ग्रामीण रुग्णालय मालवण आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
मालवण | प्रतिनिधी :
‘स्वस्थ नारी, सशक्त नारी’ या अभियानाचा एक भाग म्हणून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मामा वरेरकर नाट्यगृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला.नवरात्रोत्सवात आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ता सौ. शिल्पा यतीन खोत आणि माजी बांधकाम सभापती यतीन खोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती ठोंबरे, राजेश पारधी, मनोज चव्हाण, अधिपरिचारिका प्रांजली परब, रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीपाद ओगले, रक्तपेढी सहायक ऋतुजा हरमलकर, परिचर विजय निरुखेकर, प्रथमेश घाडी, नितीन गावकर, दादा वेंगुर्लेकर, सुभाष कुमठेकर, मानसी घाडीगावकर, शांती तोंडवळकर, स्वप्नील परुळेकर यांच्यासह रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा खोत यांनी यावेळी “रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रक्तदान करून या पवित्र उत्सवाची सुरुवात करणे, ही एक विशेष बाब आहे,” असे सांगितले. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.









