हेस्कॉमचे शेतकऱ्यांना आवाहन, विभागवार नोंदणी
बेळगाव : कृषी पंपांना आधार क्रमांक लिंक करण्याच्या प्रक्रियेला हेस्कॉमकडून सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे संबंधित कृषी पंप कोणत्या शेतकऱ्याच्या नावे तसेच दुरुस्ती करतानाही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांकडून शेतीचा सातबारा उतारा, आधार क्रमांक घेतला जात असून त्यानंतर संबंधित आधारक्रमांक कृषी पंपांना लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी हेस्कॉमचे बेळगाव विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश व्ही. यांनी आधार लिंक यंत्रणेचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. राज्य सरकारच्या ऊर्जा खात्याच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनेनुसार सर्व कृषी पंपांना आधार क्रमांक लिंक केले जात आहेत. मागील 15 दिवसांपासून हेस्कॉमच्या उपविभाग कार्यालयातून आधार लिंक प्रक्रिया सुरू आहे.
हेस्कॉमच्या शहर उपविभाग-1 व 2 या कार्यालयांसाठी रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालय तर उपविभाग-3 साठी नेहरुनगर येथील कार्यालयात नेंदणी सुरू आहे. त्याचबरोबर ग्रामीण उपविभाग-1 व 2 साठी गांधीनगर येथील कार्यालयात आधार लिंक करण्यात येत आहे. याबरोबर ग्रामीण भागासाठी विभागवार कार्यालय असून त्यामध्येही नोंदणी केली जात आहे. बेळगाव विभागामध्ये भाजीपाला तसेच उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले असून कृषी पंपांची संख्या अधिक आहे. पूर्वी कृषी पंप घेताना केवळ सातबारा उतारा व रेशनकार्ड घेतले जात होते. परंतु सद्यस्थितीला कृषी पंपांची सविस्तर माहिती समजावी यासाठी राज्य सरकारने आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बेळगाव विभागामध्ये हेस्कॉम कर्मचाऱ्यांची टीम तयार करून त्याद्वारे नोंदणी करण्यात येत आहे.
आधार लिंक करताना तांत्रिक अडचणी
30 ते 40 वर्षांपूर्वी घेण्यात आलेले कृषी पंप हे वडील अथवा आजोबांच्या नावाने आहेत. आधार लिंक करताना संबंधित शेतकऱ्याचे सातबारा उताऱ्यात नाव नसेल तर आधार लिंक प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याचबरोबर पूर्वी नोंदणी करताना केवळ इंग्रजीतील पहिल्या नावाने नोंदणी आहे. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच ओटीपी प्राप्त झाल्यानंतरच आधार लिंक प्रक्रिया यशस्वी होत आहे. त्यामुळे आधार लिंक करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत.
आवश्यक कागदपत्रे
- कृषी विद्युत मीटर क्रमांक (आरआर क्रमांक)
- शेतकऱ्याचा सातबारा उतारा
- आधार क्रमांक
- आधार लिंक असलेला मोबाईल









