विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये जल्लोषात स्वागत : गावागावांमध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी : विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप
वार्ताहर /किणये
तालुक्यात शाळा प्रारंभोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवार दि. 31 रोजी तालुक्याच्या विविध गावातील शाळांमध्ये शाळा प्रारंभोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळांना तोरण बांधून फुलांची सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना गोड पदार्थ व विविध भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. बुधवारी प्रत्येक गावातील शाळांची घंटा एका वेगळ्याच रंगात, आनंदोत्सवात वाजली. एसडीएमसी कमिटी, शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेची चांगलीच सजावट केली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर नारळाचे व केळीचे तोरण बांधण्यात आले होते. शाळांच्या समोर विविध रंगांची आकर्षक अशी रांगोळी घालण्यात आली होती. यामुळे शाळेचा पहिला दिवस अगदी रंगीत स्वरूपाचा असा या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. प्रशासनाच्या आदेशानुसार दि. 29 मे पासून शाळांना सुरुवात झाली. मात्र गेले दोन दिवस शाळांची स्वच्छता करण्यात आली व प्रशासनाच्या नियमावलीनुसार 31 रोजी विविध गावांमध्ये शाळा प्रारंभोत्सव करण्यात आला.
बुधवारी सकाळपासूनच या सोहळ्याची तयारी विद्यार्थ्यांनी केली. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही शाळांमध्ये पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये विविध रंगांचे फुगे देण्यात आले. बऱ्याच शाळांमध्ये पाठ्यापुस्तकांचे वितरणही करण्यात आले. दुपारी विद्यार्थ्यांना जेवणामध्ये गोड पदार्थ करण्यात आला होता. काही शाळांमध्ये गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणेही केली. बहाद्दरवाडी गावातील प्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला. शाळेला तोरण बांधण्यात आले होते. शाळेच्या समोर आकर्षक अशी रांगोळी घालण्यात आली होती. सजवलेल्या बैलगाडीतून इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सजवलेल्या बैलगाडीसह शालेय विद्यार्थ्यांची गावात प्रभातफेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या मुलांना शाळेला पाठवा, अक्षर कळे संकट टळे, माझी शाळा माझा अभिमान अशा घोषणा दिल्या. तसेच विविधप्रकारचे शाळांबद्दल जनजागृती करणारे फलकही विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेतले होते. शाळा प्रारंभोत्सवाचे व बैलगाडीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य मल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करून या प्रारंभोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापिका एस. एस. पाटील, एसडीएमसी अध्यक्ष आण्णाप्पा पाटील, उपाध्यक्षा लक्ष्मी मधवाल, सदस्य परशुराम पाटील, संतोष पाटील, यल्लाप्पा पाटील, ज्योती देसुरकर, कविता पाटील आदींसह बाळू पाटील, संभाजी पाटील, कुलदीप पाटील, शिक्षिका कांबळे, शिक्षक चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रभात फेरीसाठी रवळू पाटील यांनी आपली बैलजोडी देऊन सहकार्य केले.
पिरनवाडातील शाळेत पाठ्यापुस्तकांचे वितरण
पिरनवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत शाळा प्रारंभोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोड जेवण, गणवेश व पाठ्यापुस्तके यांचे वितरण करण्यात आले. शिक्षण खात्याच्या सूचनेनुसार विविध कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक लक्ष्मण तलवार, शिक्षक नारायण पाटील, सिद्धलिंग मल्लेशी, एम. जी. दडीकर, आर. आर. कुलकर्णी, एन. डी. लोहार, जी. बी. बांडगी, एसडीएमसी अध्यक्ष प्रशांत शहापूरकर, उपाध्यक्षा ज्योती डेळेकर, राजश्री माने, बसवंत सावंत आदी उपस्थित होते.
कर्ले गावातही विद्यार्थ्यांचे स्वागत
कर्ले गावातील प्राथमिक मराठी शाळेतही आगळ्यावेगळ्या स्वरूपात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. या शाळेतही बैलगाडीतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गावात बैलगाडी व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी एसडीएमसी अध्यक्ष नरसिंग देसाई, मुख्याध्यापिका पूजा पाटील आदींसह सदस्य व शिक्षक वर्ग उपस्थित होते.









