ञानंद झुंज…

- या महिन्यात 18 वर्षांच्या झालेल्या प्रज्ञानंदचा ‘फिडे विश्वचषक स्पर्धे’पूर्वी दिग्गज मॅग्नस कार्लसनशी 19 वेळा सामना झालाय. त्यातील सहा अनिर्णित राहिले, तर कार्लसननं आठ सामने जिंकले. यापैकी 12 सामने हे ‘रॅपिड’, किंवा प्रदर्शनीय स्वरुपाचे होते. त्यात सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या मॅग्नसचे पारडे जड राहिले असले, तरी पाच वेळा भारतीय खेळाडूने त्याला धक्का दिला हे विसरून चालणार नाही…‘क्लासिकल बुद्धिबळ’चा (दीर्घ पल्ल्याच्या लढती) विचार करता कार्लसन नि प्रज्ञानंद यांची एकदाच ‘टाटा मास्टर्स’मध्ये गांठ पडली अन् तो सामनाही अनिर्णीत राहिला…
- प्रज्ञानंदनं फेब्रुवारी, 2022 मध्ये कार्लसनला ‘एअरथिंग्स मास्टर्स ऑनलाइन’ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत सर्वप्रथम हरवलं. 2013 साली कार्लसन जगज्जेता बनल्यानंतर त्याला हरवणारा तो सर्वांत तऊण खेळाडू ठरला…त्यानंतर 20 मे रोजी झालेल्या ‘चेसेबल मास्टर्स ऑनलाइन’ रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत त्यानं नॉर्वेच्या खेळाडूला दुसऱ्यांदा चकित केलं…गतवर्षीच ‘एफटीएक्स क्रिप्टो कप’मध्ये तर या भारतीय खेळाडूनं एका दिवसात सलग तीन सामन्यांमध्ये कार्लसनला नमवून सनसनाटी माजविली. त्यापैकी एक ‘रॅपिड’, तर दोन ‘ब्लिट्झ’ लढती…विशेष म्हणजे ‘फिडे विश्वचषक स्पर्धे’च्या अंतिम फेरीतील पहिल्या ‘गेम’मध्ये प्रज्ञानंद नि जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेला कार्लसन आमनेसामने आले त्या दिवशी त्या विलक्षण पराक्रमाला एक वर्ष पूर्ण झालं होतं…
देदिप्यमान वाटचाल…
- बुद्धिबळात रस निर्माण झाल्यानंतर रमेशबाबू प्रज्ञानंदला पहिलं यश मिळालं ते 2013 मध्ये. त्यावेळी वयाच्या सातव्या वर्षी त्यानं 8 वर्षांखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. या विजयामुळं त्याला ‘फिडे मास्टर’ किताब प्राप्त झाला…त्यानंतर 2015 साली 10 वर्षांखालील गटात त्यानं पुन्हा या किताबाची कमाई केली…
- प्रज्ञानंद खरा प्रकाशझोतात आला तो 2016 मध्ये. 10 वर्षे, 10 महिने अन् 19 दिवस वयानिशी तो सर्वांत तऊण ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ बनला…त्याच्या पुढील वर्षी त्यानं जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत आपला पहिला ‘ग्रँडमास्टर नॉर्म’ पटकावला…
- 2018 मध्ये प्रज्ञानंदनं भारतातील सर्वांत युवा ‘ग्रँडमास्टर’, तर बुद्धिबळाच्या विश्वातील दुसरा सर्वांत तऊण ‘ग्रँडमास्टर’ बनण्याचा मान पटकावला. त्यावेळी त्याचं वय होतं 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवस…हा पराक्रम गाजवताना त्यानं इटलीतील ‘ग्रेडाईन ओपन’मध्ये लुको मोरोनीला धूळ चारली…
- प्रज्ञानंदनं 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात डेन्मार्कमध्ये ‘एक्स्ट्राकॉन चेस ओपन’चं विजेतेपद मिळविलं अन् त्यानंतर फक्त दोन महिन्यानी ‘2600’चं ‘रेटिंग’ प्राप्त केलं. हा टप्पा गाठणारा तो दुसरा सर्वांत तऊण बुद्धिबळपटू (सध्याचं प्रज्ञानंदचं ‘रेटिंग’ 2707, तर डी. गुकेशचं 2751)…
- पण या नावाचा दबदबा वाढला तो गेल्या वर्षी ‘ऑनलाईन एअरथिंग्स मास्टर्स’मध्ये तत्कालीन विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा विश्वनाथन आनंद व पी. हरिकृष्णनंतरचा तिसरा भारतीय बनल्यानं…
पाठीवर हात आईचा…
- अझरबैजानमधील बाकू इथं झालेल्या ‘फिडे विश्वचषका’च्या सर्वांत संस्मरणीय छायाचित्रांपैकी एक राहिलं ते उपांत्य फेरीत आर. प्रज्ञानंदनं स्थान पक्कं केल्यानंतर त्याची आई नागलक्ष्मीच्या चेहऱ्यावर झळकलेल्या अभिमानयुक्त स्मिताचं…प्रज्ञानंदच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा राहिलेला असून खुद्द माजी महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांनाही या ‘विशेष आधारा’चा उल्लेख केल्याशिवाय राहवलं नाही…नागलक्ष्मी याच त्याला वर्गात घेऊन जायच्या, घरात सरावासाठी अनुकूल वातावरण राहील याची त्याच काळजी घेतात अन् परदेशातील प्रत्येक स्पर्धेवेळी त्या सोबत जातात…
- वडील रमेशबाबूंनी दिलेल्या माहितीनुसार, नागलक्ष्मी स्पर्धांसाठी प्रवास करताना इंडक्शन स्टोव्ह, ‘राईस कूकर’, भात, मसाले देखील सोबत ठेवण्यास विसरत नाहीत. प्रज्ञानंदला घरापासून हजारो मैल दूर असतानाही त्याला आवडणारं घरी शिजवलेलं अन्न (खास करून रसम नि भात) मिळावं हा त्यामागचा हेतू…
पटावर विलक्षण आक्रमक…
- ?प्रज्ञानंद हा काहीसा लाजराबुजरा अन् राखीव स्वभावाचा असला, तरी चेन्नईचा हा युवा खेळाडू बुद्धिबळ पटासमोर बसल्यानंतर एका वेगळ्याच आक्रमक व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं…मागील जवळजवळ दशकभरापासून त्याला प्रशिक्षण देणारे आर. बी. रमेश यांच्या मते, प्रज्ञानंदचा कल नेहमीच पुढाकार घेऊन वरचढ ठरण्याकडे राहिलाय. ‘गेल्या वर्षी फेब्रुवारी व मे महिन्यात कार्लसनवर त्यानं अशाच प्रकारे विजय मिळवला. प्रज्ञानंदनं सतत दबाव आणला आणि शेवटी त्याभरात नॉर्वेच्या खेळाडूकडून चुका झाल्या’, ते नजरेस आणून देतात…
- ‘बुद्धिबळात दोन शैली असतात, एक आक्रमक नि दुसरा संथ दृष्टिकोन. आक्रमक स्थितीत त्याची बाजू चांगली राहते. त्यात तो हल्ला चढवतो अन् जोखीमही पत्करतो. हा त्याचा भक्कम दुवा. पण आम्ही त्याला जोखीम न घेता शांतपणे, साध्या ‘पोझिशन्स’मध्ये खेळण्याच्या बाबतीत अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहोत’, रमेश सांगतात (मजेशीर बाब म्हणजे कार्लसन यांच्या ‘ऑफरस्पिल क्लब’चे प्रमुख प्रशिक्षक म्हणून सूत्रं सोपविण्यात आली ती त्यांच्याचकडे)…
- प्रज्ञानंदची धोके पत्करण्याची प्रवृत्ती भारताचे दुसरे ग्रॅडमास्टर दिब्येंदू बाऊआ यांनाही भावते…‘तो हळूहळू परिपूर्ण खेळाडू बनत चाललाय. त्यामुळं तो अव्वल दर्जाच्या खेळाडूंना पराभूत करतोय. या वयात जोखीम घेणं चांगलं असतं. जर आत्ताच सावधपणे खेळू लागलात, तर पुढं परिस्थितीचा सामना करणं कठीण होईल, जोखीम घेण्याची भीती वाटेल’, बारुआ लक्ष वेधतात…
खेळ जुनाच, ओळख नवी… : ‘विंडसर्फिंग’
