वृत्तसंस्था/ नवी मुंबई
फिफाच्या यू-17 महिला विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेत रविवारी विद्यमान विजेत्या स्पेनने कोलंबियाचा निसटता पराभव करत अजिंक्मयपद पटकाविले. स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने या स्पर्धेचे जेतेपद स्वतःकडे राखले.
या स्पर्धेतील हा अंतिम सामना नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आला. या स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱया कोलंबिया संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कोलंबिया संघातील बचावफळीत खेळणाऱया ऍना मारिया झपाटाने 82 व्या मिनिटाला आपल्या संघाच्या गोलपोस्टमध्ये नजरचुकीने स्वयंगोल केल्याने स्पेनला गोल कोलंबियाने बहाल केला. हा एकमेव गोल वगळता दोन्ही संघांकडून या सामन्यात गोल झाला नाही.
या अंतिम सामन्यात स्पेनच्या ख्रिस्टीनाने कोलंबियाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत पूर्वार्धात गोल केला. पण रिव्हय़ूमध्ये हा गोल नियमबाहय़ ठरविल्याने मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 0-0 असे बरोबरीत होते. स्पेनच्या ख्रिस्टीनाने चेंडू गोलपोस्टमध्ये लाथाडताना तिच्या हाताचा स्पर्श चेंडूला झाल्याचे आढळून आल्याने हा गोल नियमबाहय़ ठरविण्यात आला. या स्पर्धेत स्पेन आणि कोलंबिया यांच्यात प्राथमिक फेरीत गाठ पडली होती आणि त्यावेळीही स्पेनने कोलंबियाचा 1-0 असा पराभव केला होता. 2018 साली स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने ही स्पर्धा जिंकली होती.
या स्पर्धेतील तिसऱया स्थानासाठी झालेल्या सामन्यात नायजेरियाने जर्मनीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा गोलफरकाने पराभव करत विजय नोंदविला. या विजयामुळे नायजेरियाने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी बरोबरी साधल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीच्या प्लॅटेनर आणि पॉलिना बारेझ यांचे फटके नायजेरियाच्या गोलरक्षकाने अडविल्याने जर्मनीला या सामन्यात हार पत्करावी लागली. 17 वर्षांखालील वयोगटाच्या फिफाच्या या स्पर्धेत नायजेरियाने पहिल्यांदाच पदक मिळविले आहे. सदर स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषविले. पण भारतीय महिला फुटबॉल संघाला प्राथमिक फेरी पार करता आली नाही. प्राथमिक फेरीतील तिन्ही सामने भारतीय महिला संघाने गमावले होते.









