जरांगे -पाटीलांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी मराठा समाज एकवटला
वार्ताहर/ कुडाळ
मनोज जरांगे- पाटील हे मराठा बांधव आहेत. त्यांनी गेल्या एक महिन्यात मराठा बांधवांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. आज पुन्हा एकदा ते आंतरवाली सराटी येथे मराठ्यांना आरक्षण मिळावे, यासाठी आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या आमरण उपोषणाला व मराठा आरक्षणच्या मागणीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांचा पूर्ण पाठिंबा आहे. असे अखिल भारतीय मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक अँड सुहास सावंत यांनी येथे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचे पडसाद राज्यासह कुडाळ तालुक्यातही उमटले. त्यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी व मराठा समाजाच्या अन्य प्रश्नांबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात काढण्यात आलेल्या ‘मराठा जनसंपर्क यात्रेला’ मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रॅलीचा शुभारंभ सावंतवाडी मतदार संघात दोडामार्ग तालुक्यातील साटेली- भेडशी येथे शनिवारी झाला. त्यानंतर आज कुडाळ येथील मराठा समाज सभागृह येथे या यात्रेचा प्रारंभ झाला. येथील जिजामाता चौक येथे जिजामाता पुतळ्याला व शिवाजी नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही कार रॅली कुडाळ बाजारपेठ मार्गे गांधी चौक येथून पुन्हा जिजामाता चौकातून कुडाळ – पिंगुळी-माणगाव- वाडोस- हिर्लोक- आरोस- कट्टा अशी मार्गस्थ झाली.
यावेळी मराठा बांधवांनी “एक मराठा लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” अशी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी दिनेश म्हाडगुत, अनुपसेन सावंत, आनंद भोगले, रेवती राणे, अक्षता राणे, अनिल नाईक, सुनील सावंत,सचिन सावंत, आषिष काष्टे, शैलेश घोगळे, वैभव जाधव, शुभम राणे, हर्ष पालव आदीसह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









