लोकमान्य सोसायटी आयोजित तीन दिवसीय प्रदर्शन : स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड यांच्यावतीने आयोजित दिवाळीनिमित्त भरविण्यात आलेले आकाशदिवे आणि विविध साहित्याचे प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले. एम. व्ही. हेरवाडकर शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली जे. एन. भंडारी स्कूल ऑफ फाईन आर्ट, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, स्वाध्याय विद्यामंदिर, एम. आर. भंडारी स्कूल व व्ही. एम. शानभाग स्कूल या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात भाग घेतला. यानिमित्ताने आकाशदिवे व अन्य सजावटीच्या वस्तूंची स्पर्धा घेण्यात आली. परीक्षक म्हणून दर्शन चौधरी व महेश होनुले यांनी काम पाहिले. बक्षीस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचे अधिकारी नागराज जक्कण्णावर उपस्थित होते. एम. व्ही. हेरवाडकर शाळेचे प्राचार्य सुनील कुसाणे, उपप्राचार्य अरुण पाटील, प्रशासक लक्ष्मी पाटील, मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य एम. बी. हुंदरे व जे. एन. भंडारी स्कूल ऑफ फाईन आर्ट्सचे प्राचार्य सुभाष देसाई यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन लोकमान्य सोसायटीचे पीआरओ राजू नाईक यांनी केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे
आकाश कंदील स्पर्धा कॉलेज गट-1) शुभ्रता सनदी, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ फाईन आर्ट, 2) मनय सोनार, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ फाईन आर्ट, 3) प्रणव झुत्ती, जे. एन. भंडारी स्कूल ऑफ फाईन आर्ट. आकाश कंदील स्पर्धा शाळा गट- 1) अथर्व जाधव, व्ही. एम. शानभाग मराठी शाळा, 2) विद्या नलकलार, स्वाध्याय विद्या मंदिर, 3) नकुल गावडे, ठळकवाडी हायस्कूल. चित्रकला स्पर्धा तीन गटात आयोजित करण्यात आली होती. अ गट- 1) अनिशा रुपान, एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, 2) यश चौगुले, व्ही. एम. शानभाग स्कूल, 3) स्वरा असोदेकर, एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, ब गट- 1) अनन्या सोमनाचे, एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, 2) रेहा शिंदे एम. व्ही. हेरवाडकर स्कूल, 3) साई एम. सालगुडी, व्ही. एम. शानभाग स्कूल. क गट- 1) रोहन मंडोळकर, व्ही. एम. शानभाग स्कूल, 2) शिवराज चौगुले, एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश हायस्कूल, 3) कुसुम देसाई, स्वाध्याय विद्या मंदिर. तसेच सर्व प्रकारात उत्तेजनार्थ बक्षिसे दिली. यावेळी शाळांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









