लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे आयोजन
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि. (मल्टिस्टेट) आयोजित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सलग दोन तासांहून अधिक वेळ या नाटकातील कलाकारांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले. प्रजाकार व सोहम प्रॉडक्शन निर्मित व्ही. आर. प्रॉडक्शन प्रकाशित या नाटकाचा प्रयोग गुरुवारी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडला. या नाटकाचे सहप्रायोजकत्व सेंट्राकेअर हॉस्पिटलने स्वीकारले होते. सध्या गाजत असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या धर्तीवर हे नाटक बेतले आहे. याचे लेखन प्रसाद खांडेकर यांचे असून त्यांच्यासह नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भाग्यश्री मिलींद व भक्ती देसाई यांचा सहभाग आहे.
प्रसाद खांडेकर आणि सचिन कदम हे निर्माते असून संगीत संयोजन आणि निर्मिती वैभव जाधव यांची आहे. नेपथ्य सिद्धेश सावंत आणि मंडळी, रंगमंच व्यवस्था सुजल व विनोद, नेपथ्य संदेश बेंदरे, संगीत सुनील कांबळे, प्रकाशयोजना शाम चव्हाण यांची आहे. नाटकाला निमिष कुलकर्णी यांनी दिग्दर्शन साहाय्य केले आहे. नाटकातील नृत्य दिग्दर्शन संतोष भांगरे यांनी केले असून कपडेपट व्यवस्था मंगेश पटके यांनी सांभाळली आहे. नाटकाच्या मध्यंतरात लोकमान्यचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, रिजनल मॅनेजर एम.एन. कुलकर्णी व सेंट्राकेअरचे वैद्यकीय संचालक रोहित देशपांडे यांनी कलाकारांचा सत्कार केला. प्रसाद खांडेकर यांनी रोहित देशपांडे यांचा सत्कार केला. सतत दोन तास धमाल विनोदांची पेरणी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.









