वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूतील मदुराई येथून दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या प्रवासी विमानाचे चेन्नई येथे तातडीने लँडिंग करावे लागले आहे. या विमानात कर्मचाऱ्यांसह 167 प्रवासी होते. ते सर्व सुखरुप असल्याची माहिती देण्यात आली आहे. विमान हवेत असताना त्यात तांत्रिक समस्या उद्भवल्याने त्याचे तत्काळ लँडिंग करावे लागले, अशी माहिती स्पाईसजेट कंपनीकडून देण्यात आली.
गेल्या काही महिन्यांमध्ये या कंपनीच्या संदभातील ही तिसरी घटना आहे. एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या विमानाचे एक चाक विमान हवेत असतानाच निखळून खाली पडले होते. हे विमान कांडला येथून मुंबईकडे निघाले होते. त्याचे मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. त्याआधी या विमानतळावर आणिबाणीची स्थिती घोषित करण्यात आली होती. त्याआधी सप्टेंबर महिन्यात याच कंपनीच्या पुण्याहून दिल्लीला निघालेल्या विमानाला प्रवासात तांत्रिक समस्या उद्भवल्याने पुन्हा पुण्याला परतावे लागले होते. ही कंपनी सध्या आर्थिक समस्यांशी संघर्ष करीत असून या कंपनीची निम्म्याहून अधिक विमाने भूमीवरच आहेत. इतर विमान कंपन्यांकडून तीव्र स्पर्धा होत असल्याचे कंपनीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या कंपनीच्या भारतांतर्गत प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून कंपनीचा बाजारातील प्रवासी वाटा केवळ 1.9 टक्के इतका आहे. कंपनीच्या 54 विमानांपैकी केवळ 21 सध्या कार्यरत असून कंपनीकडच्या रोख रकमेतही घट झाली असून तिच्या हाती केवळ 333 कोटी रुपये आहेत. या रकमेपैकी बहुतांशी रक्कम वस्तू-सेवा कर, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि इतर कायदेशीर बाबींमध्ये अडकलेली आहे, अशीही चर्चा होत आहे.









