विमानसेवा विस्तारण्यावर भर : खर्चाची समस्या सोडवणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी स्पाइसजेट आता पुन्हा नव्याने झेप घेण्यास सज्ज झाली आहे. सदरच्या कंपनीला अलीकडेच 900 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती आहे. खर्चासंबंधीत समस्या सोडवण्यासोबत विमानांच्या जुळवणीसाठी सदरची रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती आहे.
यापैकी 160 कोटी रुपये हे सरकारच्या इमरजन्सी क्रेडिटलाइन गॅरंटी स्कीमअंतर्गत मिळाले आहेत. चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही रक्कमेत भर घातली आहे. आतापर्यंत त्यांनी 500 कोटी पैकी 200 कोटी रुपयांची भर घातली आहे. तीन महिन्याच्या कालावधीत कंपनीने 1100 कोटी रुपयांचा निधी उभारल्याचे सांगितले जात आहे. सेक्युरिटीजच्या माध्यमातून 2250 कोटी रुपये उभारण्याची घोषणा कंपनीने गेल्या 12 डिसेंबरला केली होती.
रक्कमेचा वापर
आता उभारलेली रक्कम ही विमानांच्या संख्येत वाढ करण्यासाठी, खर्च बचत कार्याकरीता व विमानसेवेच्या कार्यप्रणालीसाठी वापरली जाणार आहे. कंपनीकडे सध्या 40 विमानांचा ताफा आहे. 2023 मध्ये कंपनीने 83 लाख प्रवाशांना विमानप्रवास घडवला आहे.









