जागरुक तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केल्याने इतर वाहने टाकून पोबारा
बेळगाव : चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ दुचाकी पळविण्याचे प्रकारही वाढले आहेत. सोमवारी पहाटे शहापूर परिसरातून तीन दुचाकी पळविण्यात आल्या असून स्थानिक तरुणांनी पाठलाग केल्यामुळे चोरलेली एक दुचाकी तेथेच टाकून गुन्हेगारांनी पळ काढला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. महात्मा फुले रोड येथील विनायक जांगळे यांची केए 22 ईएफ 2093 क्रमांकाची स्प्लेंडर चोरण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे विनायक यांनी आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3.41 वाजण्याच्या सुमारास तिघा जणांनी त्यांच्या घरासमोरील स्प्लेंडर पळविली आहे.
याच त्रिकुटाने गोवावेस परिसरातील एक दुचाकी पळविली असून यासंबंधी अधिक माहिती मिळाली नाही. त्याआधी कोरे गल्ली, शहापूर परिसरात घरासमोर उभी करण्यात आलेली दुचाकी चोरण्यात आली होती. स्थानिक तरुणांनी पाठलाग केल्यामुळे ती तेथेच टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे. शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. दुचाकी पळविणाऱ्या चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. महात्मा फुले रोड परिसरात तर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे दोघा जणांनी तेथून पळ काढला. तर तिसरा चोरटा स्प्लेंडर घेऊन ढकलत नेण्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.









