तीन कार, दोन दुचाकींचे नुकसान : सुदैवाने कोणालाही इजा नाही : कार तेथेच सोडून कारचालकाचे पलायन
बेळगाव : भरधाव कारने रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या कार व दुचाकींना ठोकरल्याने रविवारी मध्यरात्री कॉलेज रोडवर झालेल्या अपघातात पाच वाहनांचे नुकसान झाले. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. कॉलेज रोडवरील लक्ष्मण कामते यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. जीए 05 बी 4635 क्रमांकाच्या कारचालकावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत तीन कार, दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
कित्तूर चन्नम्मा चौकापासून धर्मवीर संभाजी चौकाकडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून ही घटना घडली आहे. कॉलेज रोड इस्पितळासमोर उभ्या करण्यात आलेल्या तीन कार व दोन बाईकना धडक देत झालेल्या या साखळी अपघातात सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. मात्र, वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर चालकाने आपली कार तेथेच सोडून पलायन केले असून पोलीस स्थानकालाही या घटनेची माहिती दिली नाही. यासंबंधी भारतीय न्याय संहिता 134(बी), सहकलम 187 अन्वये एफआयआर दाखल केला असून पोलीस तपास करीत आहेत.









