सरसंघचालक डॉ. भागवतांसह मान्यवरांची व्याख्याने : 1 ते 3 ऑगस्टदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन
बेळगाव : अकॅडमी ऑफ कम्पॅरिटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन, गुरुदेव रानडे मंदिराच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त 1 ते 3 ऑगस्टदरम्यान विविध मार्गदर्शनपर व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव अॅड. एम. बी. जिरली यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गुरुवार दि. 1 रोजी सकाळी 10 वाजता हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात दासबोध, आरती व दासबोध वाचन केले जाणार आहे. 10.30 वा. ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे. सकाळी 11 वा. सकाळचे भजन व आरती होणार आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत व पद्मभूषण कमलेश पटेल उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 6.45 वा. विनायक लोकूर व त्यांच्या संघाकडून अग्निहोत्र केले जाणार आहे.
सायंकाळी 4 ते 6 या वेळेत गोगटे कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात ‘फूटप्रिंट्स ऑन द सायन्स ऑफ टाईम’ या पुस्तकाचे प्रकाशन हैद्राबाद येथील रामकृष्ण मिशनचे पद्मभूषण कमलेश पटेल (दाजी) यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दि. 2 रोजी हिंदवाडी येथील मंदिरमध्ये 6 वा. काकडारती, 8 वा. दासबोध व भजन होणार आहे. दुपारी 3 वा. ज्ञानेश्वरी महिला मंडळाचे भजन, 4 वा. सत्कार समारंभ, 5 वा. आर्ट ऑफ लिव्हिंगचे भजन, 7 वा. बारा अभंग कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9.30 वा. के. के. वेणुगोपाल सभागृहात ‘लेसन ऑफ लाईफ एक्सपिरियन्स’ या विषयावर हुबळी येथील व्हीआरएल ग्रुपचे चेअरमन पद्मश्री डॉ. विजय संकेश्वर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 11.15 वा. विजापूर येथील शांती कुटीरचे कृष्णा संपगावकर ‘स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे विचार’ या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी 12.15 वा. तिसऱ्या सत्रात बेंगळूर येथील चाणक्य विद्यापीठाचे मूल्यमापन रजिस्ट्रार डॉ. संदीप नायर ‘अभ्यासक्रमाव्यतिरिक्त माहिती’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला बागलकोट विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आनंद देशपांडे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. 3 रोजी सकाळी 9.30 वा. के. के. वेणुगोपाल सभागृहात राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज हे शिक्षक व प्राध्यापकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उद्योजक राम भंडारे व खासदार जगदीश शेट्टर उपस्थित राहतील. सकाळी 11.15 वा. आरएसएसचे क्षेत्रिय कार्यकारिणी सदस्य व्ही. नागराज हे ‘शिक्षक ते गुरु यामधील प्रवास’ या विषयावर मार्गदर्शन करतील. यावेळी केएलईचे कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात म्हैसूर येथील प्रा. बी. व्ही. वसंतकुमार शिक्षकांना मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाला भरतेश शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी विनोद दोड्डण्णावर व अभाविपचे डॉ. आनंद होसूर उपस्थित राहणार आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना झेड प्लस सुरक्षा असल्यामुळे निमंत्रितांसाठीच कार्यक्रम असणार आहे. नागरिकांनी उर्वरित कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आर. जे. जकाती, अमित कुलकर्णी, अॅड. अशोक पोतदार, सुब्रम्हण्यम भट यासह इतर उपस्थित होते.









