वृत्तसंस्था / मुंबई
मुंबई रणजी संघातील जागतिक दर्जाचे डावखुरे फिरकी गोलंदाज पद्माकर शिवलकर यांचे मुंबईत सोमवारी उशीरा वयाच्या 84 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. मुंबईच्या रणजी संघाला 1966-66 ते 1976-77 या कालावधीत दहावेळा रणजी चषक मिळवून देण्यामध्ये शिवलकरांचा वाटा महत्त्वाचा ठरला होता. मात्र त्यांना राष्ट्रीय संघामध्ये शेवटपर्यंत स्थान मिळू शकले नाही.
1962 एप्रिल महिन्यात शिवलकर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सीसीआय अध्यक्ष इलेव्हन आणि आंतरराष्ट्रीय इलेव्हन यांच्यात हा पहिला सामना खेळविला गेला होता आणि त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे तसेच इंग्लंडचे अव्वल क्रिकेटपटू बॉब सिम्पसन, ग्रेव्हेनी, कॉलिन कौड्री, विक्स, रिची बेनॉ, सोनी रामादिन यांचा समावेश होता. या सामन्यात शिवलकर यांनी 7 गडी बाद केले.
शिवलकर यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 19.69 धावांच्या सरासरीने 124 प्रथमश्रेणी सामन्यात 589 गडी बाद केले. तसेच त्यांनी रणजी क्रिकेट स्पर्धेत 361 बळी नोंदविले. मुंबई संघातर्फे रणजी स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारे म्हणून शिवलकर यांची ओळख निर्माण झाली. 1972-73 च्या रणजी स्पर्धेतील तामिळनाडू विरुद्धच्या अंतिम सामन्यात मद्रासच्या चेपॉक स्टेडियमवर शिवलकर यांनी 16 धावांत 8 गडी बाद केले होते. तब्बल दोन दशकांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये शिवलकर यांनी आपल्या जादुमय फिरकीची ओळख सर्वांना करुन दिली. 2017 साली पद्माकर शिवलकर यांचा कर्नल सी. के. नायडू अजिवन पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता. भारतीय क्रिकेट मंडळाने तसेच मुंबई क्रिकेट संघटनेने पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.









