नंदगड महालक्ष्मी यात्रेला भाविकांचे उधाण
खानापूर/हलशी
नंदगड महालक्ष्मी यात्रोत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली असून देवीची मिरवणूक गल्लोगल्लीत सुरू आहे. बुधवारी विवाह सोहळा पार पडल्यानंतर देवीने आपले माहेर असलेल्या जुने नंदगडात मिरवणुकीने जाऊन सर्वांच्या ओट्या स्वीकारल्या. बुधवारी दुपारी 3 वाजता मठ गल्ली येथे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांची ओटी स्वीकारल्यानंतर रात्री वास्तव्यासाठी देवीचा सवाल करण्यात आला. यावेळी सवालाची बोली उद्योजक वल्लभ गुणाजी यांनी 3.50 लाखावर लावल्याने त्यांच्या घरासमोर बुधवारी रात्री महालक्ष्मीचे वास्तव्य होते. यावेळी इस्कॉन संस्थेचे हरिभूषण यांचे कीर्तन व प्रवचन झाले. नंतर वारकरी सांप्रदायाचे भजन होऊन रात्रभर देवीचा जागर करण्यात आला.
गुरुवारी सकाळी विधिवत पूजा झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत देवीच्या मिरवणुकीला पुन्हा सुरुवात झाली. मसूरकर गल्ली, कॉलेज रोड, नारायणदेव मंदिर, बजंत्री गल्ली, सुंदरानगर, सोनार गल्ली, भातकांडे गल्लीत फिरून मानकरी व ग्रामस्थांच्या ओट्या स्वीकारल्या. सायंकाळी श्री लक्ष्मीदेवी मसूरकर गल्लीच्या प्रवेशद्वारावर आल्यावर नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी, भंडाऱ्याची उधळण व हर हर महादेवचा जयघोष करत देवीचे जल्लोषी स्वागत केले. सायंकाळी मसूरकर गल्लीच्यावतीने 2.65 लाखाची बोली लागली. त्यामुळे गुरुवारी रात्री देवी मसूरकर गल्लीत वास्तव्यास असून हेब्बाळ येथील सेंगी भजनी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानंतर तेथे रात्रजागर करण्यात आली.









