माडखोल हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे आयोजन
ओटवणे ; प्रतिनिधी
माडखोल माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघटना आणि मुर्तिकार उदय राऊत, देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय चित्रकला कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माडखोल माध्यमिक विद्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेचा एकूण १३० प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही लाभ घेतला.
यावेळी देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे, प्रा. विक्रम परांजपे, प्रा स्वप्निल बडवे, माडखोल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आंबेरकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुबोध राऊळ, सचिव अँड सुरेश आडेलकर, पोलीस पाटील तथा मूर्तिकार उदय राऊत आदी उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या मनात चित्रकलेची आवड निर्माण करून भविष्यात त्यांना आपल्या आवडीनुसार करिअरच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने माजी विद्यार्थी संघटनेच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्राचार्य रणजीत मराठे यांनी चित्रकला विषयातील करिअरच्या संधी व चित्रकला विषय आवडीने जोपासण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रा. विक्रम परांजपे यांनी प्रात्याक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एका व्यक्तीला आपल्यासमोर बसून अवघ्या २० मिनिटात तैल रंगाने त्या व्यक्तीचे चित्र रेखाटन करून उपस्थित सर्वानाच चकित केले.
यावेळी माडखोल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आंबेडकर यांनी या उपक्रमाबरोबरच माडखोल हायस्कूलच्या इमारतीचे उर्वरित रंगकाम पूर्ण करून दिल्याबद्दल माजी विद्यार्थी संघटनेचे आभार मानले.









