बालचमूंचा हिरमोड, दुरुस्ती करण्याची मागणी
► प्रतिनिधी / बेळगाव
वाढत्या शहरीकरणामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. यासाठी त्यांना उद्यान अथवा मैदानावर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु शहरातील उद्यानांची अवस्था भकास झाली असून, खेळाचे साहित्य मोडून पडले आहे. साहित्य तुटून अनेक महिने झाले तरी दुरुस्तीकडे महापालिकेचे दुल होत आहे.
महापालिकेतर्फे शहरातील उद्यानांचा विकास तसेच स्वच्छता केली जाते. शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक क्रीडा साहित्य उपलब्ध आहे. परंतु यातील बरेचसे साहित्य सध्या मोडकळीला आले असल्याने त्याचा वापर बंद आहे. त्यामुळे बालचमूंचा हिरमोड होत असल्याने उद्यानापर्यंत खेळण्यासाठी आलेल्या मुलांना पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. क्रीडा साहित्याची दुरुस्तीची मागणीही केली जात आहे.
काही झोपाळ्यांचे पट्टे तुटले आहेत, तर सीसॉचे खिळे निखळल्याने ते देखील बंद आहे. त्याचबरोबर इतर साहित्यही निकामी झाले आहे. त्यामुळे महापालिकेने या समस्येकडे लक्ष पुरवून लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.









