वरूण धामणकरचा नवीन विक्रम, मराठा युवक संघ जलतरण स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठा युवक संघ व आबा हिंद स्पेर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व्या आंतरशालेय, आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या वरुण धामणकरने बेळगावचा नवा विक्रम नोंदवत जलद जलतरणपटूचा मान मिळविला. रोटरी मनपा जलतरण तलावात आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, वेगा हेल्मेटचे संचालक दिलीप चिंडक, उद्यमबागचे सीपीआय धर्मराज शिंदे, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बी. एस. काकतकर, मराठा बँकेचे चेअरमन दिनकर पवार, उपाध्यक्ष मारूती देवगेकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, सुहास किल्लेकर, शेखर हंडे, शिवाजी हंगीरगेकर व जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी चंद्रकांत गुंडकल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. बी. एस. काकतकर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
शालेय व महाविद्यालयीन अशा दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 300 हून अधिक जलतरणपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. महाविद्यालयीन गटात वरुण सुधीर धामणकर जीएसएस महाविद्यालयाचा खेळाडू याने 50 मी. फ्रीस्टाईलमध्ये 24.38 से. वेळ घेत नवा विक्रम नोंदविला. यावेळी मराठा युवक संघाचे पदाधिकारी, आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.









