बॅटमॅनसारखी खुण असल्याने मिळतेय प्रसिद्धी
तुम्ही आतापर्यंत अनेक माकडं पाहिली असतील, परंतु सोशल मीडियावर सध्या स्पाइडर माकडाचे गोंडस पिल्लू चर्चेचा विषय ठरले आहे. त्याच्या नाकावर निसर्गतः असलेली बॅटमॅनची लोकप्रिय खुण त्याच्या प्रसिद्धीचे कारण ठरले आहे. हे माकड फ्लोरिडामधील ब्रेवार्ड प्राणिसंग्रहालयात जन्माला आले आहे. प्राणिसंग्रहालयाने या पिल्लाची एक क्लिप देखील शेअर केली आहे.

आमची 31 वर्षीय स्पाइडर मंकी शेलीने 15 एप्रिल रोजी सकाळी एका तंदुरुस्त पिल्लाला जन्म दिल्याचे सांगताना आनंद होतोय. आई आणि तिचे पिल्लू दोघेही ठीक आहेत. हे पिल्लू 25 वर्षीय माकड शूटर आणि माकडीण शेली या जोडप्याचे असल्याचे प्राणिसंग्रहालयाने ट्विट करत म्हटले आहे.
स्पाइडर मंकी ही दुर्लभ प्रजाती आहे. परंतु त्याच्या गोंडस पिल्लाच्या नाकावर असलेल्या ‘बॅटमॅन’च्या खुणेमुळे सोशल मीडियावर ते लोकप्रिय ठरले आहे. बॅटमॅन आयकॉनसारखी ही खुण या पिल्लाला जन्मासोबतच मिळाली आहे. हे पिल्लू स्वतःच्या आईला पकडून असून यशस्वीपणे सर्व हालचाली करत असल्याचे प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.
स्पाइडर मंकीची आई स्वतःच्या पिल्लांची देखभाल करण्यास अत्यंत कुशल असते. शेलीला मातृत्वाचा पूर्वी देखील अनुभव आहे. शेलीने यापूर्वी 3 पिल्लांना जन्म दिला होता. वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडनुसार पूर्ण दक्षिण अमेरिकेत आढळून येणारे ब्लॅक हँडेड स्पाइडर मंकी आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. उष्णकटिबंधीय वर्षावनांची होणारी कत्तल तसेच शिकारीमुळे त्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.









