युरी आलेमावनी विधेयकाचे तुकडे करून भिरकावरले: एल्टॉनची युरीना साथ, फरेरांकडून विधेयकाचे समर्थन
विशेष प्रतिनिधी / पणजी
आमदारांना देण्यात येणाऱ्या वेतनाबरोबरच त्यांना अतिरिक्त दोन कर्मचारी देण्यासाठी अर्थिक तरतूद करणारे गोवा आमदार वेतन दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी गोंधळ घातला. या विधेयकास त्यांनी जोरदार आक्षेप घेत विधेयक फाडून टाकले आणि सभापतींच्या आसनापर्यंत जाऊन जोरदार आक्षेप नोंदविला. केपेचे आमदार एल्टॉन डिकॉस्ता यांनी त्यांना साथ दिली खरी, मात्र काँग्रेसचेच आमदार कार्लूस फरेरा त्यांना साथ न देता विधेयकाचे समर्थन केले. त्यामुळे तीन सदस्यीय काँग्रेस विधीमंडळामध्ये सभागृहातच फूट पडल्याचे उघड झाले. युरी व एल्टॉन यांनी सभात्याग केला. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षात उभी फूट पडल्याचे दिसून आले.
राज्य विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी गोवा आमदार वेतन व भत्ता दुरुस्ती विधेयक विधीमंडळ कामकाजमंत्री नीलेश काब्राल यांनी सादर केले. त्यास आमदार एल्टॉन डिकॉस्ता आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आक्षेप घेतला.
विधेयक मागे घ्यावे : एल्टॉन
गोव्यावर रु. 28 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा असताना आमदारांच्या वेतनात वाढ करणे म्हणजे वार्षिक रु. 19 कोटींचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे. हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी काँग्रेस आमदार एल्टॉन डिकॉस्ता यांनी केली.
नियमानुसार विधेयक का आणले नाही?
युरी आलेमाव यांनी एवढ्या घाईघाईने विधेयक आजच आणायचे व आजच संमत करायचे हा सभागृह कामकाज नियमांचा भंग ठरतो. गेल्या तीन दिवसांपूर्वी नियमानुसार हे विधेयक का आणले नाही? असा सवालही त्यांनी केला. हे विधेयक त्वरित मागे घ्या, अशी जोरदार मागणी केली.
आता नाटके कशाला करता?
यावेळी मंत्री नीलेश काब्राल यांनी आक्षेप घेतला. जेव्हा सभापतींनी बैठक बोलाविली होती, त्या बैठकीत आपणही संमती दिली होती. आता नाटके काशाला करता? असा सवाल काब्राल यांनी केला असता युरी आलेमाव भडकले. त्यातच आलेक्स सिक्वेरा यांनी युरी आलेमाव यांच्या वर्तनाबद्दल जोरदार आक्षेप घेतला.
‘आत एक व बाहेर एक’ करु नका
‘आत एक व बाहेर एक’ असे करू नका, असे सांगत सिक्वेरा यांनी केवळ प्रेक्षागृहाला दाखविण्यासाठी हा प्रकार करीत असल्याचा आरोप आलेमाव यांच्यावर केला. त्यामुळे युरी आलेमाव हे अधिकच संतापले व त्यांनी विधेयक फाडले व त्याचे तुकडे तुकडे करून भिरकावले.
युरी यांचे वर्तन अशोभनीय :मुख्यमंत्री
या संपूर्ण प्रकाराने मुख्यमंत्री संतप्त झाले. त्यांनी युरी आलेमाव यांचे हे अशोभनीय वर्तन असल्याचे सांगून त्यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आलेमावनी जोरजोरात बोलत सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली. सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसच्या एकूण तीन आमदारांपैकी युरी व एल्टॉन या दोन्हीच आमदारांनी आवाज उठविला. काँग्रेसचे तिसरे आमदार कार्लूस फरेरा यांनी आलेमाव यांना साथ दिली नाही. नंतर युरी व एल्टॉन या दोघांनी सभात्याग केला, तर कार्लूस फरेरा यांनी विधेयकाचे समर्थन केले व मतदानातही भाग घेतला.
आरजी, आपचा पाठिंबा
आरजी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर व आपच्या आमदारांनी विधेयकास पाठिंबा दिला. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस पक्षात फूट पडली. एकूणच अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधी पक्षांत फूट पडली.









