दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 241 धावांनी दणदणीत विजय : तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी : ओली पोप सामनावीर
वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतील रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विंडीजवर 241 धावांनी दणदणीत विजय मिळवला. जो रुट आणि हॅरी ब्रुक यांची दमदार शतके तसेच डकेट आणि पोप यांच्या अर्धशतकांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या डावात 425 धावा झळकाविल्या व विंडीजसमोर विजयासाठी 385 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव 143 धावांवर आटोपला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता, उभय संघातील तिसरी व शेवटची कसोटी दि. 26 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात येईल.
इंग्लंडने या कसोटीत पहिल्या डावात 416 धावा जमविल्यानंतर विंडीजने त्यांना चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 457 धावा करत 41 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर इंग्लंडने 3 बाद 248 या धावसंख्येवरुन रविवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव चहापानावेळी 425 धावांवर आटोपला.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावामध्ये रुटने 178 चेंडूत 10 चौकारांसह 122 तर ब्रुकने 132 चेंडूत 13 चौकारांसह 109 धावा जमविल्या. सलामीच्या डकेटने 92 चेंडूत 11 चौकारांसह 76 तर पॉपने 67 चेंडूत 6 चौकारांसह 51 धावा केल्या. अॅटकिनसनने 3 चौकारांसह नाबाद 21 धावा जमविल्या. डकेट आणि पॉप यांनी दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची भागिदारी केली. त्यानंतर ब्रुक आणि रुट यांनी चौथ्या गड्यासाठी 189 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडला 425 धावांपर्यंत मजल मारता आली. विंडीजतर्फे सिलेसने 97 धावांत 4 बळी मिळविले. तर अलझारी जोसेफने 103 धावांत 2 तसेच शमार जोसेफ, होल्डर आणि सिंक्लेयर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
बशीरच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचे सपशेल लोटांगण
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 385 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचे फलंदाज दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरले. कर्णधार क्रेग ब्रेथवेट व जेसन होल्डर वगळता इतर फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजासमोर हार पत्करली. ब्रेथवेटने सर्वाधिक 8 चौकारासह 47 धावा केल्या तर होल्डरने 37 धावा फटकावल्या. जोशुआ डी सिल्वाने 14 तर लुईसने 17 धावा केल्या. विंडीजचे फलंदाज शोएब बशीर, ख्रिस वोक्स व अॅटकिन्सनच्या माऱ्यासमोर ठराविक अंतराने बाद होत गेले. विंडीजचा दुसरा डाव 36.1 षटकांत 143 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून बशीरने सर्वाधिक 5 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या ओली पोपला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प.डाव 416 व दुसरा डाव 425
वेस्ट इंडिज प.डाव 457 व दुसरा डाव 36.1 षटकांत सर्वबाद 143 (क्रेग ब्रेथवेट 47, मार्क लुईस 17, जेसॉन होल्डर 37, जोशुआ डी सिल्वा 14, शोएब बशीर 41 धावांत 5 बळी, ख्रिस वोक्स व अॅटकिन्सन प्रत्येकी दोन बळी).
कसोटी इतिहासात प्रथमच इंग्लंडचा खास विक्रम
कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात प्रथमच, इंग्लंड क्रिकेट संघाने दोन्ही डावात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. इंग्लंड संघ 1877 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे, परंतु आतापर्यंत एकाही कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात त्यांना 400 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. विंडीजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत मात्र त्यांनी हा खास विक्रम केला आहे. कसोटी खेळणाऱ्या संघाने दोन्ही डावात 400 हून अधिक धावा करण्याची ही 12 वी वेळ आहे. त्याचप्रमाणे कसोटीच्या पहिल्या तीन डावांत चारशेहून अधिक धावा करण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.









