नामस्मरण केल्याने वाईट प्रवृत्तीचे विचार कमी होतात : कीर्तनकार शिवलीलाताईंचे प्रतिपादन
वार्ताहर /किणये
सध्याची तरुणाई व्यसनाच्या आहारी अधिक गेली आहे. व्यसनामुळे पैसा खर्च होतो. तसेच संसारातही विविध प्रकारचे कलह निर्माण होतात. त्यामुळे सुखी आणि समाधान जीवन जगण्यासाठी व्यसनाच्या आहारी जाऊ नका, तसेच व्यसनमुक्त समाज बनविण्यासाठी आध्यात्माची अधिक गरज आहे. भगवंतांचे नामस्मरण केल्याने वाईट प्रवृत्तीचे विचार कमी होतात, असे बार्शी सोलापूर येथील महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी बुधवारी उद्यमबाग येथे कीर्तन करताना सांगितले. जीआयटी कॉलेज रोड, राजाराम नगर, उद्यमबाग येथील गुरुदत्त दिगंबर सेवा संघ यांच्यावतीने दत्तजयंती सोहळ्यानिमित्त बुधवारी शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजिला होता. यावेळी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.
मुली व तरुणांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे भजन करा, विठ्ठल सगळ्यांना तारणारा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वचन करा, यामध्ये आपल्या जीवनाचे सार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी संघातर्फे शिवलीला पाटील यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पंच कमिटीचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कमिटीचे अध्यक्ष नागराज पुजार, विशाल पाटील, अमित दोडमनी, देमाण्णा कमरेकर, यल्लाप्पा झेंडे, अशोक नार्वेकर आदी उपस्थित होते. उद्यमबाग परिसरात झालेल्या या कीर्तन सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शिवलीला पाटील यांना नागेश शहापूरकर, अविनाश राजगोळकर, गणेश साळुंखे, बसूमहाराज आदींची साथ लाभली. मंगळवारपासून दत्तजयंती सोहळा सुरू होता. सकाळी अभिषेक करण्यात आला. सायंकाळी गुरुदत्त जन्मोत्सव सोहळा केला. गुरुवारी सकाळी महाआरती झाली. दुपारी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.









