युवती व महिलांसह तब्बल ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
ओटवणे प्रतिनिधी
Spontaneous response to blood donation camp at Satuli
सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील सातुळी सारख्या छोट्याशा गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात युवती व महिलांसह तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, चौकुळचे सामाजिक युवा कार्यकर्ते दिनेश गावडे, सातुळी बावळाट ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्निल परब, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे, पोलीस पाटील अरुण परब, बाळू कानसे, श्रीराम कानसे, ओमकार परब, गिरीश गावडे आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरातील रक्त संकलन ठाणे येथील ब्लड लाईन या ब्लड बँकेचे डॉ राजीव जाधव, लॅब टेक्निशियन विनोद पाटील, मुकेश पाटील, हरमिथ सिंग, विकास आंब्रे, सनी वाघेला यांनी केले. या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना स्वराज्य ग्रुपच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.









