काणकोण : पैंगीणच्या श्री परशुराम पंचैग्राम देवस्थान समितीने परशुराम जयंतीनिमित्त पैंगीण आणि लोलये परिसरांत आयोजित केलेल्या श्री परशुराम रथयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. सकाळी 8 वा. श्री परशुराम मंदिराजवळून सजविलेल्या रथातून भगवान परशुरामाच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी श्री परशुराम मंदिराचे अर्चक निशिकांत टेंगसे यांनी रथातील भगवान परशुरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा केली आणि उपस्थित सुहासिनांनी मूर्तीची ओवाळणी केली. पैंगीणचे श्री परशुराम मंदिर ते श्री लक्ष्मीनारायण देवस्थान, श्री बेताळ, श्री नरसिंह परशुराम, श्री सातेरी, श्री गणपती, श्री मोहिनी, श्री भगवती, श्री शांतादुर्गा, समाजमंदिर, श्री गोपालकृष्ण, श्री केशव, श्री दामोदर आणि श्री निराकार देवालयापर्यंत या रथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये शंभरपेक्षा अधिक दुचाक्या तसेच गाड्या घेऊन परशुराम भक्त सहभागी झाले होते. देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि विविध देवस्थान व संस्थांचे प्रतिनिधीही या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
यावेळी वाहतुकीवर नियंत्रण ठेवतानाच मिरवणूक सुरळीतपणे होईल याची काळजी काणकोणचे उपजिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार कार्यालय आणि पोलीस यंत्रणेने घेतली. ज्या ज्या ठिकाणी रथ पोहोचला त्या प्रत्येक ठिकाणी देवस्थान समिती आणि स्थानिकातर्फे रथातील मूर्तीची पूजा करण्यात आली. पहिल्यांदाच अशा प्रकारची मिरवणूक आयोजित करण्यात आलेली असताना पैंगीण आणि लोलये ग्रामांतील श्री परशुराम भाविकांनी जो उत्साह दाखविला त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची प्रतिक्रिया देवस्थान समितीचे अध्यक्ष उदय प्रभुगावकर यांनी व्यक्त केली. या उत्सवानिमित्त श्रा. परशुराम मंदिरात खास फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती. संध्याकाळी सत्यविजय नाईक यांचे श्री परशुराम जयंतीवर प्रवचन झाले. पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जायला लागलो आहोत. भगवान परशुरामाने ब्रह्मतेज आणि क्षात्रतेजाचा अंगिकार केला. त्यांचेच अनुकरण करताना स्वत:चे रक्षण करण्यासाठी ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज अंगी बाळगण्याची गरज आहे. भारतातील गुरू-शिष्य परंपरा जगात नावारूपाला आलेली आहे. त्यामुळे साधना करा आणि वैयक्तिक उद्धारासाठी ब्रह्मतेज अंगी बाळगा, असे नाईक यांनी सांगितले. निशिकांत टेंगसे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पानक पूजेने या कार्यक्रमाची सांगता झाली.









