शिकागोत ब्रह्मेशानंदाचार्यांनी जागतिक धर्म संसदेला केले संबोधित : अध्यक्षपदाचा मान गोव्याला, भारताला मिळाल्याने अभिमान व्यक्त
पणजी : अध्यात्म हाच विश्वशांतीचा अंतिम मार्ग आहे. आध्यात्मिक पद्धती समाजाला आंतरिक शांती प्राप्त करण्यास मदत करते आणि आंतरिक शांती ही व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रवासाचे उपउत्पादन असू शकते. अध्यात्म आणि आंतरिक शांती या दोन्हीमध्ये आत्म-जागरूकता आणि आत्मनिरीक्षण यांचा समावेश होतो. परिणामी जागतिक शांतता आणण्यासाठी अध्यात्म हाच एकमेव उपाय आहे, असे उद्बोधन पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीनी शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत अध्यक्ष म्हणून संबोधित करताना केले. शिकागो अमेरिका येथे जागतिक धर्म संसद 14 ते 17 ऑगस्ट पर्यंत पार पडली. ज्यामध्ये दोनशेहून अधिक परंपरा, सुमारे 80 राष्ट्रे आणि हजारो उपस्थितांनी एकत्र येऊन आजच्या जगात अध्यात्म व धर्माचे महत्त्व पटवून दिले. ‘स्वतंत्रता व मानवाधिकार रक्षा’ ही अधिवेशनाची ‘थीम’ होती. ब्रह्मेशानंदाचार्यांनी या जागतिक धर्म संसदेला अध्यक्ष म्हणून संबोधित करणे, हा भारत आणि गोव्यासाठी अभिमानाचा क्षण होता.
हवामान बदलाचे परिणाम
विद्यमान काळात अवघ्या जगात महत्वाच्या ठरलेल्या ‘हवामान बदलाचे परिणाम’ याविषयीही स्वामीजींनी संबोधित केले. ज्या गोष्टींवर आपण अवलंबून आहोत आणि मूल्यवान आहेत अशा पाणी, ऊर्जा, वाहतूक, वन्यजीव, शेती, परिसंस्था आणि मानवी आरोग्य बदलत्या हवामानाचे परिणाम अनुभवत आहेत. जागतिक स्तरावर पाच घटकांचे महत्त्व आणि त्यांचे संतुलन राखणे, महत्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
आदिवासी समुदाय अधोरेखित
आदिवासी समुदायांच्या स्वातंत्र्याशी संबंधित महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. स्थानिक लोक अद्वितीय भाषा, ज्ञान प्रणाली आणि विश्वासांचे धारक आहेत आणि त्यांच्याकडे नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी विशेष पद्धतींचे अमूल्य ज्ञान आहे, असेही ते म्हणाले. हिंदू अध्यात्मिक नेता म्हणून स्वामीजींनी ऑल ट्रॅथ सेमिनरीमध्ये हजेरी लावली आणि सनातन हिंदू धर्मातील मूल्यांवर आधारित शिक्षण पद्धती आणि सर्व प्राणिमात्रांबद्दल आदर व्यक्त केला.
ब्रह्मेशानंदाचार्यांचा सन्मान
अध्यात्म, शांतता आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी भारतातील अन्य धार्मिक नेत्यांनी देखिल या धर्म संसदेत सनातन धर्माचे प्रतिनिधित्व केले. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांना शांततेचे राजदूत आणि अध्यात्मिक नेते या नात्याने शांतता आणि सौहार्दाच्या प्रसारासाठी जागतिक धर्म संसदेत शांतता आणि प्रेम महासंघाचे अध्यक्ष डॉ. हाँग ताओ त्झे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 1893 मध्ये शिकागो येथे आयोजित केलेल्या पहिल्या धर्मसंसदेत स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी भाषणाने जगप्रसिद्ध झाल्यानंतर ही धर्म संसद म्हणजे जगातील सर्वात मोठी आंतरधर्मीय चळवळ म्हणून उदयास आली आहे. गुऊमाता अॅड. ब्रह्मीदेवीजी, अध्यक्ष सद्गुऊ फाउंडेशन आणि डॉ. स्वप्नील नागवेकर, अध्यक्ष आंतरराष्ट्रीय सद्गुऊ फाउंडेशन – युएई कौन्सिल हे देखील समांतर सत्रासाठी पॅनेलचे सदस्य होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर श्री दत्त पद्मनाभ पीठाचे प्रतिनिधित्व केले होते.