‘विंडसर्फिंग’ हा पाण्याच्या पृष्ठभागावर ‘बोर्ड’ आणि ‘शीड’ वापरून खेळला जाणारा खेळ…1960 च्या दशकात कॅलिफोर्नियामध्ये हा प्रकार विकसित करण्यात आला. ‘विंडसर्फिंग’ अनेक प्रकारे अन् खुल्या समुद्रात तसेच ‘इनडोअर पूल’मध्येही केले जाऊ शकते. आता त्यात हलवता येण्याजोग्या ‘मास्ट’सह (शिडाचा कणा) सुधारित ‘सर्फबोर्ड’ वापरण्यात येतो…
- ‘विंडसर्फिंग’साठी आवश्यक उपकरणांमध्ये प्रामुख्याने अंतर्भाव होतो तो ‘सर्फबोर्ड’चा. त्याला पाण्याखाली राहणारे एक किंवा अधिक ‘फिन्स’ (पंख) आणि काही मॉडेल्सना ‘डेगर बोर्ड्स’ असतात. हे ‘बोर्ड’ ‘एक्सपांडेड पॉलीस्टीरिन फोम’, ‘इपॉक्सी’, ‘फायबरग्लास’, ‘पीव्हीसी’ किंवा ‘कार्बन सँडविच’चे बनलेले असतात. हलके ‘बोर्ड’ वेगाने ‘विडसर्फिंग’ करणाऱ्यांसाठी चांगले असतात…
- ‘सर्फबोर्ड’ सहसा दोन ते तीन मीटर लांब असतो. ‘विंडसर्फर्स’ त्यांच्या प्रकारानुसार ‘सर्फबोर्ड’मध्ये बदल करू शकतात. विविध प्रकारचे लांब आणि लहान बोर्ड असतात. त्या बोर्डवर ‘विंडसर्फर’ उभे राहतात, नंतर ते ‘बूम’च्या साहाय्याने शिडावर नियंत्रण ठेवून वारा कुठल्या दिशेने वाहतो त्यानुसार मार्गक्रमण करतात…
- ‘विंडसर्फिंग’साठी ‘सेलिंग’ आणि ‘सर्फिंग’ हे दोन्ही समजून घेणे आवश्यक आहे. कारण ते दोन्हींचे मिश्रण आहे…आधुनिक ऑलिम्पिकच्या सुऊवातीपासून नौकानयन हा एक प्रमुख खेळ राहिलेला असला, तरी ‘विंडसर्फिंग इव्हेंट’ (ज्याला ‘सेलिंग’ किंवा ‘बोर्डसेलिंग’ असेही म्हटले जाते) 1984 पासून त्यात झळकला, तर महिलांच्या स्पर्धेचा प्रथमच समावेश झाला तो 1992 साली…
- ऑलिंपिक ‘विंडसर्फिंग’मध्ये ’वन डिझाईन’ बोर्ड वापरतात. म्हणजे सर्व ‘विंडसर्फर’ समान प्रकारचे ‘बोर्ड’, ‘डॅगरबोर्ड’, ‘फिन्स’ नि ‘शीड’ वापरतात…ऑलिम्पिकमध्ये जेव्हा हा खेळ प्रथम झळकला तेव्हा दोन प्रकारचे बोर्ड समावेशासाठी उपलब्ध होते-मूळ ‘विंडसर्फर वन डिझाइन’ व ‘विंडग्लायडर’. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ‘विंडग्लायडर’ला निवडले होते. मात्र तो बोर्ड फक्त एका ऑलिम्पिकसाठी वापरला गेला…
- ऑलिम्पिकमध्ये ‘बोर्ड’चे प्रकार असे बदलत गेले आहेत…1984-‘विंडग्लायडर’, 1988-‘डिव्हिजन 2’, 1992-‘लेचनर’, 1996 ते 2004-‘मिस्ट्रल वन’, 2008-आरएस एक्स…
- ‘विंडसर्फिंग’मध्ये ‘सर्फर’च्या डोक्याचे कोणत्याही किरकोळ ते घातक जखमांपासून संरक्षण करण्यासाठी ‘हेल्मेट’ वापरले जाते…तसेच थेट सूर्यप्रकाशापासून तसेच पाण्यावर परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी ‘सनग्लासेस’ वापरले जातात. सूर्यप्रकाश नि वारा यामुळे डोळ्यांना येऊ शकणारा थकवा त्यातून टळू शकतो…
- पायांना अन् खास करून बोटांना जखम होण्याच्या किंवा ओरखडे येण्याच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी ‘शूज’ वापरले जातात, तर ‘वेटसूट’ हा ‘स्किनटाइट’ पोशाख ‘फोमयुक्त निओप्रीन’पासून बनविलेला असल्याने पाण्यात शरीराला उबदार ठेवतो…याखेरीज ‘रेस्क्यू कोट’ची जोड दिली जाते. हा प्रकार म्हणजे एक हलके ‘लाइफ जॅकेट’, जे पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यासाठी खेळादरम्यान परिधान करणे आवश्यक असते…
– राजू प्रभू
अजिंक्य, अपराजेय म्हणजे कॅटी लेडेकी!

कॅथलिन लेडेकी… ही कोण असा प्रश्न पडला असेल. कॅथलिन उर्फ कॅटी
लेडेकी ही अमेरिकन जलसम्राज्ञी. हा शब्द तिला तंतोतंत लागू आहे. कारण तिचा पराक्रम, तिची कामगिरी तशीच आहे. कॅटीचे आजोबा झेकोस्लोव्हाकियातून अमेरिकेत आले. आजी ज्यू धर्माची, आई आयरिश, कॅटी रोमन कॅथॉलिक. वॉशिंग्टनमध्ये भाऊ मायकेलसोबत तरण तलावावर जायची. जेमतेम वर्षांची असेल, तिने पोहायला सुरु केले. वेग हाच प्रथम निकष होता. पुढे जात पाण्यातला वेग तिच्या आयुष्यालाही आला. कॅथीच्या याच गुणावर तिचे सहकारीही लुब्ध आहेत. ते म्हणतात, ती आमचे प्रेरणास्थान आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये ती सहभागी झाली तेव्हा अवघी 15 वर्षांची होती. 800 मीटर्स फ्रीस्टाइलचे सुवर्णपदक पटकाविल्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. चार वर्षांनंतर ती रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल झाली. मात्र तोपर्यंत तिने तरण तलावावर स्वत:चे साम्राज्य निर्माण केले होते. 200, 400, 800 आणि 1500 मीटर्स फ्रीस्टाइलची विजेतीपदे, अनेक विक्रम तिच्या नावावर होते. कॅटी ‘लेडेकी स्लॅम‘ नावाचं नवं साम्राज्य तिने उभं केलं होतं. तमाम जलतरण विश्व ज्याला पाण्यावरचा चमत्कार मानतं तो मायकेल फेल्प्स तिच्या जलतरणाचा वेडा आहे. फॅन आहे. फेल्प्स म्हणत होता, कॅटी कणखर मनाची आहे. तिला पोहताना पाहणं यासारखा दुसरा आनंद नाही. वयाच्या 15 व्या वर्षी लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने समोरच्या प्रतिस्पर्ध्यांना उद्ध्वस्त केलं, ती उत्तरोत्तर अधिक वेगात पोहतेय, असे फेल्प्स सांगत होता. 800 मीटर्स शर्यतीत अन्य स्पर्धक आणि तिच्यात दुसऱ्या टप्प्यापासूनचे वाढत गेलेले सुमारे 15 ते 25 मीटर्सचे अंतर शेवटपर्यंत कायम राहिले. जगातील आठ सर्वोत्तम जलतरणपटू अंतिम फेरीत असतात. त्या सर्वांना तिने नवशिके जलतरणपटू ठरविले.
विक्रमावर विक्रम
अजिंक्य, अपराजेय म्हणजे काय, हे कुणाला सांगायचे असेल तर त्यासाठी कॅटी लेडेकी सारखे दुसरे चांगले उदाहरण नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 800 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कॅटी सलग सहाव्यांदा तर 1500 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात पाचव्यांदा ती वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे. या अंतरात वर्ल्ड चॅम्पियनशीप असो की ऑलिम्पिक असो, एकदाही ती हरलेली नाही. 800 मीटर अंतराच्या एक दोन नव्हे तर तब्बल 27 सर्वोत्तम वेळा तिच्या एकटीच्याच नावावर आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये थोडीथोडकी नाहीत तर 21 पदकं तिच्या नावावर आहेत आणि यामध्ये 21 सुवर्णपदकं आहेत. बुडापेस्ट येथे गतवर्षी झालेल्या वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशीपमध्ये तिने 800 मीटर फ्रीस्टाईलचे सुवर्णपदक जिंकण्यासाठी 8 मिनीट 8.04 सेकंदाची वेळ दिली. ही या अंतराची पाचवी सर्वोत्तम वेळ आहे. त्यात 2016 च्या ऑलिम्पिकमधील 8 मिनीट 4.79 सेकंदाची विश्वविक्रमी वेळसुध्दा आहे. यात भर पडली आहे ती यंदाच्या वर्षात ऑगस्टमध्ये जपानमध्ये झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील 800 व 1500 मी फ्रीस्टाईल प्रकारातील सुवर्णपदकाची. मागील आठवड्यात कॅटीने या दोन्ही प्रकारात सुवर्ण जिंकत महान जलतरणपटू मायकेल फेल्प्सचा (15) सर्वाधिक वेळा वैयक्तिक सुवर्ण जिंकण्याचा विक्रम मागे टाकला. आता, ती वैयक्तिक 16 सुवर्ण जिंकणारी पहिली जलतरणपटू ठरली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये बोलबाला
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कॅटी लेडेकीएवढी पदकं जिंकणारी दुसरी कोणतीही महिला जलतरणपटू नाही. तिच्यानंतर स्वीडनची सारा योस्ट्रॉम व अमेरिकेची नताली कोघलीन या दोघींकडे 19 पदके आहेत. गत आठवड्यात तिने 4×200 मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य तर 400 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली. याशिवाय, 800 व 1500 मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड जिंकत वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आपले 21 वे सुवर्णपदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये लेडेकीची 21 सुवर्णपदकं ही पुरुषांमधील रायन लॉट याच्या बरोबरीने आहेत. या दोघांपेक्षा केवळ मायकेल फेल्प्स हाच पुढे आहे. फेल्प्सच्या नावावर वर्ल्ड चॅम्पियनशीपची 26 पदके आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीवर तिची प्रतिक्रियाही तितकीच बोलकी आहे. जागतिक जलतरणामध्ये मिळवलेले यश हे कितीतरी वर्षांची मेहनत आहे. 11 वर्षांपूर्वी मी लंडनमध्ये पहिले पदक जिंकले. त्यावेळी एखाद दुसरे यश मिळवणारी ही खेळाडू असल्याचे बोलले गेले. आणि आता बघा, 10 वर्षानंतरही माझे सुवर्णपदकं जिंकणे सुरुच आहे. मात्र अजुनही भविष्याबाबत मी तेवढीच उत्साहीत आहे. प्रत्येक जण मला प्रोत्साहीत करत होता आणि मी माझ्या शैलीवर मेहनत घेत होते. त्यामुळे हे यश माझ्यासाठी फारच उत्साहवर्धक आहे. 26 वर्षाची असलेल्या कॅटीने अवघे जलतरण क्षेत्र कवेत घेतले आहे. जगातील अशी कोणतीही स्पर्धा नाही, ज्यामध्ये कॅटीने यश मिळवलेले नाही. भविष्यात देखील अशीच कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ती सांगते.
पॅटीविषयी थोडेसे…
कॅटीने आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिपमध्ये एकूण 21 सुवर्णपदके जिंकली आहेत, त्यापैकी 16 वैयक्तिक आणि 5 सांघिक स्पर्धांमध्ये आहेत. तिने 2013 मध्ये बार्सिलोनामध्ये तीन वैयक्तिक आणि एक सांघिक अशी चार सुवर्णपदके जिंकली होती. 2015 मध्ये कझान, रशिया येथे 4 वैयक्तिक आणि एका सांघिक स्पर्धेसह एकूण 5 सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली होती. 2017 बुडापेस्ट येथील स्पर्धेत तिच्याकडे तीन वैयक्तिक आणि दोन सांघिक पदकांसह एकूण पाच पदके होती. 2019 मध्ये तिला फक्त एक सुवर्ण जिंकता आले. 2022 मध्ये पॅटीने बुडापेस्टमध्ये तीन वैयक्तिक आणि एका सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. यावेळी जपानमध्ये तिने दोन गोल्डसह एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये 1, 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये 4 तर 2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 2 सुवर्णपदक तिने जिंकली आहेत.
– विनायक भोसले









