पदवीपूर्वच्या‘आर्ट्स अँड कॉमर्स फेस्ट-हिस्ट्री क्लब’चे आयोजन : शनिवारपर्यंत खुले
बेळगाव : विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाद्वारे दिलेली माहिती प्रत्यक्ष कशा पद्धतीने महत्त्वाची ठरते, हे पटवून देण्यासाठी आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालय प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, सोलार निर्मिती, ज्वालामुखी यासह इतर विषयांची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार 70 हून अधिक प्रकल्प प्रदर्शनात मांडल्याने ते पाहण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. आरपीडी आर्ट्स अँड कॉमर्स पदवीपूर्व महाविद्यालयातर्फे ‘आर्ट्स अँड कॉमर्स फेस्ट व हिस्ट्री क्लब’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्ञानेश कलघटगी, एसकेई सोसायटीचे संचालक मधुकर सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, माधुरी शानभाग, सरिता पाटील व प्राचार्या सुजाता बिजापुरे उपस्थित होत्या. प्रदर्शन शनिवार दि. 2 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत खुले राहणार आहे. पेट्रोल पंप, कॅफे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलारवरील उपकरणे, आधुनिक शेती, सोन्या-चांदीची दुकाने यासह इतर प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मदतीने प्रकल्प साकारले आहेत. तसेच माहिती फलकांद्वारे बेळगाव परिसरातील ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शाळांमधून मोठा उत्साह
आरपीडी कॉलेज परिसरातील शाळांचे शेकडो विद्यार्थी प्रदर्शनाला भेटी देत आहेत. अभ्यासक्रमाशी निगडीत असणारे प्रकल्प पाहण्यासाठी शिक्षकही आवर्जून विद्यार्थ्यांना घेऊन येत आहेत. बालिका आदर्श, ठळकवाडी स्कूल, हेरवाडकर स्कूल, शानभाग स्कूल, भंडारी स्कूल यासह आसपासच्या 2 ते 3 हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला दोन दिवसात भेटी दिल्या.









