प्रदर्शन पाहण्यासह खाद्य पदार्थांच्या आस्वादासाठी गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
गृहनिर्माण क्षेत्र एकाच छताखाली पाहण्याची संधी तरुण भारत पुरस्कृत घरकुल 2022 प्रदर्शनाने उपलब्ध करून दिली आहे. शनिवारीही नागरिकांनी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. प्रदर्शन पाहण्यासह खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
चौथा शनिवार असल्यामुळे अनेक सरकारी कार्यालयांना सुटी होती. शाळा महाविद्यालये यांनाही दुपारनंतर सुटी मिळाल्याने सायंकाळपासूनच प्रदर्शनाला गर्दी झाली होती. सीपीएड मैदानावर भरविलेल्या या प्रदर्शनाला बेळगावसह महाराष्ट्र व कोकणातून नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. गृहनिर्माण प्रकल्प, घर बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे घरकुलाचे स्वप्न बाळगणारे नागरिक मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत.
तरुण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशन यांच्या संयुक्तरीत्या दहाव्या वषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. फर्निचर, वॉटरप्रुफिंग, प्लायवूड, इमारतींचे साहित्य, हार्डवेअर, टाईल्स, सिमेंट यासह इतर साहित्य मांडण्यात आले आहे. याचबरोबर विविध खाद्य पदार्थ, गृहोपयोगी वस्तु यांचीही विक्री सुरू आहे. त्यामुळे खवय्यांसाठी ही पर्वणी ठरत आहे.









