वार्ताहर/सांबरा
वायुदल केंद्र सांबरा येथे पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एकमध्ये मंगळवारी 43 वा वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात झाला. प्रारंभी एअरमन ट्रेनिंग स्कूलचे स्टेशन कमांडर राजदीप सिंग (व्हीएसएम) यांचे शाळेमध्ये शानदार स्वागत केले. त्यांनी ध्वजारोहण करून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी, शिस्त व निष्पक्ष खेळ पाहून समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य संदीप आचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मुलींच्या ब्रास बँड संघाने शानदार प्रात्यक्षिके सादर करत सर्वांची वाहव्वा मिळवली. या संघाने सलग दोन वर्षे राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्वल केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शानदार पथसंचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली. बाल वाटिका व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचे खेळ तसेच इतर स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण समारंभाने झाली. यावर्षीचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून 11 वी च्या अयान याला तर ऐश्वर्या हिला उत्कृष्ट विद्यार्थिनीचा पुरस्कार देऊन गौरविण्या करण्यात
आला.









