सावंतवाडी / प्रतिनिधी
Spinning boys from Pen (Raigad) on a visit to Sindhudurg
रायगड जिल्ह्यातील तरणखोप, पेण येथील कातकरी मुलांसाठी चालवल्या जाणार्या अंकुर आश्रम या हॉस्टेलमधील आठ विद्यार्थी सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर आले आहेत.ते सध्या सिंधुदुर्ग आणि गोव्यातील निवडक कातकरी वस्त्यांना भेट देत आहेत.येथील कातकरी समाजाची परिस्थिती समजून घेणे, इथला परिसर अभ्यासणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश आहे.येथील कातकरी वस्त्यांची परिस्थिती रायगड मधील वस्त्यांपेक्षा थोडी भिन्न असल्याचे त्यांना आढळले. येथील कातकर्यांच्या झोपड्यांखालील जमिनी अजूनही त्यांच्या नावावर झालेल्या नाहीत असेही त्यांना आढळले. येथील शाळेत जाणारी मुले ही शाळा शिकणारी पहिली पिढी आहे. येथील वस्त्यांवर तंबाखूचे व्यसन जास्त प्रमाणात आढळल्याचे मुलांनी सांगितले. इथले लोक कातोडी भाषा बोलत असले तरी या भाषेतील थोडे शब्द वेगळे असल्याचे त्यांनी नमूद केले. या वस्त्यांवर आजी आजोबा म्हणजे वृद्ध माणसे क्वचितच आढळून आल्याचे निरीक्षण मुलानी नमुद केले. कोकणचा निसर्ग अतिशय सुंदर असून येथील लोकांचे आदरातिथ्य आवडल्याचे त्यांनी सांगितले.
या दौर्यासाठी त्यांच्यासोबत अंकुर आश्रमच्या समन्वयक गार्गी पाटील होत्या.हा दौरा उत्तम व्हावा यासाठी प्रा.अभिजीत महाले (बांदा काॅलेज), किरातच्या संपादिका सीमा मराठे, मयुरीताई (वेंगुर्ले), लंकेश गवस (कोनशी), संग्राम पवार, नितीन पवार (वेंगुर्ला), हनुमान पवार (पेडणे), राजू देसाई (कोलझर), प्रांजली देसाई (सावंतवाडी), शैला बोरोडे (प्राथमिक शिक्षिका, इंसुली) वगैरे मंडळींनी योगदान दिले.









