शहरातील 6 हजार जणांनी नोंदविला अभिप्राय
बेळगाव : केंद्र सरकारने ग्राम स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील तसेच ग्रामीण भागातील स्वच्छ भारत सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी एक वेबसाईट सुरू केली असून त्यामध्ये स्वच्छता मोहिमेबाबत आपले म्हणणे मांडायचे आहे. शहरामध्ये कशाप्रकारे स्वच्छता होत आहे, पुढे स्वच्छता करण्यासाठी काय उपाययोजना करावी, याबाबत अभिप्राय मागण्यात येत आहेत. जवळपास शहरातील 6 हजार जणांनी या वेबसाईटच्या माध्यमातून आपले अभिप्राय कळविले आहेत. महापालिकेच्या माध्यमातून ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेचे कर्मचारी विविध भागांमध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेची मते नोंदवून घेत आहेत.
वेबसाईटवर अभिप्राय नोंद
स्वच्छ भारत अभियानबाबतची तयार करण्यात आलेली वेबसाईट संबंधितांना लिंक केली जाते. त्यानंतर त्यावर आपला मोबाईल क्रमांक, आपले शहर याबाबतचा उल्लेख करून त्यामध्ये आपला अभिप्राय व्यक्त करायचा आहे.
उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड
शहरातील विविध ठिकाणी असलेल्या संस्थांमध्ये तसेच प्रभागांमध्ये जाऊन महापालिकेचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत हे काम करत आहेत. आतापर्यंत 6 हजार जणांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. संपूर्ण देशामध्ये ही मोहीम केंद्र सरकार राबवत आहे. या मोहिमेमध्ये ज्या शहरांबाबत चांगला अभिप्राय येईल, त्या शहरांच्या महापालिकेला पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. मते मांडण्यासाठी दि. 14 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सध्या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.









