काही महिन्यांपासून होते आजारी : केंद्राने वाढविला होता कार्यकाळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रूपचे (एसपीजी) संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे बुधवारी गुरुग्राम येथील एका रुग्णालयात निधन झाले आहे. निधनासमयी ते 61 वर्षांच होते तसेच मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते.
सिन्हा हे 2016 पासून एसपीजी संचालक म्हणून कार्यरत होते. 31 मे रोजी ते सेवानिवृत्त होणार होते, परंतु त्याच्या एक दिवस आधीच केंद्र सरकारने त्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविला होता. सिन्हा हे 1987 च्या तुकडीचे केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. केरळमध्ये त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणूनही काम केले होते.
सिन्हा हे मूळचे झारखंडच्या हजारीबाग येथील होते. सिन्हा यांनी स्वत:च्या कारकीर्दीत प्रामुख्याने केरळमध्ये सेवा बजावली होती. महिलांची सुरक्षा अन् अनिवासी भारतीयांशी निगडित विभागाचे देखील ते प्रमुख राहिले आहेत.
एसपीजी संचालक सिन्हा यांच्या निधनावर इंडियन पोलीस सर्व्हिसेस असोसिएशनने दु:ख व्यक्त केले आहे. एसपीजी संचालक सिन्हा हे स्वत:च्या कर्तव्यासाठी समर्पित होते आणि त्यांच्या नेतृत्वात आम्हाला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
1985 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. हा ग्रूप पंतप्रधानांचे निवासस्थान, कार्यालय, देश आणि विदेशात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची सुरक्षा हाताळतो. 2019 पूर्वी एसपीजी माजी पंतप्रधान तसेच त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा देखील सांभाळत होता. 2019 मध्ये लागू करण्यात आल्याच्या कायद्यानुसार गुप्तचर अहवालाच्या आधारावर पंतप्रधान पद सोडल्याच्या 5 वर्षापर्यंतच एसपीजी सुरक्षा मिळणार आहे.









