वार्ताहर /शिवोली
हळर्णकर चॅरिटेबल ट्रस्ट व ग्लेनमार्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कर्करोग तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिर कोलवाळ येथे संपन्न झाले. येथील श्रीराम विद्या मंदिराच्या सभागृहात झालेल्या शिबिरात 30 महिलांनी लाभ घेतला. डॉ. शितल चौधरी व डॉक्टर मयुरी कळंगुटकर यांनी तपासणी व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर मच्छिमार खात्याचे मंत्री नीलकंठ हळर्णकर, ग्लेनमार्क फाऊंडेशनचे पदाधिकारी बाळकृष्ण कामत, रोहित गुप्ता, डॉ. शितल चौधरी, मयुरी कळंगुटकर व ट्रस्टचे अध्यक्ष विशाल देसाई उपस्थित होते. यावेळी मंत्री हळर्णकर म्हणाले, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कुठल्याही आजारावर वेळीच उपचार केल्यास शरीराची हानी होत नाही. स्तन कर्करोगासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून ही एक चिंतेची बाब आहे. यावर वेळीच उपचार करून घेण्याची नितांत अवश्य असल्याचे मंत्री म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल देसाई यांनी केले.









