पुणे / प्रतिनिधी :
Sporadic rain in Konkan; Cold in Vidarbha पुढील दोन दिवस कोकणात तुरळक पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, मराठवाडा, विदर्भात थंडीचा कडाका कायम असून, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडीची घट झाली आहे. शुक्रवारी गोंदियात सर्वात कमी 11.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
उत्तरेकडील राज्यांत थंडी वाढल्याने राज्यातही थंडीचा प्रभाव वाढला आहे. गेल्या आठवडय़ात बोचऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतला. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण झाले. यामुळे थंडीतही घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील अनेक शहरांतील बोचरी थंडी आता घटली आहे. किमान तापमानाचा पाराही आता थोडा वर आला आहे. दरम्यान, विदर्भ तसेच मराठवाडय़ातील काही भागांत थंडीचा जोर अद्यापही आहे. किमान तापमान येथे घटले आहे.
अधिक वाचा : एक इंचही जागा कर्नाटकडे जाता कामा नये; अजित पवारांनी ठणकावले
पुढील तीन दिवसांची स्थिती पाहता कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या प्रमुख शहरांत शुक्रवारी सकाळी नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये : कुलाबा 22.8, सांताक्रूझ 20.6, रत्नागिरी 23.1, डहाणू 19.3, पुणे 15.9, लोहगाव 18, नगर 17.1, जळगाव 15.7, कोल्हापूर 21.5, महाबळेश्वर 16.6, नाशिक 13.4, सांगली 20.4, सातारा 20.5, सोलापूर 21.7, उस्मानाबाद 17.2, औरंगाबाद 13.4, परभणी 15.6, नांदेड 17, अकोला 14.2, अमरावती 14.5, बुलढाणा 14.2, ब्रह्मपुरी 13.9, चंद्रपूर 15.4, नागपूर 12.7, वाशिम 12.6, वर्धा 13.6, पणजी 24.2.