सपा’कडून आणखी 11 उमेदवारांची घोषणा : काँग्रेसने दावा केलेल्या जागांवरही उमेदवार जाहीर
वृत्तसंस्था/ लखनौ
पश्चिम बंगाल आणि बिहारनंतर आता उत्तर प्रदेशमध्येही ‘इंडिया’ आघाडी तुटताना दिसत आहे. 16 उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर समाजवादी पक्षाने सोमवारी दुसरी यादीही जाहीर केली. यात 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यात काँग्रेसने दावा केलेल्या जागांचा समावेश असल्याचे समजते. इतकेच नाही तर ज्या जागेसाठी राष्ट्रीय लोकदलासोबत वाद झाला होता त्या जागेवर समाजवादी पक्षानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. समाजवादी पक्षाने मुझफ्फरनगरमधून हरेंद्र मलिक यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पक्षाला आधीच हरेंद्र मलिक यांना उमेदवारी देण्याची इच्छा होती. मुझफ्फरनगर जागेबाबत सपा आरएलडीशी बोलू शकली नाही.
सपाच्या दुसऱ्या यादीतील बहुतांश मतदारसंघांची नावे काँग्रेसने दावा केलेल्या जागांवरील असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आमला, मिश्रिख, मोहनलालगंज आणि बहराईचच्या जागा हव्या होत्या. बांदा तुऊंगात बंद माफिया मुख्तारचा भाऊ अफजल अन्सारी याला सपाने गाझीपूरमधून उमेदवारी दिली आहे. सध्या ते बसपचे खासदार आहेत. याशिवाय समाजवादी पक्षाने प्रमुख कुर्मी नेते दिवंगत बेनीप्रसाद वर्मा यांच्या नातवाला उमेदवार बनवले आहे. श्रेया वर्मा गोंडामधून समाजवादी पक्षाच्या लोकसभा उमेदवार असतील. दिवंगत बेनीप्रसाद वर्मा यांचा कुर्मी समाजात मोठा प्रभाव आहे. बेनीप्रसाद वर्मा हे राज्य आणि केंद्रात मंत्री राहिले आहेत.
आतापर्यंत 27 उमेदवारांची घोषणा
आमला लोकसभेतून नीरज मौर्य, शाहजहांपूरमधून राजेश कश्यप, हरदोईमधून उषा वर्मा, मिश्रिखमधून रामपाल राजवंशी, मोहनलालगंजमधून आर. के. चौधरी, प्रतापगढमधून डॉ. एसपी सिंग पटेल, बहराईचमधून रमेश गौतम, गोंडामधून श्रेया वर्मा, गाझीपूरमधून अफझल अन्सारी आणि चंदौलीमधून वीरेंद्र सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे.
…तर काँग्रेस सर्व जागा लढणार
दुसरीकडे, काँग्रेसने जागावाटप आणि उमेदवार निश्चितीबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटपाबाबत अजूनही चर्चा सुरू असून अखिलेश यादव योग्य निर्णय घेतील, असा विश्वास उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी व्यक्त केला. तथापि, काँग्रेसने राज्यातील सर्व 80 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारीही केली असल्याचे अंशू अवस्थी यांनी असेही सांगितले. काँग्रेस प्रवक्त्यांच्या या विधानावरून दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत सर्व काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे.









