कवयित्री, लेखिका मधुराणी प्रभुलकर-मुग्धा गोडबोले यांच्याकडून सादरीकरण
बेळगाव : ‘घर’ प्रत्येकांने आपल्या उराशी बाळगलेले एक स्वप्न. त्यांच्या पूर्ततेचा आनंद औरच. पण घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत, तर जिवंत माणसांची सळसळ तेथे सतत ध्वनित व्हायला हवी. घरापासून आपल्या कुणाचीच सुटका नाही. मग ते घर हसत खेळत, नांदत राहायला हवे. यासाठी प्रत्येकाचे प्रयत्नही हवेत. घर या एका संकल्पनेभोवती माणसाचे संपूर्ण विश्व निगडीत असते. हे विश्व गहिरे, रंगीबेरंगी, तितकेच अंतर्मुख करणारे. याच घराचे अनेक पैलू ‘घर माझे चंद्रमौळी’ या कार्यक्रमात कवयित्री, लेखिका मधुराणी प्रभुलकर व मुग्धा गोडबोले यांनी उलघडून दाखविले. कवयित्री इंदिरा संत यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त आयएमईआरच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ‘घर’ या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत. यालाच अनुसरून मधुराणी यांनी बहिणाबाईंची ‘खोपा’ ही कविता प्रारंभी सादर केली. आज माणसे वेगवेगळ्या संधीमुळे घर सोडतात. आणि मग सतत घर आठवत राहतात. घराची रुपे अनेक, प्रत्येक ऋतूमध्ये ते वेगळे भासते. पावसाळ्यात तर त्याचे वेगळेच दर्शन घडते. म्हणूनच इंदिरा संत म्हणतात,
‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली’
ही कविता मधुराणी यांनी सादर केली. घर कसं यावरून माणूस कसं हे लक्षात येते. चिरेबंदी वाडा म्हणजे गर्भश्रीमंताचा, हवेली म्हणजे भुताची, टुमदार घर म्हणजे व्यवस्थितपणा, चौसोपी वाडा म्हणजे तालेवाराचा, चाळीतील खोली म्हणजे चाकरमान्यांची आणि फ्लॅट्स म्हणजे सर्वसामान्यांचे असे मानले जाते. याचा आढावा मुग्धा यांनी घेतला. त्या पाठोपाठ मधुराणी यांनी विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे’ ही कविता सादर केली. मुग्धा गोडबोले यांनी इंदिरा संत लिखित घराबद्दलच्या ललितलेखाचे अत्यंत प्रभावीपणे अभिवाचन केले. त्यामुळे श्रोत्यांच्या मनात या घराची प्रतिमा उभी राहिली.
बाई आणि घर हे नाते गुंतागुंतीचे. घर बांधणे हा पुरुषार्थ समजला जातो. परंतु ते घर चालविते स्त्रीच. स्त्रीला दोन घरे सहजगत्या मिळतात. ती सासरी नांदते पण मन माहेरी गुंतलेले असते. अशा घराबद्दल कल्याणी पांडे यांनी लिहिलेली ‘तिन्ही सांजेच्या आडातून बुडे सूर्याचा पोहरा’ ही कविता मधुराणी यांनी सादर केली. पद्मा गोळे, शशी लंभारे, अरुणा ढेरे, बालकवी संदीप खरे, निलम माणगावे, हेमा लेले, योगिनी राऊळ, निरजा, सुनिती लिमये, डॉ. नीलिमा गुंडी, हर्षदा सुंठणकर, कविता महाजन यांनी लिहिलेल्या घराबद्दलच्या कविता या कार्यक्रमात सादर झाल्या. घर याच विषयावर मंगला गोडबोले लिखित लेखाचे अभिवाचन मुग्धा यांनी केले.
घर म्हणजे ऊब, आपलेपणा हे खरेच. परंतु अलीकडे…
‘आता घरात बरीच शांतता
दोन यंत्र आपापली कामे उरकताहेत’
असेच एक नकोसे चित्र दिसू लागत आहे. नीलिमा गुंडी म्हणतात, त्याप्रमाणे
‘घरात राहत नाही कोणीच
सारेच शोधू पाहतात
घराबाहेर आपले अस्तित्व’
हे वास्तवही प्रकर्षाने समोर येत आहे. काळानुरुप घराबद्दलच्या संकल्पना बदलल्या त्यामुळे आता घरानासुद्धा प्रवाही व्हावे लागेल. हाडामासाच्या माणसांनी ते घर नांदते राहायला हवे. कारण-
‘घराला ऐकायची आहे सळसळ जिवंत माणसांची’ हा आशावाद व्यक्त करत या कार्यक्रमाची सांगता झाली. साधी, सोपी परंतु रसाळ भाषा, घर या संकल्पनेचे अनेक पैलू उलगडून दाखविणाऱ्या अर्थपूर्ण कवितांची योग्य निवड, घराबद्दलचे वाचनीय असे ललितलेख आणि उत्कट सादरीकरण यामुळे या कार्यक्रमाने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली.









