हजारोंच्या संख्येने उपस्थिती : तरुणाईचा तुफान प्रतिसाद : रौप्यमहोत्सवी वर्ष
बेळगाव : नवरात्रीच्या काळात गल्लोगल्ली चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करणाऱ्या दुर्गामाता दौडला रविवारपासून प्रारंभ झाला. यावर्षी दुर्गामाता दौडचे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने जल्लोषपूर्ण वातावरणात दौडला सुरुवात झाली. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने हजारोंच्या संख्येने शिवभक्त दौडमध्ये सहभागी होऊन भवानी माता, दुर्गादेवीचा जागर करीत होते. पहाटेच्या धुक्यामध्ये भल्यामोठ्या रांगोळ्यामधून काढण्यात आलेली दौड अस्मरणीय ठरली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षातील दौडला रविवारी छत्रपती शिवाजी उद्यान येथून प्रारंभ झाला. पहाटे पाच वाजल्यापासून शिवभक्त तयारीला लागले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रेरणा मंत्र म्हणून आरती म्हणण्यात आली. शेकडो शिवभक्तांनी फेटा बांधण्यासाठी उद्यान परिसरात गर्दी केली होती. प्रतिवर्षाप्रमाणे छत्रे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून ध्वज चढविण्यात आला. कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी शिवभक्तांना दौडच्या शिस्तीबाबत मार्गदर्शन केले. दौडच्या मार्गावर फुलांचा वर्षाव केला जात होता. रात्रभर जागून शिवभक्तांनी देखावे, फुलांची आरास, रांगोळ्या, भगव्या पताका लावून परिसराला एक मंगलमय रुप दिले होते. शास्त्रीनगर, महाद्वार रोड, समर्थनगर, मार्गे कपिलेश्वर मंदिरामध्ये दौडची सांगता झाली. आरती व ध्येयमंत्र झाल्यानंतर जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
बालचमूंनी सादर केल्या युद्धकला
दौडच्या मार्गावर ठिकठिकाणी देखावे सादर करण्यात आले होते. एक महिला लहान मुलांसह घोड्यावरून दौडमध्ये सहभागी झाली होती. याबरोबरच बालचमू शिवरायांच्या वेषात सहभागी झाले होते. लहान मुलांनी एसपीएम रोडवर शिवकालिन युद्धकलांचे प्रात्यक्षिक सादर केले. लहान मुलांनी सादर केलेल्या लाठीमेळा व इतर युद्धकलांचे शिवभक्तांनी कौतुक केले.
मंगळवार दि. 17 रोजीचा दौडचा मार्ग
शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथून दुर्गामाता दौडला सुरुवात होणार आहे. एम. जी. रोड, महर्षी रोड, नेहरु रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, देशमुख रोड, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, गोवावेस स्विमिंग पूल, सोमवार पेठ, देशमुख रोड, आरपीडी क्रॉस, खानापूर रोड, अनगोळ क्रॉस, अनगोळ रोड, हरिमंदिर, चिदंबरनगर, हादुगिरी, विद्यानगर, एस. व्ही. रोड, कुरबर गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, भांदूर गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, नाथ पै नगर, बाबले गल्ली, रघुनाथ पेठ, कलमेश्वर गल्ली, महालक्ष्मी मंदिर अनगोळ येथे सांगता होणार आहे.









