पुणे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2025 पासून करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी रात्री आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले असले, तरी निर्णयाची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा पवित्रा काही आंदोलकांनी घेतल्याचे दिसत आहे.
बालगंधर्व चौकात हे आंदोलन सुरू असून, आंदोलनस्थळी सर्व पक्षीय नेत्यांनी आत्तापर्यंत भेट दिली आहे. मंगळवारी रात्री उशिरा शरद पवार यांनीही विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी भेट दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनातून माघार घेतली. मात्र, अजूनही काहीजण आंदोलनावर ठाम आहेत. तथापि, सकाळपासून आंदोलनात विद्यार्थ्यांची संख्या तुरळक दिसून आली. नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे उपोषण आणि आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतली. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. आमच्या मागणीची अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. आम्ही जेव्हा-जेव्हा आंदोलन केले तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिले गेले असल्याची कैफियतही या विद्यार्थ्यांनी मांडली.
अधिक वाचा : कोश्यारींनी मोघम आरोप करू नयेत
मुख्यमंत्री पुण्यात असूनही भेटत नसल्याची खंत
राज्याचे मुख्यमंत्री दोन-दोन, तीन-तीन दिवस पुण्यात राहतात. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांना भेटत नसल्याची खंत विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केली आहे.








