राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष-माजी मंत्री जयंत पाटील प्रचार फेरीत सहभागी : विविध ठिकाणी सभांचे आयोजन

बेळगाव : दक्षिण मतदारसंघाचे समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांची रविवारी टिळकवाडी परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील सहभागी झाले होते. या प्रचारफेरीत टिळकवाडी परिसरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा गांधी रोड येथील सिद्धिविनायक मंदिरापासून रविवारी पदयात्रेला प्रारंभ झाला. महर्षि रोड, चौगुलेवाडी, द्वारकानगर, आयोध्यानगर, गोडसेवाडी परिसरात पदयात्रा उत्साहात झाली. सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांची प्रत्येक भागात पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. एकच दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, दक्षिण भागात कोंडुस्कर यांना दिवसेंदिवस प्रतिसाद वाढू लागला आहे. शनिवारी अनगोळ परिसरात प्रचारफेरीला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांचा उत्साह वाढला आहे. टिळकवाडी येथील महर्षि रोड परिसरात माजी नगरसेवक पंढरी परब यांनी उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचे स्वागत केले. टिळकवाडी येथील आयोध्यानगरमध्ये सभा झाली. यावेळी व्यासपीठावर समिती नेते प्रकाश मरगाळे, किरण गावडे, दिनेश ओऊळकर, अकुंश केसरकर आदी उपस्थित होते. यावेळी रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, दक्षिण मतदारसंघात अन्याय वाढला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेवरील अन्याय दूर करणे आवश्यक आहे. पंढरी परब म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार देश चालतो, त्यामुळे जनतेची सेवा करणारा प्रतिनिधी हा सज्जन असला पाहिजे. याप्रसंगी किरण गावडे, दिनेश ओऊळकर, अनंत देशपांडे, राजू आजगावकर, दयानंद कारेकर, संग्राम गोडसे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.









