प्रतिनिधी / बेळगाव
अंमलीपदार्थमुक्त बेळगावसाठी शुक्रवारी सकाळी पोलीस दलाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांच्या पुढाकारातून काढलेल्या या रॅलीत शहरातील वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यासह शहरातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांनी या रॅलीत सहभाग घेतला होता.
कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात रॅलीची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली निघाली. विद्यार्थी व पोलीस अधिकाऱ्यांच्या हातात अंमलीपदार्थविरोधी जनजागृती करणाऱ्या घोषवाक्यांचे फलक होते. अंमलीपदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्यासाठी शहरातील 40 पोलीस अधिकाऱ्यांनी 31 शाळा-कॉलेजना भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे.
5,500 हून अधिक विद्यार्थ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले असून याविषयी निबंध स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली आहेत. अंमलीपदार्थमुक्त बेळगावसाठी पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.









