मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कंपन्यांना इशारा : हिरोने सीएसआर अंतर्गत दिल्या शंभर दुचाकी
प्रतिनिधी / पणजी
स्वतःची सामाजिक जबाबदारी (सीएसआर) टाळणाऱया कंपन्यांवर सरकारची नजर असून सीएसआर प्राधिकरण याबाबत पडताळणी करीत आहे. प्राधिकरणाने दखल घेऊन कारवाई करण्यापूर्वी किमान दोन टक्के रक्कम सीएसआरसाठी खर्च करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.
हिरो मोटो कॉर्प कंपनीने गोवा पोलिसांना 100 दुचाकी प्रदान केल्या असून त्यानिमित्त आल्तिनो येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस महासंचालक जसपाल सिंग तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
हिरोने पार पाडली सीएसआर जबाबदारी
हिरो कंपनीने पोलीस खात्याला ज्या 100 दुचाकी दिल्या आहेत, त्या सरकारने त्यांच्याकडे मागितल्या नव्हत्या, तर त्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणजे सीएसआरचे पालन करीत स्वतःहून सरकारला दिल्या आहेत. या कंपनीचा आदर्श घेऊन इतर कंपन्यांनीही अनुकरण करावे. कंपन्यांनी आपल्या नफ्यातील 2 टक्के रक्कम सीएसआरसाठी देणे बंधनकारक आहे. नफ्याचा एक टक्का हिस्सा दिलातरीही अनेक विकासाची कामे होऊ शकतात, असेही ते म्हणाले.
गुन्हेगारीत 90 टक्के बिगरगोमंतकीय
राज्यात जे काही गुन्हे घडतात त्यातील सुमारे 90 टक्के गुह्यांमध्ये परप्रांतीय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही लोक पैशांसाठी अनोळखी लोकांना भाडय़ाने खोली देतात आणि फसतात. तरीही गुन्हेगारी तपासकामात पोलिसांची कामगिरी चांगली आहे. मात्र गुन्हे होणारच नाही यासाठी लोकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. अनेक बलात्काराच्या प्रकरणात भाडय़ाने राहिलेली माणसेच गुन्हेगार असल्याचेही आढळून आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करुन संशय़िताला शिक्षा देण्यापेक्षा गुन्हा होणारच नाही यासाठी पोलिसांनी खबरदारी बाळगायला पाहिजे. त्याचबरोबर लोकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करणे महत्वाचे आहे.
गोव्यात 20 हजारपेक्षा जास्त बेरोजगार नाहीत
राज्यात केवळ 20 हजार लोक बेरोजगार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नीती आयोगाच्या अहवालात 1 लाख 10 हजार लोक बेरोजगार असल्याचे म्हटले असले तरी आयोगाने हा अहवाल गोवा रोजगार विनिमय केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तयार केला आहे. सुमारे 80 हजार लोक असे आहेत की ते खासगी क्षेत्रात काम करतात, मात्र त्यांनी आपले नाव रोजगार विनिमय केंद्रातून कमी केलेले नाही. त्यामुळे गोव्यात बेरोजगार प्रत्यक्षात 20 हजारापेक्षा जास्त नाही, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.









