अवैध दारूविक्री, जुगार, चोरी, वाहतुकीची समस्या, कर्णकर्कश हॉर्न, मोकाट कुत्र्यांबाबत तक्रारी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या 18 व्या फोन ईन कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकांनी अवैध दारूविक्री, जुगार, चोरी याबरोबरच वाहतुकीची समस्या, कर्णकर्कश हॉर्न आणि मोकाट कुत्र्यांची समस्या अशा तक्रारीसुद्धा जिल्हा पोलीसप्रमुखांकडे नोंदविल्या.
रायबाग तालुक्याच्या चिंचली गावामध्ये मद्याची दुकाने 24 तास सुरू आहेत. त्याची त्वरित दखल घेऊन कारवाई करावी, अशी तक्रार करण्यात आली. तर सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावातील जमिनीच्या वादासंदर्भातही तक्रार करण्यात आली. बैलहोंगल येथे ‘माझ्या आईला एका व्यक्तीने दीड लाख रुपयांना लुबाडले आहे, ते पैसे परत मिळवून द्यावेत’ अशी विनंती एका तक्रारदाराने केली.
बुडीगोप्पमध्ये गावगुंडांची दहशत
यरगट्टी तालुक्यात बुडीगोप्प गावामध्ये गावगुंडांची दहशत वाढली आहे. तसेच दुचाकीस्वार कर्णकर्कश हॉर्न वाजवून नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. तसेच रायबाग तालुक्यात मटका-जुगाराचे प्रमाण वाढले असून, सट्टेबाजांवर कारवाई करावी, अशी मागणी एका तक्रारदाराने केली. गोकाकमध्ये एका सोसायटीने 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे व त्याबद्दल तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत आहेत, अशीही तक्रार करण्यात आली.
मोकाट कुत्र्यांबाबत मनपाचे गांभीर्य नाही
जिल्ह्यातून या तक्रारी केल्या गेल्या. तर बेळगावमध्ये कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांबाबत महापालिका गांभीर्याने कारवाई करत नाही. त्यामुळे नागरिकांना प्रामुख्याने मुले, वृद्ध आणि महिलांना ये-जा करणे अशक्य झाले आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार बेळगाव शहरामधून करण्यात आली. बेळगाव शहरातील शहापूर, एपीएमसी, मार्केट, बेळगाव ग्रामीण, टिळकवाडी तसेच बागलकोट आणि हुबळी या पोलीस स्थानकांच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांनीसुद्धा आपल्या तक्रारी नोंदविल्या.
तक्रार निवारणाची सूचना
जिल्हा पोलीसप्रमुखांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना त्यामध्ये लक्ष घालून निवारण करण्याची सूचना केली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक वेणुगोपाल, डीवायएसपी वीरेश दोडमनी, सीपीआय बी. आर. ग•sकर, महादेव एस. एन., बाळप्पा तळवार, पोलीस कर्मचारी श्रीशैल बळीगार, विठ्ठल मादार आदी उपस्थित होते.









