अध्याय पंचविसावा
निर्गुणी योग्याची वस्ती कुठे कुठे असते ते सांगून झाल्यावर भगवंत उद्धवाला, सत्व, रज, तम या तीन गुणांपैकी ज्या गुणाचे प्राबल्य माणसात असते त्यानुसार तो कशी कर्मे करतो आणि जो या त्रिगुणांच्यापलीकडे गेलेला असतो त्याची कर्म करायची पद्धत कशी असते त्याबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, तीन गुणांच्या संबंधाने कर्तेही तीन प्रकारचे होतात. आणि निर्गुण लक्षणाचा कर्ता चौथा होय. काट्यानेच काटा काढून टाकला म्हणजे ज्याप्रमाणे आपले दु:ख कमी होते, त्याप्रमाणे ज्या वस्तूंची आवड असते ती आवडच नाहीशी करायची आवड मनात बाळगून सात्त्विक कर्ता अलिप्त होतो. सात्त्विक कर्ता सद्गुऊचरणांच्या संगतीने विरक्तीच्या माध्यमातून सर्व आवडीनिवडी नाहीशा करून टाकतो आणि विषयाच्या संगतीत असूनही त्यात नसल्याप्रमाणे असतो. राजस कर्ता हा फळाच्या आशेत गुंतून अत्यंत भयंकर अशी कोट्यावधि दु:खे स्वत: सोशीत असतो. तामस कर्त्या बद्दल विचारशील तर त्याची विचार करण्याची क्षमताच संपूर्ण लयास गेलेली असते, स्मृति रानामध्ये स्वैर भटकत असते, कार्य काय व कारण काय याची त्याला आठवणच होत नाही. आता निर्गुण म्हणजे त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला कर्ता कसा असतो ते सांगतो. तो अनन्य भावाने श्रीहरीला शरण जातो आणि कर्माचा चालक एक नारायण आहे असे तो समजत असल्याने त्याला करत असलेल्या कर्माचा कधीही अभिमान वाटत नाही. आता या तीन गुणांच्या प्राबल्यानुसार, त्या त्या कर्त्यांची श्र्रद्धाही तीन प्रकारची असते आणि निर्गुणाची श्र्रद्धा शुद्ध असते. ज्याची आत्मज्ञान सगळ्यात श्रेष्ठ अशी श्र्रद्धा असते तो सात्विक असतो, जो स्वत:ला कर्ता समजत असतो त्याची तो करत असलेल्या कर्मावर श्र्रद्धा असते. ही राजसाची श्र्रद्धा होय, तर तामसाची श्र्रद्धा अधर्माच्या ठिकाणी असते आणि माझी सेवा करण्यामध्ये ज्याची श्र्रद्धा असते ती निर्गुणाची श्र्रद्धा होय. माणसाचा अभिमान त्याच्या मी पणाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. मी होतो म्हणून काम झालं असं तो म्हणत असतो. माणसामध्ये हा मीपणा देह, इंद्रिये, चेतना आणि प्राण ह्या सगळ्यांच्यामुळे निर्माण होतो. त्याचा पूर्ण विचार करून सात्विक मनुष्य आपले मीपण कसे आहे ते पहात असतो. सात्विक मनुष्याची श्र्रद्धा मी म्हणजे हा देह नव्हे असे अध्यात्म सांगते त्यावर आधारित असते. त्यामुळे तो म्हणतो की, देह जड-मूढ असल्यामुळे तो देह तर मी नव्हे, इंद्रिये एकदेशीय असल्यामुळे तीही काही मी नव्हे, प्राण हा चपळ असल्यामुळे तोही मी नव्हे आणि मन हे चंचल असल्यामुळे ते तर खास मी नव्हे. चित्त हे चिंता करीत असल्यामुळे तेही मी नव्हे. बोध होण्याचा धर्म असणारी बुद्धीही मी नव्हे. अहं हे बाधक असल्यामुळे तेही मी नव्हे, तर मी म्हणून जो आहे तो अनादिसिद्धच आहे. अशा प्रकारे बुद्धीने जो चतुर असतो, तो मीपणामधील सार काय आहे त्याचा विचार करू शकतो. हीच श्रेष्ठ अध्यात्मश्र्रद्धा होय आणि सात्विक पुऊष तीच नेहमी बाळगत असतात. आणखी जे जे मी नव्हे असे तो म्हणत असतो, ते ते पाहू गेले तर मी पुऊषोत्तमच असतो. म्हणून माझे पाय धरले की, जिकडे तिकडे मीच भरून राहिलेला दिसू लागतो. हीच शुद्ध अध्यात्मश्र्रद्धा होय. ती नेहमी सात्त्विकापाशी असते. आता हे बुद्धिमंता! राजसाची श्र्रद्धा कशी असते तीही ऐक. तो स्वत:लाच श्रेष्ठ समजत असल्याने माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही अशी त्याची स्वयंकेंद्रित श्र्रद्धा असते. मीच काय तो श्रेष्ठ, कर्म करणारा काय तो एक मीच, हेच मनामध्ये तो घट्ट धरून बसलेला असतो आणि त्यानुसार तो करत असलेल्या कर्माचे अवडंबर माजवत असतो. उदाहरणच सांगायचे झाले तर, त्याने एखादे धार्मिक कार्य करायचे ठरवले तर ते करण्यासाठी साहित्य तो मोठ्या अगत्याने जमा करतो, शुचिर्भूतपणा तर इतका वाढवतो की, त्याच्याभोवतीच सोवळे ओवळे फेर धरून गिरक्मया घेत आहे असे वाटावे हा सर्व देखावा असतो. तो इतरांच्याकडे सदैव दोषदृष्टीनेच बघत असल्याने त्याच्या मनात इतरांच्या गुणदोषांच्या राशी पडून असतात.
क्रमश:








