काणकोण पालिका क्षेत्राला स्वच्छतेत राष्ट्रीय स्तरावर मिळालेला मान कायम राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत : नगराध्यक्ष गावकर
काणकोण : संपूर्ण भारतातील सदर गटातील 1850 नगरपालिकांमधून काणकोण नगरपालिकेला मागच्या वर्षी स्वच्छतेसाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. हा मान आपल्याला कायम ठेवायचा असून त्यासाठी काणकोण पालिकेतील 12 ही प्रभागांतील व्यापारी, सरकारी कर्मचारी, मासळी मार्केट व भाजी मार्केटातील विक्रेते तसेच अन्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी केले होते. या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल गावकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. 1 रोजी सकाळी चावडी वॉर्डातून या स्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर चावडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक देसाई, अजय फळदेसाई, अन्य कार्यकर्ते, चावडी प्रभागातील बबेश बोरकर, संजय कोमरपंत, बाबू नाईक, शंकर नाईक, भानुदास रायकर, पूर्णानंद केंकरे व अन्य नागरिकांनी त्यात भाग घेतला. चावडीवरील जुने बसस्थानक, मासळी मार्केट, भाजी मार्केटमध्ये यावेळी सफाई करण्यात आली. चावडीवर मासळी विक्रेत्यांसाठी लवकरच 6 कोटी रु. खर्च करून नवीन मार्केट उभारण्यात येणार आहे. मात्र सध्या जे मार्केट उपलब्ध आहे त्याची स्वच्छता राखणे हे या मार्केटात व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे काम आहे. स्वच्छता ही स्वत:पासून सुरू व्हायला हवी. सर्व गोष्टी सरकार करेल हे विसरून चला, असे नगराध्यक्ष गावकर म्हणाले. अलीकडे काणकोणातील नगरपालिका, आगोंद पंचायत, खोतीगाव पंचायतीला विविध क्षेत्रांत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. राज्य सरकारने त्याची दखल घ्यायला हवी होती. मात्र तशी दखल घेण्यात आली नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
आज 2 रोजी काणकोण भाजप मंडळाने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले. काणकोण पालिकेला जो पुरस्कार मिळालेला आहे तो मान कायम राखून ठेवण्याच्या दृष्टीने आपण जागृतीसाठी चावडीवर व्यवसाय करणाऱ्या 20 वाहतूक रिक्षांना स्वच्छतेचा संदेश देणारे फलक दिले आहेत. त्याचबरोबर बाराही प्रभागांत एकाच दिवशी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. काणकोणातील प्रशासकीय संकुलातील उपजिल्हाधिकारी, मामलेदार कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. स्वत: उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, अव्वल कारकून गायत्री देसाई, प्रमोद गावकर, सर्कल निरीक्षक रोहिदास गावकर, सर्व्हेअर नरेंद्र अग्रासनी, अन्य विभागांतील कर्मचारी त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, कृषी, जलस्त्रोत खात्यांमधील कर्मचाऱ्यांचा यात समावेश राहिला. निरीक्षक चंद्रकात गावस यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोणच्या पोलिसांनी या स्वच्छता अभियानात भाग घेऊन पोलीस स्थानक परिसर साफ केला. काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. जुझे तावारीस, डॉ. स्नेहा चोडणकर, डॉ. दिवाकर वेळीप, अन्य डॉक्टर, सेनिटरी निरीक्षक प्रणय नाईक, प्रशांत खोलकर, नीलिमा भगत, दिलखुश चोडणकर, मनोज तारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनीही या सफाई मोहिमेत भाग घेतला. काणकोणच्या सर्व पंचायती, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी देखील या स्वच्छता मोहिमेत भाग घेताना आपला गाव साफ ठेवण्याचे आवाहन केले.









